चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी कदरू आणि विनता नदीच्या संगमावर ‘धोडंबे’ गाव वसले आहे. धौम्य ऋषींच्या वास्तव्यामुळे गावाला ‘धोडंबे’ नाव पडले, असे म्हटले जाते. या गावात साधारणतः आठव्या ते नवव्या शतकातील दोन प्राचीन मंदिरे आहेत. ही दोन्ही मंदिरे एकमेकांना लागून आहेत. त्यापैकी एक वटेश्वर महादेवाचे, तर दुसरे विष्णू मंदिर आहे.
धोडंबे गावाचे प्राचीनत्व सांगणारे हे वटेश्वर महादेव आणि विष्णू मंदिर गावासोबतच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे वारसा स्थळ समजले जाते. शिल्पसौंदर्याचे उत्तम उदाहरण असलेल्या या मंदिरांच्या बांधकामांत नागरशैलीचा प्रभाव दिसून येतो. वटेश्वर मंदिरासमोर दोन दगडी समाध्या व दीपमाळ आहे. त्यापुढे नंदीमंडप आहे. मंदिराची द्वारशाखा द्वारपाल व स्त्रीदेवतांच्या माळेने सजलेली दिसते. प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या दोन खांबांवरील यक्ष मंदिराच्या छताला आधार देत असल्याचे शिल्प पाहायला मिळते. मंदिराच्या द्वारावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. द्वारपट्टीवर गणेशाची प्रतिमा असून त्यावरील पट्टीवर सप्तमातृका कोरलेल्या आहेत. सभामंडपात वरच्या बाजूने लहान-लहान होत गेलेले गोलाकृती शिखर व त्यात मध्यभागी लोंबणारे झुंबर आहे. सभामंडपातील भिंतींमध्ये अनेक शिल्पे आहेत. सभामंडपातून गर्भगृहाकडे जाताना दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा अनेक आकृत्या व शिल्पांनी सजलेली दिसते. गाभाऱ्यात तांब्याचा अन् लाखेचा, असे दोन मुखवटे आहेत. त्यासमोर महादेवाची पिंडी आहे. उत्सव काळात शिवपिंडीवर तांब्याचा मुखवटा घातला जातो.
वटेश्वर मंदिराच्या शेजारीच दीड फूट अंतर सोडून विष्णू मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. विष्णू मंदिराच्या द्वारशाखेवर द्वारपालांची शिल्पे आहेत. त्यावरील पट्टीवर पाच मातृका आहेत. विष्णू मंदिराच्या सभामंडपात वैशिष्ट्यपूर्ण शिल्प सोहळा अनुभवायला मिळतो. या सभामंडपाचे छत महादेव मंदिराहून अधिक रेखीव असून फुलांच्या झुंबरांसारखे ते भासते. सभामंडपाची भिंत व छताला जोडणाऱ्या भागात वाद्य वाजविणाऱ्या व कृष्णलीला दाखविणाऱ्या नर्तिका आहेत. त्यांच्याजवळ लहान-लहान स्त्रीदेवी प्रतिमा आहेत. अंतराळातील कालियामर्दनाचे कृष्णशिल्प, ६४ स्त्री प्रतिमा (योगिनी), श्रीकृष्णाची लीला दाखविणारी शिल्पे हे या मंदिराचे वेगळेपण म्हणावे लागेल. याशिवाय सभामंडपातील छतावर यक्षिणी छताला आधार देण्याबरोबर वेगवेगळ्या कामात मग्न असलेल्या दाखविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक यक्षिणी या छताला तोलून उभी आहे, तर दोन यक्षिणी दोन्ही हातांनी आपल्या लहान बाळाला सांभाळत त्याला दूध पाजतानाचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. विष्णू मंदिराच्या गर्भगृहाची द्वारशाखाही नक्षीकाम व देवदेवतांच्या कोरीव मूर्तींनी सजली आहे. उंबऱ्याला कीर्तिमुख आहेत. गर्भगृहात विष्णूची काळ्या पाषाणातील मूर्ती असून, इतरही काही मूर्ती आहेत.
या दोन्ही मंदिराच्या आतील भागात जेवढे नक्षीकाम व शिल्पे आहेत, त्याच्या चौपट शिल्पकाम मंदिराच्या बाह्य भिंतींवर दिसते. या शिल्पांमध्ये स्त्री शिल्पांची संख्या अधिक आहे. यात सूरसुंदरीचा समावेश होतो. सूरसुंदरी उंट आणि हत्तीवर स्वार होऊन शिकारीत मग्न असल्याचे दाखविल्या आहेत. याशिवाय विष्णूचा वराह, नृसिंह अवतार, शिव, कुबेर, सूर्य ही मूर्तिशिल्पे या मंदिरांवर पाहायला मिळतात. मंदिराच्या शिखराचा भाग नव्याने बांधला आहे.
या मंदिरांच्या आजूबाजूला अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. येथील देवीच्या मंदिरात अखंड लाकडातील १८ भुजा असलेली देवीची रेखीव मूर्ती आहे. याशिवाय गणपती, विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, हनुमान, श्रीदत्त, श्री गोरक्षनाथ, श्री भैरवनाथ, श्री जलालनाथ अशी अनेक मंदिरे आहेत. गावात दत्त जयंतीला वटेश्वराची यात्रा भरते. ‘धोडंबे’ हे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. तसेच ‘संतांची भूमी’ म्हणूनही या गावाची ओळख आहे. प्राचीन शिल्पकलेचा वारसा जपणाऱ्या या दोन्ही मंदिरांना शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित वास्तू म्हणून घोषित करण्यात आले आहे.