दिल्ली येथील श्रीराम संस्कृतिक शोध संस्थेने काही वर्षांपूर्वी देशभरात केलेल्या संशोधनात त्यांना वनवास काळातील श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेली २९४ तीर्थे आढळून आली. त्यामध्ये अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे. या नोंदींनुसार येवला तालुक्यातील पाटोदा येथे असलेले श्री रामेश्वर मंदिर हे १५५ वे तीर्थ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवपिंडीजवळ गुप्त स्वरूपात असलेल्या गंगेचे पाणी शरीरावर आलेल्या मोसवर लावल्यास (त्वचेवर येणाऱ्या गाठी) त्यातून आराम मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीनकाळी हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. श्रीराम जेव्हा वनवास काळात या भागात आले तेव्हा सध्या मनमाडजवळील अनकाई किल्ल्यावर असलेल्या गुहेत अगस्ती ऋषी तपश्चर्येला बसले होते. श्रीराम अगस्ती ऋषींच्या भेटीसाठी जात असताना मार्गात त्यांनी पाटोदा येथे मुक्काम केला होता. श्रीराम दररोज जेथे जेथे मुक्काम करीत तेथे तेथे संध्याकाळी शिवपिंडीची स्थापना करून पूजा-अर्चा करत असत. त्याचप्रमाणे पाटोदा येथे त्यांनी वाळूच्या शिवलिंगाची स्थापना केली. पूजा-अर्चा सुरू असताना एक मोसग्रस्त व्यक्ती तेथे आला. श्रीरामांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून हे मोठे तपस्वी असावेत, असे त्या व्यक्तीला वाटले. तो श्रीरामांना विनंती करू लागला की, मला या मोस रोगामुळे शारीरिक पिडा होत आहे. आपण मला या रोगापासून मुक्त करावे. त्यावर श्रीरामांनी ‘तथास्तू’ म्हटल्यावर त्या व्यक्तीचे मोस त्वरित बरे होऊन त्याची त्वचा पूर्वीप्रमाणे झाली. त्यावेळी त्या व्यक्तीने श्रीरामांना भेट म्हणून आपल्याजवळची वांगी दिली होती. तेव्हापासून या मंदिरात भक्तांकडून देवाला वांगी वाहण्याची प्रथा आहे.
येवला तालुक्यातील लासलगाव-येवला रस्त्यावर पाटोदा येथे रामेश्वराचे हे प्रसिद्ध स्थान आहे. बाजारपेठेला लागूनच असलेले हे मंदिर पाटोद्याचे ग्रामदैवत समजले जाते. मुख्य रस्त्यावरील कमानीतून आत गेल्यावर पाच ते सहा पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात जाता येते. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप प्रशस्त असून त्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. सभामंडपाच्या भिंतींवर मोठ्या अक्षरांत शिवस्तुतीपर अभंग, तसेच संत तुकारामांचे अभंग लिहिलेले दिसतात. येथे असलेल्या शिलालेखावरून, शिवाजी विठ्ठल विंचूरकर यांनी शके १७९० मध्ये बांधलेल्या रामेश्वर मंदिराचा खंडेराव विठ्ठल विंचूरकर यांच्या स्मरणार्थ गिरीजाबाई शिवदेव विंचूरकर यांनी शके १८७८ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती मिळते. याशिवाय श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेल्या २९४ तीर्थांची क्रमवारीनुसार माहिती येथे देण्यात आली आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच एका चौथऱ्यावर अखंड काळ्या दगडापासून बनविलेला नंदी आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. द्वारशाखेच्या डाव्या बाजूला प्राचीन गणेशमूर्ती आहे. ही गणेशमूर्ती गावात एका बांधकामासाठी खोदकाम करताना सापडल्याचे सांगितले जाते.
या मंदिराचे गर्भगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे असलेल्या सुंदर शिवपिंडीसमोर श्रीरामांच्या संगमरवरात कोरलेल्या विशेष पादुका आहेत. या पादुकांवर काही आकृत्या कोरलेल्या असून त्याखाली ‘श्रीरामाच्या वनमार्गातील अनेक तीर्थांची पवित्र रज समन्वित श्रीराम चरणारविन्दांचे पूजन, दर्शन, विश्वाच्या समस्ततीर्थांचे पुण्य प्रदाता, शास्त्रांनी मान्य केले आहे’ असा मजकूर कोरलेला दिसतो. या पादुकांना लागूनच शिवपिंडीजवळ एक चौकोनी ६ x ६ इंचाचा व दीड फूट खोलीचा जमिनीत लहानसा खड्डा आहे. असे सांगितले जाते की, या ठिकाणी गंगा अवतरली आहे. केवळ हात जाऊ शकतो एवढ्याच आकाराच्या या खड्ड्यात गंगेचे तीर्थ असल्याचे सांगितले जाते. वर्षाचे बाराही महिने त्यात पाणी असते, ते कधीच कमी किंवा जास्त होत नाही. हे तीर्थ मोस आलेल्या व्यक्तीच्या अंगाला लावल्यास त्याचे मोस बरे होतात, तसेच रामेश्वराला वांगी अर्पण केल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यासाठी अनेक ठिकाणांहून भाविक येथे महादेवाच्या दर्शनासाठी व मोसवर उपचार करण्यासाठी येत असतात.
गर्भगृहावरील कळसावर सुंदर कलाकुसर केलेली दिसते. सुमारे ४० ते ५० फूट उंचीचा हा कळस शेकडो लहान-लहान कळसांच्या प्रतिकृतींनी बनलेला दिसतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते की मंदिराबाहेरील भिंतीत असलेल्या एका कोनाड्यात कान देऊन ऐकले असता खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो. चैत्र महिन्याच्या शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते. याशिवाय रामनवमी, महाशिवरात्री व श्रावणी सोमवारीही या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. श्रीरामांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले हे स्थान असल्यामुळे हजारो भाविकांबरोबरच दरवर्षी अयोध्येतील अनेक साधू या मंदिरात आवर्जून दर्शनाला येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.