वालुकेश्वर मंदिर

बाणगंगा तीर्थ, वालुकेश्वर, मुंबई

मलबार हिल हा मुंबईतील अतिउच्चभ्रू असा परिसर. राज्यपालांचे निवासस्थान, मंत्र्यांचे बंगले, धनिक-वणिकांची निवासस्थाने यांनी व्यापलेल्या या परिसरात आजही येथील मूळ रहिवाशांच्या चाळी दिसतात. या परिसरात एकीकडे आधुनिकतेचा आविष्कार घडत असताना दुसरीकडे प्राचीनतेची साक्ष देणारी मंदिरे, संतांचे मठ आणि प्राचीन तीर्थ अस्तित्वात आहेत. येथील प्रभू श्रीरामाने निर्माण केलेला बाणगंगा तलाव आणि स्वहस्ते स्थापन केलेले वालुकेश्वराचे शिवलिंग यामुळे हा परिसर आजच्या काळातही असंख्य भाविकांना आकर्षित करीत आहे.

मुंबईच्या नैऋत्य दिशेस असलेली शेवटची टेकडी म्हणजे वालुकेश्वराची टेकडी. हा एक छोटा डोंगरच होता. त्याच्या एका भागास ‘खंबाला’, एकास ‘गवळ्याच्या तळ्यावरील डोंगर’, तर एकास ‘टांकरविल’ असे नाव होते. डोंगराच्या समुद्रातील शेवटच्या टोकाच्या म्हणजेच दांडीच्या भागास ‘शिरगुंडी’ असे म्हणत असत. तेथे आता राज्यपालांचे आलीशान निवासस्थान आहे. ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळापासून या भागास मलबार पॉईंट असे संबोधण्यात येत असे. या भागात सागरी चाचे लपून बसत असत. हे चाचे मलबार किनाऱ्यावरील धर्मपट्टण, कोट्टा आदी भागांतील असत. त्यांच्यावरून या परिसरात मलबार हिल असे नाव पडले. पूर्वी मुंबई बेटापासून अलग असलेला हा डोंगरभाग ओसाड होता. तेथील काही गवताळ भाग गुरचरणासाठी राखीव असे. सन १७२८ मध्ये येथील काही जमीन सरकारकडून भाड्याने घेऊन लोक येथे काकड्या, भेंडी, वांगी, गवार आदी भाजीपाला पिकवत असत.

येथील दांडीच्या भागात, सध्या जेथे राज्यपालांचे निवासस्थान आहे, तेथे वालुकेश्वराचे मूळ मंदिर होते असे सांगितले जाते. मुंबईच्या बेटांवर इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून शिवोपासना केली जात असल्याचे पुरावे आहेत. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी मुंबई बेटांवर कलचुरींचे मांडलिक असलेल्या त्रैकूटक राजांची सत्ता होती. मुंबईतील जोगेश्वरी, घारापुरी, मंडपेश्वर ही शैव संप्रदायाचा प्रभाव असलेली लेणी या त्रैकूटक आणि कलचुरींच्या काळातील होत. कलचुरी हे पाशुपतपंथीय शैव होते. त्यांनी घारापुरी येथील ‘शिवसृष्टी’ निर्माण केल्याचे सांगण्यात येते. घारापुरीतील मुख्य लेण्यांसमोर सापडलेल्या शिल्पांशी साम्य असलेली एक शिवमूर्ती आज परळ गावातील परमानंद वाडी येथील बारादेव मंदिरात उभी आहे. इतिहासकारांच्या मते या मूर्तीचा निर्माणकाळ इ.स. ५२५ ते ५३० असा आहे. यावरून तेव्हापासून या बेटांवर शैव संप्रदायाची छाप असल्याचे स्पष्ट होते. इसवी सनाच्या नवव्या शतकापासून पुढची चार शतके येथे उत्तर कोकणच्या शिलाहार घराण्याची सत्ता होती. इ.स. १०५० मध्ये अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध शिवालय बांधणारे छित्त व मम्मुनी हे राजे शिलाहार घराण्याचे होते. अशा या शिवभक्त शिलाहारांच्या काळात वालुकेश्वराचे मूळ मंदिर बांधण्यात आल्याचे ‘द गॅझेटियर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड’च्या तिसऱ्या खंडात म्हटले आहे.

वालुकेश्वराचे हे स्थान आणि येथील बाणगंगा तीर्थ यांचा उल्लेख ‘महिकावतीची बखर’मध्येही आहे. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याने इ.स. ११४२ मध्ये मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास मुंबई बेटे सर करण्यासाठी पाठवले होते. त्याने वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. बखरीतील उल्लेखानुसार “येसाव्या पासुन जुहु। यावत् वाहिनळे। राजण फार पाहोन वाळुकेश्वरी गेले। बाणगंगा देखिली। हनुमानप्रतिमा लक्षिली। तेथे स्थिर जाले दिवस।।” या बखरीनुसार बाराव्या शतकात येथे बाणगंगा तीर्थ आणि वालुकेश्वराचे मंदिर होते. गोविंद नारायण माडगांवकर यांनी या मंदिराविषयी त्यांच्या ऐकिवात असलेली माहिती ‘मुंबईचें वर्णन’मध्ये नोंदवली आहे. “हे देऊळ फार पुरातन होतें. हें सुमारें सहाशें वर्षांमागें केबाजी राणा म्हणून मराठी सरदार होता त्यानें बांधिलें होतें असें सांगतात. परंतु त्यास कांहीं आधार सांपडत नाहीं.” हा सरदार कदाचित भीमराजाच्या (बिंबदेव यादव) कारकिर्दीतील असावा, असे माडगांवकर यांनी म्हटले आहे.

गॅझेटियरनुसार, या मंदिराचे मोठे माहात्म्य ते ‘शिरिगुंडी’नजीक असल्यामुळे होते. या शिरिगुंडीचे संस्कृतीकरण ‘श्रीगुंडी’ या नावाने झाले. सध्या राजभवन परिसरात तिचे एक छोटे मंदिर आहे. मुळात पूर्वी तेथे एक मोठा खडक होता. त्यात सुईच्या मेढ्यासारखी (दोरा ओवण्यासाठी असते तशी) एक छोटी खाच होती. सन १८१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘श्री सर्व देवसभा : द हिंदू पॅन्थिऑन’ या धर्माभ्यासक एडवर्ड मूर यांच्या पुस्तकात या शिरिगुंडीविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे “मुंबई बेटाच्या मलबार पॉईंट नावाच्या एका भूशिराच्या अगदी शेवटच्या टोकाला एक चीर असलेला खडक आहे. या खडकाचा आकार ‘योनी’सारखा दिसतो. या पवित्र प्रतीकामधून म्हणजेच चिरीमधून पलीकडे गेल्याने मनुष्याचे शुद्धीकरण होते, या श्रद्धेने अनेक यात्रेकरू आणि लोक या ठिकाणी येतात. ही ‘योनी’ खडकांच्या दरम्यान बऱ्याच उंचावर असल्यामुळे तेथे पोहोचणे सोपे नाही. वादळी दिवसांत समुद्राच्या अथांग लाटा सतत या खडकावर आदळत असतात.” आता तो खडक नाही. परंतु तेथे देवीचे मंदिर आहे. तेथे गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी वार्षिक जत्रा असते. त्या वेळी राजभवनात भाविकांना प्रवेश दिला जातो.

या शिरिगुंडीजवळ मंदिराचे अवशेष असल्याची नोंदही एडवर्ड मूर यांनी केलेली आहे. एडवर्ड मूर यांच्या नोंदीनुसार “या खडकाच्या जवळच एका मंदिराचे अवशेष आहेत. त्याच्या सुमारे सव्वादोनशे वर्षांपूर्वीच्या स्वरूपावरून हे मंदिर पूर्वी अत्यंत देखणे आणि भव्य असावे, असे खात्रीने म्हणता येते. मुंबई पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असताना मूर्तीद्वेष्ट्या पोर्तुगीजांनी त्यांच्या धार्मिक आवेशापोटी हे मंदिर दारूगोळा लावून उडवून दिले असावे, या मानल्या जाणाऱ्या गोष्टीत तथ्य असू शकते. सुबक नक्षीकाम केलेल्या घडीव दगडांचे तुकडे आता या मंदिराच्या जागेवर आणि आसपास विखुरलेले दिसतात आणि त्यांच्या पृष्ठभागावर विविध प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तेथील बांधकामासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील असे अनेक दगड हिंदूंनी वाहून नेले. त्यांनी त्या दगडांचा वापर शेजारीच असलेल्या सुंदर ब्राह्मण गावात, तेथील देखण्या बाणगंगा तलावाच्या आणि मंदिराच्या उभारणीसाठी केला आहे.”

या मंदिराची आख्यायिका प्रभू श्रीरामाच्या वनवासकाळाशी जोडलेली आहे. इ.स. १८४३ मध्ये अहमदनगर येथून सुरू झालेल्या ‘ज्ञानोदय’ या वृत्तपत्रात १८६०-६१ च्या सुमारास या मंदिराची आख्यायिका प्रसिद्ध झाली होती. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आख्यायिकेनुसार, श्रीराम लंकेस जाण्यासाठी निघाले असताना वालुकेश्वराच्या दांडीवरील समुद्रकाठी आले होते. रोज लक्ष्मणाकडून काशीहून नवे शिवलिंग आणून ते पूजण्याचा श्रीरामाचा नेम असे. त्या दिवशी काशीहून शिवलिंग आणण्यास लक्ष्मणास उशीर झाला. त्यामुळे श्रीरामाने वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली व ते तेथेच स्थापन केले. इतक्यात लक्ष्मण तेथे शिवलिंग घेऊन आला. तेव्हा लक्ष्मणाने आणलेले शिवलिंग श्रीरामाने वालुकेश्वरी स्थापन केले. ‘ज्ञानोदय’मध्ये नमूद केल्यानुसार, “हल्ली वालुकेश्वर म्हणून ओळखले जाणारे मंदिर प्रत्यक्षांत लक्ष्मणेश्वर आहे. वालुकेश्वराचे मूळ स्थान वालुकेश्वराच्या दांडीवर होते. श्रीरामाने तेथे स्थापिलेले लिंग सध्या आढळत नाही. ते मूळ देऊळ नष्ट झाल्यापासून लोक लक्ष्मणेश्वरालाच वालुकेश्वर म्हणू लागले. तेथे रामाला तहान लागली तेव्हा त्यांनी भूमीत बाण मारून पाणी उत्पन्न केले आणि ते पिऊन ते संतुष्ट झाले. हे उदक बाणाने उत्पन्न केले म्हणून त्याला बाणतीर्थ किंवा बाणगंगा म्हणतात. बाणाच्या योगाने पाताळातील भोगावती वर निघाली म्हणून याला पाताळगंगा असेही म्हणतात.” बाणगंगा तलावाविषयीच्या अन्य एका पौराणिक आख्यायिकेनुसार, परशुरामाने सह्याद्रीच्या शिखरावरून समुद्रात चौदा बाण मारले. त्यांतील एक बाण येथे येऊन पडल्यामुळे हे पवित्र तीर्थ निर्माण झाले.

बाणगंगा तलावाच्या काठी सध्या असलेल्या या मंदिराची उभारणी इ.स. १७१५ मध्ये रामजी कामत यांनी केली. तत्कालीन इंग्रजी पत्रव्यवहारामध्ये ‘रामजी कामाठी’ असा उल्लेख असलेले रामजी कामत हे गौड सारस्वत (शेणवी) समाजाचे होते. माडगावकरांच्या म्हणण्यानुसार, ते त्यावेळच्या एतद्देशीयांच्या लष्करावरील मुख्य सरदार होते व त्यांना वालुकेश्वराची जमीन सरकारकडून इनाम म्हणून मिळाली होती, असे सांगितले जाते. जयराज साळगावकर यांनी ‘मुंबई शहर गॅझेटियर’ या पुस्तकात, रामजी कामत इंग्रजांच्या कारकुनी सेवेत होते, असे नमूद केले आहे. त्यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांना पाठवलेल्या एका पत्राच्या आधारे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रामजी कामत यांना राज्यद्रोही ठरवले. त्यानंतर त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना कैदेची शिक्षा झाली आणि त्यांची मालमत्ता लिलावात काढण्यात आली. तुरुंगात असतानाच सन १७२८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर ते पत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. त्या काळी अत्यंत खळबळजनक ठरलेल्या या खटल्याच्या पाच वर्षे आधी रामजी कामत यांनी या मंदिराची स्थापना केली होती.

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाविषयीच्या ‘जीएसबीकोंकणी डॉट नेट’ या संकेतस्थळावरील वालुकेश्वर मंदिराविषयीच्या मजकुरात मात्र वेगळा इतिहास देण्यात आला आहे. त्यानुसार, ठाण्यातील शिलाहार राजाच्या दरबारात असलेल्या लक्ष्मण प्रभू नामक गौड सारस्वत ब्राह्मणाने इ.स. ११२७ मध्ये वालुकेश्वर मंदिराची स्थापना केली. त्यानंतर रामजी कामती यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. पुढे श्रावण शुद्ध १४, सोमवार, १८ ऑगस्ट १९८९ रोजी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी हा इतिहास सांगणारा एक संस्कृत शिलालेख तयार करून, तो मंदिराच्या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर लावण्यात आला. तो असा –

‘अत्र शिलाहारान्वय समये द्वादशमिते शते क्रैस्ते। शिवमन्दिरं पुराणं रेजे यल्लक्ष्मणेश्वराख्यमभूत् ॥१॥
रचितं लक्ष्मणनाम्ना गोमन्तद्विजमहाप्रधानेन । ऐतिह्ये वार्तेयं लोकें सौमित्रिणा तु संबद्धा ॥२॥
काले मुम्बाद्वीपे क्रूरफिरङ्गीतरङ्ग‌भङ्गहते । विध्वंसितं तदैतत् केवलमासीत् शिलासमाहारः ॥३॥
मुम्बाद्वीपे पश्चात् आङ्कवणिक्संघशासनं प्राप्ते । आसीन्मुदाध्यक्षः सेनाध्यक्षस्तथा महाश्रेष्ठी ॥४॥
सुमतिर्जनाभिरामः पुण्यात्मा रामकामतिर्नाम । सारस्वतं कुलं यो गार्ग्य गौत्रं च भूषयामास ॥५॥
संस्थाप्यादौ ‘कोटे’ सामळियालाल-वेङ्कटेशौ सः। नन्दशरर्षिधरित्री- मिते तदूर्ध्वं स विक्रमे वर्षे ॥६॥
जीर्णोद्धारं कृत्वा पुनरपि शिवमन्दिरं स निर्मितवान् । यद्वालुकेश्वर इति ख्यातिं लोकेषु पावनीमाप ॥७॥
क्षुद्रो वालुककण इव विश्वं कृत्स्न यदग्रतोभाति । तं वालुकेश्वरमहं वन्देऽनन्तं कृपानिधिं शान्तम् ॥८॥’

या शिलालेखाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे “येथे इसवी सनाच्या बाराव्या शतकात, शिलाहार राजांच्या काळात एक प्राचीन शिवमंदिर सुशोभित होते आणि त्याचे नाव लक्ष्मणेश्वर असे होते. या मंदिराची निर्मिती गोमंतक म्हणजेच गोवा येथील सारस्वत ब्राह्मण महाप्रधान लक्ष्मण यांनी केली होती. परंतु लोकमानसातील आख्यायिकेनुसार आणि परंपरेनुसार ही कथा सुमित्रेचा पुत्र म्हणजेच लक्ष्मणाशी जोडली गेली आहे. पुढे काळाच्या ओघात, मुंबई बेटावर जेव्हा क्रूर पोर्तुगीजांच्या म्हणजेच फिरंग्यांच्या आक्रमणाची लाट आली, तेव्हा त्यांनी या मंदिराचा विध्वंस केला. त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे नष्ट होऊन तिथे केवळ दगडांचा ढीग उरला होता. त्यानंतर जेव्हा मुंबई बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन आले, तेव्हा तिथे लोकांमध्ये अत्यंत प्रिय, सुबुद्ध आणि पुण्यात्मा असलेले राम कामत नावाचे एक महाश्रेष्ठ होते. त्यांनी आपल्या गार्ग्य गोत्राचे आणि सारस्वत कुळाचे नाव उज्ज्वल केले होते. त्या रामकामत यांनी आधी कोट भागात शामळियालाल आणि वेंकटेश यांची स्थापना केली. त्यानंतर विक्रम संवत १७७९ मध्ये त्यांनी त्या पडके शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे पुन्हा भव्य शिवमंदिर उभारले. हे मंदिर आज वालुकेश्वर या अत्यंत पावन नावाने प्रसिद्ध आहे. या अथांग शिवाच्या समोर संपूर्ण ब्रह्मांड केवळ वाळूच्या एका लहान कणासारखे भासते. अशा त्या अनंत, दयानिधी आणि परम शांत श्री वालुकेश्वर भगवंताला मी मनापासून वंदन करतो.”

वालुकेश्वराचे हे मंदिर साध्या अनलंकृत बांधणीचे आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचा सभामंडप ५० फूट बाय २० फूट असा आडवा-रुंद आहे. त्यावर समतल छत आहे. सभामंडपात उंच संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची संगमरवरात घडवलेली सुबक मूर्ती आहे. येथील गर्भगृहही आधुनिक बांधकामाचे व चौरसाकार आहे. त्याच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन छोट्या देवळ्या आहेत. त्यात गणेश व भैरवाच्या छोट्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. त्यावरील भागात चौकोनी देवळीत गणेश आणि ऋद्धी-सिद्धीच्या रंगीत मूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी चार चंदेरी स्तंभांनी पेललेला देव्हारा आहे. त्यात भूतलावर पितळी शाळुंकेमध्ये वालुकेश्वराचे पाषाणाचे लिंग प्रतिष्ठित आहे. या लिंगास तांब्याने घडवलेल्या मोठ्या नागराजाने विळखा घातला आहे, तसेच वर फण्याचे छत्र उभारले आहे. त्यावर पितळी अभिषेकपात्र आहे. या शिवपिंडीच्या उजव्या बाजूस गणेशाची आणि आदिशक्तीची अत्यंत कलात्मक अशी समपाद उभी पितळी मूर्ती आहे. आदिशक्तीची मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या उजव्या हातात पुष्पांकित शिवलिंग आणि डाव्या हातात कमलपुष्प आहे. उर्वरित दोन हात खाली सोडलेले आहेत आणि त्यांतील उजव्या हातात रुद्राक्षमाला व डाव्या हातात कमंडलू आहे. या मूर्तीच्या पायानजीक सिंह व नंदी आहेत. गर्भगृहात मागच्या भिंतीवरील देवकोष्टकात पार्वतीमातेची मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहाच्या उजवीकडे एक उपगर्भगृह आहे. त्यात संगमरवरी वेदीवर लक्ष्मी-नारायणाची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहावर अनलंकृत उंच शिखर आहे.

या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. येथे पहाटे काकड आरती केली जाते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी पूजा केली जाते. या पूजेची वेळ नमूद केलेली नाही. माध्यान्ही महानैवेद्य दिला जातो. श्रावण हा येथील उत्सवी मास होय. श्रावणात रोज पिंडीवर लघुरुद्र अभिषेक केला जातो. कार्तिक पौर्णिमेला आणि महाशिवरात्रीला येथे देवाची यात्रा भरते. त्या वेळी देवाची वाजतगाजत पालखी काढली जाते. या उत्सवांच्या वेळी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टद्वारे मंदिराचा कारभार पाहिला जातो.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने बाणगंगा तलावापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२२४०४४८२

वालुकेश्वर मंदिर

बाणगंगा तीर्थ, वालुकेश्वर, मुंबई

Back To Home