जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर आपेगाव हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये विज्ञानेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक देवालय स्थित आहे. बाराव्या शतकात चालुक्य वंशातील राजा विक्रमादित्य सहावा याच्या कारकीर्दीत या मंदिराची स्थापना झाली. हे मंदिर चालुक्य राजाच्या पदरी असलेल्या विज्ञानेश्वर नावाच्या पंडिताने बांधले असल्यामुळे यास विज्ञानेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. येथील महादेव नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराच्या उभारणीचा आणि विज्ञानेश्वरांच्या ग्रंथरचनेचा इतिहास महत्त्वपूर्ण आहे. राजा विक्रमादित्य सहावा याच्या काळात (सन १०७६ ते ११२६) भारद्वाज गोत्राचे पद्मनाभ भट्टोपाध्याय यांचे पुत्र पंडित विज्ञानेश्वर हे राजसभेत कार्यरत होते. विज्ञानेश्वर हे नीतिशास्त्र आणि कायद्याचे अभ्यासक होते. त्यांनी बाराव्या शतकात ‘मिताक्षरी’ नावाच्या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली. या ग्रंथामध्ये त्यांनी महिलांना संपत्तीवर अधिकार प्राप्त करून दिला. आजचा आधुनिक हिंदू कायदा याच मिताक्षरी ग्रंथातील नियमांवर आधारित आहे, असे मानले जाते. विज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथामध्ये असहाय, विश्वरूप, मेधातिथी, श्रीकर, भारूची आणि भोजदेव अशा सहा पूर्वकालीन टीकाकारांचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. बाराव्या शतकानंतर देवण्णभट्ट यांनी लिहिलेल्या ‘स्मृतिचंद्रिका’ या ग्रंथामध्ये मिताक्षरी ग्रंथाचा संदर्भ येतो. यावरून अभ्यासकांच्या मते मिताक्षरी ग्रंथाचा रचनाकाळ सन ११०० ते ११२० च्या दरम्यान असावा. विज्ञानेश्वरांनी या ग्रंथामध्ये स्वतःचा उल्लेख ‘विज्ञानयोगीन्’ आणि ‘परमहंस’ असा केला आहे.
यावरून त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यास घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. याच कालखंडात त्यांनी आपेगाव येथे या महादेव मंदिराची स्थापना केली, असे सांगितले जाते.
पूर्वी हे मंदिर गावापासून काही अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर स्थित होते, परंतु कालौघात गाव वाढल्यामुळे आता ते गावालगत आले आहे. मुख्य रस्त्यापासून गावात जाणाऱ्या मार्गाच्या फाट्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान उभारलेली आहे. मंदिराच्या समोरच वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ आहे. मुख्य मंदिर परिसराभोवती सुमारे ३० फूट उंच अशी दगडी तटबंदी बांधलेली आहे. या तटबंदीमध्ये मुख्य रस्त्यापेक्षा सुमारे १५ फूट उंचावर स्थित असलेले एक दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर सुमारे १० फूट उंच चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यावर येण्यासाठी तटबंदीला लागून डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी २० पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या मध्ये आणि बाहेरील बाजूस सुरक्षेसाठी लोखंडी कठडा लावलेला आहे. चौथऱ्यापासून मुख्य प्रवेशद्वार आणखी ५ फूट उंचावर आहे आणि तेथपर्यंत येण्यासाठी ५ पायऱ्या बांधलेल्या आहेत. प्रवेशद्वारात डाव्या व उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी आसने तयार केलेली आहेत.
प्रवेशद्वाराला नक्षीदार दगडी आणि लाकडी द्वारशाखा लावलेल्या आहेत. त्याच्या ललाटबिंबावर गणपतीची आकृती कोरलेली आहे, तर मंडारकावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दर्शनी भिंतीवर द्वारपालांची चित्रे रंगवलेली आहेत. या प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या समतल पातळीवर मंदिराचे प्रांगण पसरलेले आहे. प्रांगणातून नगारखान्यात जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे.
प्रांगणाच्या मध्यभागी विज्ञानेश्वर महादेवाचे मुख्य मंदिर उभे आहे. मंदिराच्या अगदी समोर सुमारे ४ फूट उंच चौथऱ्यावर नंदीमंडप आहे. नंदीमंडपाच्या चौथऱ्यावरील चारही कोपऱ्यांवर महिरपी कमानींनी जोडलेले चार नक्षीदार स्तंभ आहेत. नंदीमंडपाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराच्या खालील अष्टकोनी थरात देवकोष्टके कोरलेली आहेत, तर वरील थर घुमटाकार स्वरूपाचा आहे. या शिखराच्या शीर्षभागावर स्तूपिका आणि त्यावर कलश बसवलेला आहे. नंदीमंडपाच्या चौथऱ्यावर चढण्यासाठी बाजूने पायऱ्या बांधलेल्या आहेत. नंदीमंडपामध्ये नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठित आहे. या नंदीच्या समोरच पुष्पदंत ऋषींची एक मूर्ती आहे. या पुष्पदंत ऋषींनीच प्रसिद्ध ‘शिवमहिम्न स्तोत्रा’ची रचना केली होती, असे मानले जाते.
मुख्य मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी विभागलेली आहे. हे मंदिर सुमारे ३ फूट उंच अधिष्ठानावर म्हणजेच पायावर उभे आहे. सभामंडपाचे मुख्य प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंचावर आहे. त्याच्या ललाटबिंबावर रिद्धी-सिद्धीसह गणपतीचे शिल्प आहे, तर मंडारकावर कीर्तिमुख कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराला मजबूत लाकडी झडपा आहेत. सभामंडपाच्या आत डाव्या आणि उजव्या बाजूला उभ्या ओळीत प्रत्येकी ३ लाकडी स्तंभ आहेत. हे स्तंभ ३ फूट उंच लाकडी कठड्याने एकमेकांना जोडलेले आहेत. स्तंभांवरील तुळईवर लाकडी तख्तपोशीचे काम केलेले आहे. सभामंडपाच्या जमिनीवर मध्यभागी एक दगडी कासवशिल्प कोरलेले आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्याला डाव्या आणि उजव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपामध्ये गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर, प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन देवकोष्टके आहेत. यातील एका कोनाड्यात गणपतीची आणि दुसऱ्या कोनाड्यात यक्षाची मूर्ती आहे.
सभामंडप ओलांडल्यानंतर गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारावर नक्षीदार स्तंभशाखा कोरलेल्या आहेत. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे,
तर मंडारकावर कीर्तिमुख आहे. या दारालाही लाकडी झडपा बसवलेल्या आहेत. मुख्य गर्भगृह प्रवेशद्वाराच्या पातळीपेक्षा थोडे खोल आहे. त्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायरीवर चालुक्य साम्राज्याची राजमुद्रा किंवा खूण म्हणून एक यक्ष शिल्प कोरलेले आहे. पंडित विज्ञानेश्वर हे चालुक्य सम्राट विक्रमादित्या सहावा यांच्या पदरी असल्याच्या इतिहासाची साक्ष देणारा एक प्राचीन शिलालेख याच ठिकाणी पाहायला मिळतो. गर्भगृहाच्या जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंड प्रतिष्ठित आहे. या शिवपिंडीवर पितळी आच्छादन बसवलेले आहे. पिंडीवर अखंड जलधारा धरण्यासाठी छताला एक पितळी अभिषेकपात्र टांगलेले आहे आणि बाजूला एक पितळी त्रिशूळ ठेवलेला आहे. गर्भगृहाच्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत; मागील भिंतीतील देवकोष्टकात पार्वतीदेवीची पितळी मूर्ती आहे. तसेच जमिनीवर विज्ञानेश्वर महादेवाचे पितळी मुखवटे ठेवलेले आहेत. गर्भगृहाच्या छतावर बाहेरील बाजूस चालुक्य-नागर शैलीतील शिखर उभारलेले आहे. या मुख्य शिखरावर उरुशृंग प्रकारची अनेक लहान शिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागावर आमलक आहे. या आमलकावर सुवर्ण कलश आणि धर्मध्वज लावलेला आहे.
मुख्य मंदिरापासून काही अंतरावर प्रांगणामध्ये एक यज्ञमंडप बांधलेला आहे. या यज्ञमंडपाच्या मध्यभागी यज्ञकुंड आहे. मंदिराच्या अगदी मागील बाजूस स्वामी आनंद सरस्वती यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानापासून काही अंतरावर त्यांची समाधी स्थित आहे. या महंतांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य केले तसेच मंदिरात अन्नछत्र सुरू केले. महाराजांच्या निवासस्थानाला लागूनच सोमेश्वर महादेव आणि निळकंठेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर प्रांगणात एका वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. हे मंदिर सामायिक लाकडी सभामंडप आणि दोन गर्भगृहे अशा स्वरूपात आहे. मंदिराच्या उजव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये जमिनीवर सोमेश्वर महादेवाची स्वयंभू शिवपिंड प्रतिष्ठित आहे, तर डाव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये निळकंठेश्वर महादेवाची शिवपिंड आहे. या डाव्या गर्भगृहाच्या मागील भिंतीलगत असलेल्या वज्रपीठावर कालभैरव देवाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती स्थापित केलेली आहे.
मुख्य मंदिराच्या मागे एक प्राचीन दत्तमंदिर आहे. असे सांगितले जाते की या ठिकाणी विज्ञानेश्वरांना दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते. या मंदिराची रचनासुद्धा सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. बंदिस्त सभामंडपाची प्रवेशद्वाराकडील बाजू पूर्णपणे खुली आहे. तेथे एकमेकांना अर्धचंद्राकार कमानींनी जोडलेले चार स्तंभ आहेत. सभामंडपाच्या आत उजव्या आणि डाव्या बाजूला दोन स्वतंत्र कक्ष बांधलेले आहेत.
पुढे गर्भगृहाचे अरुंद प्रवेशद्वार आहे; त्याच्या ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे, तर मंडारक भागावर चंद्रशिळा आहे. या प्रवेशद्वाराला लाकडी झडपा लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या आत डाव्या बाजूच्या भिंतीलगत असलेल्या वज्रपीठावर एकमुखी आणि चतुर्भुज श्री दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या समोरील भिंतीलगतच्या वज्रपीठावर गरुड आणि लक्ष्मीदेवी यांच्या मूर्ती आहेत, तर उजव्या बाजूच्या भिंतीलगत खांबलिंगेश्वर प्रतिष्ठित आहे. या मंदिराच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या वरील थरामध्ये उरुशृंग प्रकारची आठ लहान शिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागावर आमलक त्यावर कळस आहे. मंदिराच्या अगदी पाठीमागून गोदावरी नदीचे पात्र वाहते. नदीच्या तीरावर एक घाट बांधण्यात आला आहे. याच घाटावर दरवर्षी दिवाळीमध्ये साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवात सुमारे एक लाख दिवे प्रज्वलित केले जातात.
या मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि सण साजरे केले जातात. महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार हे येथील मुख्य उत्सव आहेत. या प्रसंगी जिल्ह्यातील अनेक भागांतून हजारो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येथे येतात. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा असते. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे रामनवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत सलग सात दिवस उत्सव साजरा केला जातो. या काळात मंदिरात अखंड यज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षी या मंदिरातून आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूर व आळंदीसाठी भाविकांची दिंडी प्रयाण करते. याशिवाय मंदिरात दसरा, दिवाळी, नागपंचमी, कार्तिक पौर्णिमा आणि हनुमान जयंती हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. वर्षभरात मंदिरात हरिनाम सप्ताह, रामकथा आणि शिवस्तोत्रयाग यांसारख्या आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व उत्सवांच्या निमित्ताने मंदिरात अखंड भजन, कीर्तन आणि प्रवचन यांसारखे कार्यक्रम पार पडतात. दर सोमवारी विज्ञानेश्वर शिवपिंडीला फुलांचा विशेष शृंगार केला जातो. या मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी असते.