गोदावरी आणि कपिला नद्यांच्या संगमावर सध्याच्या तपोवनात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांनी वनवासातील काही काळ व्यतित केला होता. अनेक महान ऋषी-मुनींनी या ठिकाणी शेकडो वर्षे तपश्चर्या केल्याने दंडकारण्यातील या भागाला ‘तपोवन’ हे नाव पडले. तपोवनातील लक्ष्मी नारायण हे एकमेव असे स्थान आहे, जेथे श्रीराम व श्रीकृष्ण या भिन्न अवतारांतील भगवंतांचे वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
तपोवनात गोदावरी व कपिला या नद्यांच्या संगमावर अनेक कुंड आहेत. अशी आख्यायिका आहे की श्रीराम जेव्हा सीता आणि लक्ष्मणासह येथे आले तेव्हा त्यांनी सीतेला आपले मूळ रूप अग्नीमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सीतेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पाचारण करून त्यांच्या साक्षीने अग्निप्रवेश केला व मायावी रूपात पंचवटी येथील सीता गुंफेत राहू लागली. त्यानुसार येथे ब्रह्मतीर्थ, विष्णुतीर्थ व शीवतीर्थ यांच्यासोबतच सीता कुंड (सौभाग्य तीर्थ) व अग्निकुंड आहेत. या ठिकाणी कपिल ऋषींनीही अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. त्यामुळे येथील नदीला ‘कपिला’ असे नाव पडले. कपिला नदीच्या तीरावर या कुंडांजवळ कपिल ऋषींची मूर्ती आहे. याशिवाय लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक व कान याच ठिकाणी कापले होते.
तपोवन परिसरात अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये श्रीराम पर्णकुटी, लक्ष्मी नारायण मंदिर, सर्वधर्म मंदिर, शैनेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. असे सांगितले जाते की वनवासातील काही काळ श्रीरामांनी या पर्णकुटीत व्यतित केला होता. येथील लक्ष्मी-नारायण मंदिर हे एक महत्त्वाचे मंदिरधाम आहे. दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचे हे प्रगटस्थान मानले जाते. कुंभमेळ्यादरम्यान या मंदिराचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. या काळात हजारो भाविक, संत, महंत यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था येथे केली जाते.
या मंदिराविषयी आख्यायिका अशी की त्रेता युगात तपोवन परिसरात शेकडो ऋषी तपश्चर्या करीत असत. वनवास काळात श्रीरामही येथे तप करण्यासाठी येत. श्रीरामांचे तेजस्वी रूप पाहून येथील काही ऋषींनी त्यांच्याशी वैवाहिक प्रेमाची अनुभूती घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी स्त्री बनण्यासही ते तयार होते; परंतु श्रीरामांनी आपल्या पुढील अवतारात तुमची ही इच्छा पूर्ण होईल, असे ऋषींना सांगितले. पुढे श्रीकृष्ण अवतारात हे ऋषी वृंदावनात गोपिका म्हणून प्रगट झाले. भगवान श्रीकृष्णांसोबत प्रेमाची दिव्य अनुभूती घेतल्यानंतर गोपिका बनलेल्या या ऋषींनी श्रीकृष्णास तपोवनात येऊन आपल्यासोबत राहावे, अशी विनवणी केली. त्यानुसार श्रीकृष्ण येथे राहू लागले. ते ठिकाण म्हणजे आजचे तपोवनातील लक्ष्मी-नारायण मंदिर होय.
तीन उंच कळसांमुळे तपोवनातील या लक्ष्मी-नारायण मंदिराचे वेगळेपण दुरूनच नजरेत भरते. प्रवेशद्वाराच्या आत डाव्या बाजूस नारायणेश्वर महादेव मंदिर आहे. तेथे शिवपिंडी, नंदी, हनुमान, गणेश, दत्त, देवी यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिराच्या सभामंडपाबाहेर मारुती, तसेच गरुड यांची देवळीसदृश्य लहान मंदिरे आहेत. प्रशस्त, खुल्या आणि अनेक खांबांवर उभ्या असलेल्या सभामंडपात डाव्या बाजूस गणेशाची मोठी मूर्ती आहे. सभामंडप व गाभारा असे स्वरूप असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्याचे ३ भाग असून मधील गाभाऱ्यात लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आहेत. डाव्या बाजूच्या गाभाऱ्यात राम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती, तर उजव्या बाजूस श्रीकृष्णाची मूर्ती आहे. या सर्व मूर्ती पांढऱ्या संगमरवरात कोरलेल्या असून त्यांच्या मुखावरील भाव, त्यांची वस्त्रभूषा, दागिने यांमुळे त्यांचे सौंदर्य खुलून दिसते.
मंदिर परिसरात सुमारे दीड एकर जागेवर गोशाळा आहे. येथे १०० हून अधिक गोमातांची सेवा केली जाते. या परिसरात संतनिवास, औषधालय आणि शाळा आहे. कुंभमेळ्याच्या दोन महिन्यांच्या काळात येथील संतनिवासात साधू-संतांची, भाविकांची राहण्याची तसेच भोजनाची मोफत व्यवस्था केली जाते. अमावस्या, पौर्णिमा, गोवर्धन पूजन (कार्तिक शुक्ल प्रतिपदा) या दिवशीही येथे भाविकांना अन्नदान केले जाते. येथे साजरे केले जाणारे मोठे उत्सव म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, दीपावली आणि गणेशोत्सव. या काळात मंदिरात भाविकांचा राबता असतो. दररोज सकाळी ७ वाजता आणि रात्री ८ वाजता आरती व पूजा केली जाते. यावेळीही परिसरातील नागरिक तसेच भाविकांची उपस्थिती असते.