पुणे शहराच्या दक्षिण भागात सिंहगड रस्त्यालगत धायरी नावाचे उपनगर आहे. येथे सुमारे साडेचार एकरांच्या परिसरात धारेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. या मंदिराच्या परिसरात औदुंबर, पिंपळ आणि वडाची जुनी वृक्षराजी आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या देवालयाला धायरीतील रायकर घराण्याचे कुलदैवत आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. महाराष्ट्र शासनाने या मंदिराला अधिकृत तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केल्याने राज्याच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांच्या शासकीय सूचीमध्ये या मंदिराचा समावेश झालेला आहे. मंदिराच्या गर्भगृहात दोन स्वयंभू शिवलिंगे आणि परिसरात शिवभक्त जैतुजीबाबा रायकर यांची संजीवन समाधी आहे.या मंदिराची आख्यायिका धायरी गावातील रायकर घराण्याचे मूळपुरुष जैतुजीबाबा रायकर यांच्या शिवभक्तीशी जोडलेली आहे. धायरी गावात रायकर घराण्यातील अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात. जैतुजीबाबा रायकर हे महादेवाचे भक्त होते. त्यांचा जन्म इ.स. १६१५ मध्ये झाला होता. ते दर सोमवारी धायरीतून सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्री महादेवाच्या दर्शनासाठी पायी जात असत. एके दिवशी शिखर शिंगणापूरवरून महादेवाचे दर्शन घेऊन धायरीकडे परतताना जैतुजीबाबांना वाटेत अंधार झाला. अरण्याच्या रस्त्यामुळे ते थांबले असता, त्यांच्यासमोर एका साधूच्या रूपात भगवान शिव प्रकट झाले. त्या साधूने जैतुजीबाबांना धीर दिला आणि घरी पोहोचेपर्यंत मागे वळून पाहू नकोस, असे सांगितले. धारेश्वर मंदिराच्या सध्याच्या जागेवर म्हणजेच धायरी गावाच्या हद्दीत आल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले.
त्यांनी मागे वळून पाहताच ते साधूरूप तेथेच अदृश्य झाले आणि त्याच जागेवर एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. हे शिवलिंग शिखर शिंगणापूर येथील शिवलिंगासारखेच आहे. या घटनेनंतर जैतुजीबाबांनी त्या स्वयंभू शिवलिंगाच्या भोवती एक छोटे मंदिर बांधले. आज या ठिकाणी धारेश्वर महादेवाचे मंदिर उभे आहे. वयाच्या वाढीमुळे उत्तरार्धात जैतुजीबाबांना घरापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत रोज दर्शनासाठी जाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर बसूनच महादेवाचे ध्यान सुरू केले. ते घरात बसून जप करताना ज्या जमिनीवर पाण्याचे अभिषेक करत, तिथेही काही दिवसांनी एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. ते शिवलिंग ‘शिवपार्वती शिवलिंग’ म्हणून ओळखले जाते. जैतुजीबाबांच्या या घराला स्थानिक ‘देववाडा’ म्हणून ओळखतात आणि तिथे पूजा करतात. काही काळाने जैतुजीबाबांनी जिवंत संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इ.स. १६७५ मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी वैशाख शुद्ध प्रदोष या तिथीला संजीवन समाधी घेतली. त्यांनी आपल्या मुलांना समाधीसाठी मंदिराच्या आवारात खड्डा खोदण्यास सांगितले. मुलांनी जेव्हा पहिला खड्डा खोदला, तेव्हा त्यातून एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. त्यामुळे तिथे समाधी न घेता बाजूला दुसरा खड्डा खोदला, परंतु तिथेही पुन्हा शिवलिंग प्रकट झाले.
अशा प्रकारे मुलांनी एकामागून एक सात खड्डे खोदले आणि त्या सातही ठिकाणी शिवलिंगे प्रकट झाली. मुलांनी हा चमत्कार सांगितल्यावर जैतुजीबाबांनी महादेवाची प्रार्थना करून ही लीला आवरती घेण्याची विनंती केली. त्यानंतर आठव्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला, तेव्हा तिथे शिवलिंग प्रकट झाले नाही. त्याच जागेवर जैतुजीबाबांनी जिवंत संजीवन समाधी घेतली. ही संजीवन समाधी आणि त्याशेजारी प्रकटलेली सात शिवलिंगे धारेश्वर मंदिराच्या आवारात आजही पाहायला मिळतात. शिवभक्त जैतुजीबाबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार त्यांचे वंशज तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला शिखर शिंगणापूरला धारेश्वराची कावड घेऊन जातात. पाच दिवसांच्या प्रवासानंतर द्वादशीला ही कावड सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या मंदिरात पोहोचते. शिखर शिंगणापूरला जाताना तेथील मुंगीघाटातून वर चढून जाण्याचा पहिला मान धायरी गावातील या कावडीला मिळतो. बारा दिवसांनंतर ही कावड पुन्हा धायरी येथे परत आल्यावर धारेश्वरची यात्रा भरते. धारेश्वर मंदिराची सध्याची वास्तू इ.स. १९७८ मध्ये बांधण्यात आली आहे. त्यानंतर इ.स. १९९३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यावर कलशारोहण करण्यात आले.
मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या प्रवेशकमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणातून सुमारे ४० पायऱ्या चढून मंदिरासमोर असलेल्या दुसऱ्या प्रांगणात येता येते. येथे मंदिरासमोर दोन उंच दगडी दीपमाळा आहेत. या दोन्ही दीपमाळांच्या मध्यभागी नंदीमंडप असून त्यात दगडी चौथऱ्यावर मंदिराकडे तोंड करून बसलेली नंदीची पाषाणमूर्ती आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपातील समोरील स्तंभांच्या वरच्या भागात दोन गजमुख कोरलेले आहेत. दर्शनमंडपातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. या मूर्तीला पितळी पत्र्याचे आवरण आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील प्रत्येक स्तंभावर आतील व बाहेरील बाजूने देवीदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे सर्व स्तंभ महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपात भाविकांसाठी दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. सभामंडपात पुढील बाजूला प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम आहे. सभामंडपातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर एकाच वेदीवर दोन शिवलिंगे आहेत, हे या मंदिराचे वैशिष्ट्य समजले जाते. गर्भगृहाच्या छतावर शिखराच्या चारही बाजूंनी संत व देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. येथील शिखर गोलाकार व वर निमुळते होत जाणारे आहे.
धारेश्वर शिवमंदिराच्या सभोवताली इतरही उपमंदिरे आहेत. आवारात येताना उजव्या बाजूला एक लहान शनी मंदिर आहे. शिवमंदिराच्या मागच्या बाजूला औदुंबर वृक्षाच्या छायेत दत्त मंदिर आहे. त्याच्या शेजारी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे असलेल्या डोंगरावर खंडोबाचे जुने मंदिर आहे. त्याला स्थानिक ग्रामस्थ ‘खंडोबाचा माळ’ म्हणतात. हे खंडोबा मंदिर शिवकाळापूर्वीचे आहे. इ.स. १६६१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता आणि पूजेसाठी इनाम जमीन दिली होती.
धारेश्वर मंदिरात दरवर्षी अनेक धार्मिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. पाडव्यानंतर आठव्या दिवशी धायरी गावातील महादेवाची मानाची काठी आणि कावड मिरवणुकीने आणि ढोल-ताशांच्या गजरात सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनासाठी पायी निघते. या कावड यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे.
या कावडीसोबत जाणाऱ्या भाविकांची आणि वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची व आरोग्याची व्यवस्था ‘श्री धारेश्वर महादेव संस्थान’तर्फे केली जाते. कावड धायरी गावात परत आल्यावर मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता महादेवाच्या स्वयंभू शिवलिंगाची षोडशोपचार पूजा आणि अभिषेकाला प्रारंभ होतो, तर रोज संध्याकाळी साडेसात वाजता आरती केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या दिवशी मंदिरात विशेष रोषणाई केली जाते. महाशिवरात्री व्यतिरिक्त माघ पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा होतो.
या धार्मिक विधींसोबतच मंदिरात पौष मास शुक्ल पक्ष प्रदोष, म्हणजेच पौष महिन्याच्या त्रयोदशीला भाते तेरस आणि माघ शुक्ल पक्ष प्रदोष, म्हणजेच माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील त्रयोदशी या दिवशी घुगऱ्या तेरस येथे साजरे केले जातात. हे प्रामुख्याने राज्यातील ग्रामीण भागात आणि काही प्रादेशिक लोकपरंपरांमध्ये दिवाळीच्या काळात साजरे केले जाणारे पारंपरिक दिवस आहेत. ज्या दिवसाला सर्वत्र धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणून ओळखले जाते, त्याच दिवसाला वेगवेगळ्या स्थानिक बोलीभाषांमध्ये आणि कृषी संस्कृतीत भाते तेरस किंवा घुगरे तेरस म्हटले जाते. हे दिवस पूर्णपणे शेती, धान्य आणि पशुधनाशी जोडलेले आहेत. घुगरे तेरस या दिवशी घरातील विविध प्रकारची कडधान्ये किंवा गहू एकत्र करून ते उकडवले जातात. या उकडलेल्या धान्याला लोकभाषेत घुगऱ्या म्हणतात. वर्षातून एकदा पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून या घुगऱ्यांचा नैवेद्य गायीगुरांना दिला जातो, तसेच घरातील सर्व सदस्य हा प्रसाद एकत्र मिळून खातात. दुसरीकडे, भाते तेरस या दिवशी नवीन हंगामात शेतातून तयार होऊन आलेल्या भाताच्या पिकाची किंवा धान्याची पूजा करण्याची पद्धत असते. काही भागांत या दिवशी नवीन तांदळाचा विशेष खाद्यपदार्थ अथवा भात तयार करून तो देवाला अर्पण केला जातो. सण साधेपणाने साजरा करण्याची ही एक जुनी परंपरा आहे. दररोज पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.