महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील देवीची बहीण अथवा मूळरूप म्हणून वणी गावातील जगदंबा मातेस मान्यता आहे. महिषासुर राक्षसाचा वध करण्यासाठी जगदंबेने सप्तशृंगीचे रूप घेतले होते. या रूपात देवीने महिषासुराचा वध करून विसावा घेण्यासाठी सप्तृशृंगी गडावर वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. गडावरील देवीचे दर्शन घेतल्यानंतर वणी गावातील जगदंबा मातेचे दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नाशिक-सापुतारा मार्गावर महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेवर सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी वणी गाव वसले आहे. बांबूचे घनदाट ‘वन’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन वणी हे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. सप्तशृंगी गडापासून सुमारे १५ किमी अंतरावर वणी गाव आहे. येथेच जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका कमानीतून मंदिर परिसरात प्रवेश होतो. बांधकामात लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर असलेले देवीचे हे प्राचीन दुमजली मंदिर आहे.
या मंदिरातील जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापित केल्याची नोंद आहे. पेशवेकाळात या परिसरात मंदिर व कुंडे बांधली गेली. त्यानंतर अनेकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मुख्य मंदिरासमोर नव्याने सभामंडप बांधलेला असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आतील बाजूस सहा फूट उंचीची जगदंबा देवीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे.
पूर्वीची कागद्याच्या लगद्यापासून बनलेली देवीची मूळ मूर्ती जीर्ण झाल्याने १९५१ मध्ये तांब्याच्या धातूपासून बनविलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. येथे जमिनीखाली १० ते १२ फुटांवर स्वयंभू चार चिरंजीव आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश व नारायण हे देवीचे चार पुत्र समजले जातात. येथे त्यांच्या शिळा आहेत. त्यावर हळदी-कुंकू, गुलाल व भंडारा टाकून ही खोली भरण्यात आली आहे. त्यावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चांदवड येथील रेणुका मातेप्रमाणे जगदंबेचे येथे फक्त शिर आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडलेल्या सोन्याची नथ, मंगळसूत्र असा साजशृंगार असतो.
अहिल्यादेवी होळकर, गौतमीबाई गुजराथी यांनी या मंदिर परिसरातील धर्मशाळेसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. जगदंबा देवी मंदिर परिसरात रामानंद स्वामींचा मठ, शिवमंदिर व गणपतीचे मंदिर आहे. श्री सप्तशृंगी (जगदंबा) देवी ट्रस्टतर्फे प्रशस्त भक्तनिवास बांधण्यात आला असून तेथे अल्पदरात भाविकांना निवासाची सुविधा दिली जाते.
गडावरील सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच वणी गावातही यात्रा भरते. या यात्रेसाठी हजारो भाविक पदयात्रेने दर्शनासाठी येत असतात. परंपरेनुसार गडावर येणारे भाविक येथील जगदंबादेवीचे दर्शन घेतल्यावर मार्गस्थ होतात. तसेच नवसपूर्तीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने अशा भाविकांचे नवसपूर्ती कार्यक्रम जगदंबा माता मंदिरात सुरू असतात. नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात हजारो महिला भाविक घटी बसतात. घटी बसलेल्या महिलांसाठी मंदिर ट्रस्टच्यावतीने निवास सुविधा, फराळ व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
दररोज सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत भाविकांना जगदंबेचे दर्शन करता येते. नवरात्रोत्सवाच्या काळात २४ तास भाविकांना येथे दर्शन घेता येते. दररोज सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा व ९ वाजता आरती, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती व रात्री ७.३० वाजता सांज आरती होते. असे सांगितले जाते की, नवरात्रोत्सवाच्या काळात पाच लाखांहून अधिक भाविक जगदंबेच्या दर्शनासाठी येतात.