शाक्तपंथाचा उदय इसवी सन पूर्व पाच हजार वर्षे पूर्वीचा मानला जातो. त्यानंतर मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्य अर्थात दुर्गासप्तशती या ग्रंथाने शाक्तपंथीय उपासनेला सुनियोजित आणि व्यवस्थित रूप दिले. शाक्तपंथाचा प्रसार भारत, श्रीलंका, इंडोनेशिया आणि कंबोडिया या देशांमध्ये झाल्याचे पुरावे आढळतात, असे अभ्यासक सांगतात. मराठवाड्यात आजही शाक्तपंथाचा मोठा प्रभाव आहे, त्यामुळे या भागात ठिकठिकाणी देवीची प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे पाहायला मिळतात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील दहेगाव येथील रेणुका देवीचे मंदिर याच प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या देवीच्या दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षे जुने आहे. या मंदिराविषयी एक स्थानिक आख्यायिका प्रचलित आहे. ती अशी की दहेगावजवळ बोडखा गावाची ग्रामदेवता शिलादेवी आहे. शिलादेवी ही रेणुका देवीची लहान बहीण आहे, असे मानले जाते. ऐतिहासिक काळात एकदा बोडखा गावावर मोठे अस्मानी संकट आले. त्या वेळी शिलादेवीने आपली मोठी बहीण रेणुका देवीचा धावा केला. तेव्हा रेणुका देवीने आपली शक्ती आरतीच्या रूपाने शिलादेवीकडे पाठवली. रेणुका देवीकडून मिळालेल्या या शक्तीच्या बळावर शिलादेवीने गावावर आलेले संकट दूर केले. त्यानंतर कृतज्ञता म्हणून त्यांनी रेणुका देवीला साडी आणि चोळी भेट पाठवण्याची सुरू केलेली प्रथा आजही परंपरेने सुरू आहे. शारदीय नवरात्र उत्सवात रेणुका देवीच्या मंदिराततून शिलादेवीला आरती पाठवली जाते, तसेच वैशाख महिन्यात शिलादेवीच्या मंदिरातून रेणुका देवीसाठी साडीचोळी आणली जाते.
हे मंदिर दहेगावजवळच मुख्य रस्त्याच्या कडेला आहे. मंदिराच्या समोर वाहने उभी करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिराला दोन तटबंदी आहेत, त्यांमधील एक प्राचीन तर दुसरी नवनिर्मित आहे. बाहेरील नवीन तटबंदीमध्ये एक प्रवेशद्वार आहे. या नवीन तटबंदीपासून प्राचीन तटबंदीकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत. मंदिराची दुसरी अंतर्गत तटबंदी प्राचीन काळातील आहे. ही तटबंदी सुमारे पंधरा फूट उंच आणि अतिशय मजबूत आहे. या जुन्या तटबंदीचे प्रवेशद्वार जमिनीपासून सुमारे दोन फूट उंचावर आहे, त्यामुळे आत जाण्यासाठी दोन पायऱ्या चढून जावे लागते. या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची सुंदर नक्षी कोरलेली आहे. द्वारशाखेच्या वरच्या पट्टीच्या मध्यभागावरील ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. तसेच प्रवेशद्वारावर महिरपीचे तोरण दिसते. या प्रवेशद्वाराच्या समोरील दोन्ही बाजूंना ‘मृगासन’ नामक ओटे आहेत. दूरवरून आलेल्या भाविकांना क्षणभर विश्रांती घेता यावी यासाठी प्राचीन काळात अशा ओट्यांची सोय केली जात असे, असे अभ्यासकांचे मत आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला भिंतीमधील देवकोष्टकात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत.
मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात पुजारी आणि सेवेकऱ्यांची निवासस्थाने, भक्तनिवास, देवस्थानचे कार्यालय आणि इतर इमारती बांधलेल्या आहेत.
मंदिरासमोरील प्रांगणामध्ये दोन मोठे चौथरे आहेत. या चौथऱ्यांवर प्राचीन दीपमाळा उभ्या आहेत. दीपमाळेच्या चौथऱ्यांच्या बाजूला वीरगळ, प्राचीन शिल्पशिळा, गणपती आणि देवीच्या जुन्या मूर्ती आहेत. प्रांगणात मंदिराच्या अगदी समोर सुमारे तीन फूट उंच चौथरा आहे. या चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर चार खांब उभे आहेत. हा भाग मंदिराचा वाहनमंडप असावा आणि प्राचीन काळात येथे देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प असावे, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात.
या मंदिराची रचना प्रामुख्याने सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी विभागलेली आहे. मुख्य मंदिराच्या समोर अर्धखुल्या स्वरूपाचा एक रांगमंडप आहे. मंडपातील एका दगडी आसनावर सिंहाचे शिल्प आहे. याच्या पुढे सभामंडपाचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर नक्षीकाम केलेले आहे आणि ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. पायरीच्या खालच्या भागात गोलाकार चंद्रशिळा कोरलेली आहे. सभामंडपामध्ये नक्षीदार खांबांच्या चार रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत चार खांब आहेत. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यामुळे बाहेरील बाजूचे खांब भिंतीतच समाविष्ट आहेत. सर्व खांब चौकोनी पीठांवर उभे आहेत. खांबांच्या मध्यभागावर चौकोन, षटकोन, अष्टकोन आणि वर्तुळ असे विविध भूमितीय आकार कोरलेले दिसतात. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी कोरलेली आहे.
अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवकोष्टके आहेत. या कोनाड्यांमध्ये देवांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. त्याच्या पुढे गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार येते. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालिकांची शिल्पे आहेत. द्वारशाखेवर उभ्या धारेचे नक्षीकाम केलेले आहे. वरच्या बाजूला गणपतीचे शिल्प आहे आणि तोरणावर लहान शिखरांची शिल्पे कोरलेली आहेत. पायरीपाशी चंद्रशिळा आणि कीर्तिमुख कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराला लाकडी दरवाजे लावले आहेत. गर्भगृहाच्या आत एका वज्रपीठावर रेणुका देवीची तांदळा स्वरूपातील दगडी मूर्ती विराजमान आहे. वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आहे. छताला देवीच्या डोक्यावर चांदीचे छत्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. या शिखराचा पहिला थर अष्टकोनी आकाराचा आहे. या थराच्या आठ कोपऱ्यांवर खांबांच्या आकाराची आठ लहान शिखरे तयार केली आहेत. शिखराचा दुसरा थर गोल घुमटासारखा आहे.
त्याच्या सर्वोच्च टोकाला मुख्य कळस आणि ध्वज लावलेला आहे.
मुख्य मंदिराच्या मागील प्रांगणात परशुरामाचे एक स्वतंत्र मंदिर आहे. पौराणिक संदर्भानुसार परशुराम हे रेणुका देवीचे पुत्र मानले जातात. या मंदिराच्या समोर एक यज्ञकुंड तयार केलेले आहे. परशुराम मंदिराच्या आत एका दगडी वज्रपीठावर परशुरामाची शेंदूर लावलेली पाषाण मूर्ती स्थापित आहे. या मंदिराच्या छतावर गोल घुमटाकार शिखर बांधलेले आहे.
शारदीय नवरात्र उत्सव हा या मंदिराचा मुख्य वार्षिक उत्सव आहे. या उत्सवाच्या काळात सलग दहा दिवस हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि आपले नवस फेडण्यासाठी येथे येतात. नवरात्र काळात मंदिरामध्ये जागरण आणि गोंधळाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आराधी तसेच वाघ्या-मुरळी यांचे पारंपरिक नृत्य आणि संगीत देवीच्या सेवेसाठी सादर केले जाते. या नवरात्र उत्सवात रेणुका देवीच्या मंदिरातून शिलादेवीच्या मंदिरामध्ये मानाची आरती पाठवण्याची परंपरा पाळली जाते. या मंदिरात वर्षभरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष व श्रावण महिना, नागपंचमी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा तसेच शाकंभरी नवरात्र असे विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. वैशाख महिन्यात देवीची वार्षिक जत्रा असते. या जत्रेच्या वेळी बोडखा येथील शिलादेवीच्या मंदिरातून रेणुका देवीसाठी साडी आणि चोळी भेट म्हणून आणली जाते. वर्षभरातील प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी देवीच्या दर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते. दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.