पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेल्या सांगरुण गावाच्या हद्दीत एका उंच डोंगराच्या माथ्यावर जर्सेश्वर महादेव मंदिर आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये ‘जेरसा’ या नावाने उल्लेख असलेले हे पुरातन शिवस्थान खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आणि मुठा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. हे स्थान सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालावरील मुघलविरोधी मोहिमेशी या मंदिराचा थेट संबंध जोडला गेला आहे. सभोवतालची वनराई, धबधबे आणि सिंहगड ते तोरणा किल्ल्यांचे दृश्य यामुळे हे देवस्थान शिवभक्त, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या लढ्यामध्ये जर्सेश्वर महादेव मंदिराचा संदर्भ येतो. एप्रिल १६६३ च्या कालखंडात मुघल सेनापती शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात मुघली फौजेसह तळ ठोकून बसला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ५ एप्रिल १६६३ च्या मध्यरात्री शिवरायांनी मावळ्यांसह लाल महालावर छापा टाकला. या मोहिमेत महाराजांसोबत तानाजी मालुसरे, चांदजी जेधे, सर्जेराव जेधे आणि चिमणाजी देशपांडे यांसारखे मावळे सामील होते. या चकमकीत शाहिस्तेखानाची बोटे कापली गेली आणि त्याचा मुलगा अब्दुल फतह मारला गेला. या पराभवानंतर खान तेथून पळून गेला.
लाल महालातील या हल्ल्यानंतर मुघल सैन्याने शिवरायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुघल फौजेला गोंधळात टाकण्यासाठी शिवरायांनी एक रणनीती आखली होती.
त्यांनी कात्रज घाट, हिंगणे खुर्द, हिंगणे बुद्रुक आणि मुठा नदीच्या पात्राजवळ मावळ्यांच्या काही तुकड्या सज्ज ठेवल्या होत्या. या तुकड्यांनी तेथे कर्णे आणि नगारे वाजवून मुघल सैन्याला कात्रज घाटाच्या दिशेने धाव घेण्यास भाग पाडले. यावरूनच मुघलांना ‘कात्रजचा घाट दाखवणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला. इकडे छत्रपती शिवाजी महाराज लाल महालाच्या दिंडी दरवाजातून बाहेर पडून भुगावच्या डोंगराळ भागातून गुप्तपणे प्रवास करत सांगरुण आणि मांडवी बुद्रुक गावाच्या हद्दीवरील डोंगरावर असलेल्या जर्सेश्वर महादेवाच्या मंदिरात मध्यरात्री दाखल झाले. जर्सेश्वर हा डोंगर तोरणा, राजगड आणि सिंहगड या किल्ल्यांच्या दळणवळणासाठी एक मुघलांचा पहरा नसलेला गुप्त मार्ग होता. या पठारावर येऊन महाराजांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर मुठा नदीचे पात्र ओलांडून, ओसाडजाई मंदिर, निगडे मोसे, वरदाडे, मालखेड आणि कल्याण दरवाजामार्गे महाराज सिंहगडावर पोहोचले.
वास्तुरचना लक्षात घेता, जर्सेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पुरातन काळातील असल्याचे स्पष्ट होते. मंदिरातील दगडी कोरीव खांब आणि त्यावर कोरलेली नक्षी यावरून हे मंदिर आठव्या शतकातील असावे, असा निष्कर्ष इतिहास अभ्यासक काढतात.
मंदिराच्या बाहेरील आवारात अनेक विरगळ, काही जुनी शिवलिंगे, नंदीच्या मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष आहेत. मंदिराच्या मागच्या भागात पाषाणात बांधलेले एक दगडी चौकोनी कुंड आहे. या कुंडाच्या आजूबाजूला जुन्या काळातील व्यापारी मार्गाचे दगडी अवशेष आहेत. सन १८७९ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी खडकवासला धरणाची उभारणी केली, तेव्हा शिवकालीन अनेक पायवाटा आणि मूळचे ओसाडजाई मंदिर धरणाच्या पाण्यात बुडाले. मात्र डोंगराच्या उंचीवर असलेले जर्सेश्वर मंदिर आजही कायम आहे आणि ते इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
येथे पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग वारजे येथून सुरू होऊन एनडीए रस्ता, कुडजे, मांडवी बुद्रुक मार्गे जर्सेश्वर फाटा व डोंगरघाटाकडे येतो. दुसरा मार्ग सिंहगड रस्त्याने खडकवासला धरणाच्या जवळून, धरणाच्या पुलाखालून पुढे कुडजे, मांडवी मार्गे जर्सेश्वर असा आहे. डोंगर चढणीचा घाट रस्ता साधारण ३ ते ४ किलोमीटरचा वळणावळणाचा आहे. जर्सेश्वर डोंगर ही सध्या खासगी मालमत्ता असल्यामुळे घाटाच्या सुरुवातीला असलेल्या सुरक्षाचौकीवर वाहनाची आणि नावाची नोंद करणे अनिवार्य आहे.
जर्सेश्वर डोंगरमाथ्यावर असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृहावर प्रत्येकी एक शिखर आहे. दर्शनमंडपावरील शिखरावर तीन कळस आहेत. सभामंडपावरील छत अष्टकोनी आणि पायऱ्यापायऱ्यांचे आहे. गर्भगृहावरील शिखरावर सहा स्तर आहेत. या प्रत्येक स्तरामध्ये देवकोष्टके आहेत. त्यापैकी पहिल्या दोन स्तरांमधील देवकोष्टकांमध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या दर्शनमंडपात दर्शनी भागात दोन स्तंभ आहेत. येथून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या प्रतिमा आहेत. या सभामंडपात एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व त्यामागे कासवशिल्प आहे. सभामंडपाच्या भिंतींवर शिवचरित्रातील प्रसंगांवर आधारित प्रतिमा आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूला गर्भगृह म्हणजेच मूळ मंदिर आहे. या सभामंडपातून मूळ मंदिराच्या म्हणजेच गर्भगृहाच्या प्रदक्षिणामार्गाची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील चौथऱ्यावर गणपती, हनुमान, भैरोबा यांच्यासह देवीदेवतांच्या पाषाणमूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर अखंड पाषाणातील शिवपिंड आहे.
पिंडीच्या मागच्या बाजूला भिंतीलगत तीन मूर्ती आहेत. त्यात डावीकडे उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती, मध्यभागी पार्वती आणि उजव्या बाजूला एका देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरातच पाषाणात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे.
जर्सेश्वर महादेव मंदिरात वर्षभरातील अनेक सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. या मंदिरातील मुख्य उत्सव म्हणजे महाशिवरात्र होय. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे जत्रा भरते आणि दर्शनासाठी भाविक डोंगरावर गर्दी करतात. या दिवशी पहाटेपासूनच महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक आणि बेलफूल अर्पण करून विशेष पूजाअर्चा केली जाते. मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फुलांची सजावट केली जाते. या दिवशी मंदिरात नामस्मरण, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात अभिषेक आणि महापूजा आयोजित केली जाते. या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत भाविक देवदर्शन घेऊ शकतात.