श्रीराम मंदिर

बाचेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात बाचेगाव नावाचे एक ऐतिहासिक गाव आहे. या गावात असलेले श्रीराम मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. काळाच्या ओघात परकीय आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरे केवळ लोकश्रद्धेच्या बळावर कशी जपली जातात, याचे हे मंदिर एक उत्तम उदाहरण आहे. आज या मंदिराचे प्राचीन सौंदर्य आणि भव्यता नष्ट झाली असली, तरी येथील देवावर असलेली निखळ श्रद्धा मात्र कायम आहे. ही श्रद्धा मंदिराच्या भव्यतेवर, तिथल्या स्तंभांवर किंवा भिंतींवरील शिल्पसौंदर्यावर नसून केवळ पूज्य देवांच्या मूर्तीवर आहे. याच कारणामुळे ऐतिहासिक काळात मंदिर भुईसपाट झाले तरीही श्रद्धेय मूर्तीचे जतन करून भाविकांनी आपापल्या कुवतीनुसार या मंदिराचे पुनर्निर्माण केले. बाचेगाव येथील श्रीराम मंदिर हे त्यापैकीच एक आहे आणि येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
या देवस्थानाचा इतिहास पाहिला तर हे मंदिर सुमारे बाराव्या ते तेराव्या शतकातील असावे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मूळचे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असलेल्या या मंदिराची काळाच्या ओघात मोठी पडझड झाली होती. मंदिराची पडझड होण्याचे आणि येथील मूर्ती खंडित होण्याचे मुख्य कारण परकीय आक्रमण असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करतात. मंदिराचे भग्न अवशेष गोळा करून येथील ग्रामस्थांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी मंदिराचे पुनर्निर्माण केले. त्यावेळी परिसर स्वच्छ करताना सुस्थितीत सापडलेल्या मूर्तींची मंदिरात पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली आणि नियमित पूजापाठ सुरू झाले. या सगळ्या खटाटोपात बऱ्याच प्राचीन परंतु कमालीच्या खंडित झालेल्या मूर्तींना शास्त्रोक्त पद्धतीने जलसमाधी द्यावी लागली, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करतात. या सर्व घडामोडींमध्ये येथील प्राचीन बारव मात्र बऱ्यापैकी पूर्वस्थितीत टिकून राहिली. पुढे सन १९७५ मध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराचा पुन्हा एकदा पुनर्जीर्णोद्धार केला.
मुख्य गावापासून जवळ असलेल्या या मंदिरापर्यंत येण्यासाठी आता पक्की सडक उपलब्ध आहे. मंदिराच्या समोर वाहने उभी करण्यासाठी प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराभोवती सुमारे दोन फूट उंचीची एक साधी कुंपण भिंत बांधलेली आहे. या कुंपणाला एक साधेसे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या पेव्हरब्लॉक बसवलेल्या प्रांगणात मोठी वृक्षे असल्यामुळे येथे छान हिरवळ आणि गारवा असतो. मंदिराच्या समोरच एक तुलसी वृंदावन आहे. या प्रशस्त प्रांगणामध्ये पूजासाहित्याची दुकाने, सेवेकऱ्यांची निवासस्थाने, भाविकांच्या सुविधेसाठी मंगल कार्यालय आणि इतर वास्तू बांधलेल्या आहेत.
या प्रांगणात मंदिराच्या समोर कोरीव पाषाणात बांधलेली एक प्राचीन बारव हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. बारवेत उतरण्यासाठी समोरासमोर दोन पायऱ्यांचे मार्ग तयार केलेले आहेत. पूर्वीच्या काळी बारवेतून पाणी काढण्यासाठी येथील स्तंभांवर पाण्याचे रहाट बसवलेले होते. परंतु मंदिराचा जीर्णोद्धार करताना बऱ्याच खंडित गोष्टी काढून टाकाव्या लागल्या. त्यातच बारवेजवळ असलेली नंदीची खंडित मूर्तीही काढून टाकावी लागली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. बारवेच्या आतील भिंतींमध्ये सुंदर देवकोष्टके कोरलेली असून त्यात श्रीदत्तात्रेय, सप्तमातृका, गणपती आणि पार्वती अशा विविध देवी-देवतांच्या प्राचीन मूर्ती विराजमान आहेत. मंदिरासमोरील प्रांगणात बारवेजवळ दोन्ही बाजूला वज्रपीठांवर नंदीची शिल्पे बसवलेली आहेत. पूर्वीचा पुरातन नंदी खंडित झाल्याने त्याचे विसर्जन करण्यात आले आणि हे नंदी अलीकडील काळात घडवले असल्याचे सांगितले जाते. श्रीराम मंदिरात नंदीची असलेली प्राचीन उपस्थिती, शिवपिंडीची स्थापना आणि बारवेमध्ये कोरलेली सप्तमातृका व इतर शैव देवकोष्टके हे स्पष्ट दर्शवतात की हे मूळ मंदिर यादव काळातील हरिहर किंवा शिव स्वरूप असण्याची दाट शक्यता आहे.
या मंदिराची रचना दुमजली सभामंडप आणि अंतराळ अशा स्वरूपाची आहे. सभामंडपाचे मुख्य प्रवेशद्वार प्रांगणाच्या जमिनीपेक्षा थोडे उंचावर बांधलेले असून या प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या या साध्याशा प्रवेशद्वाराला मजबूत लाकडी झडपा लावलेल्या आहेत. सभामंडपाच्या आत चार कोनांवर सिमेंट काँक्रीटचे चार मुख्य स्तंभ उभे आहेत, तसेच चारही भिंतींमध्ये प्रत्येकी चार लाकडी स्तंभ बसवलेले आहेत. या स्तंभांवरील लाकडी हस्तांवर मजबूत तुळई टेकवलेली असून त्या तुळईवर लाकडी तख्तपोशी केलेली दिसते. या तख्तपोशीवरील लाकडी स्तंभांवर दुसऱ्या मजल्याचे छत आहे. दुसऱ्या मजल्यावर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडील बाजूला एक सज्जा काढलेला असून या सज्जाला लोखंडी कठडा लावलेला आहे.

या सभामंडपामध्ये मधोमध मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपाच्या जमिनीपेक्षा थोडे उंचावर बांधलेले असून या प्रवेशद्वारास एक पायरी आहे. या साध्याशा प्रवेशद्वाराला लाकडी झडपा बसवलेल्या आहेत. गर्भगृहात प्रवेश करताच मागील भिंतीलगत मध्यभागी शेषशायी विष्णूची अत्यंत देखणी मूर्ती दृष्टीस पडते. या मूर्तीमध्ये विष्णूच्या नाभीतून निघालेल्या पद्मपुष्पावर ब्रह्मदेव बसलेले असून त्यांच्या पायाशी माता लक्ष्मी सेवा करताना दिसते. या संपूर्ण शिल्पशिळेमध्ये वरच्या बाजूला देव-दानवांनी केलेला समुद्रमंथनाचा प्रसंग अतिशय सुरेख रीतीने कोरलेला आहे. तसेच या मूर्तीशिळेवर हत्ती आणि घोडे यांची चित्रेही कोरलेली आहेत. भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित केलेली आहे, तर डाव्या बाजूला एक पवित्र नागशिळा ठेवलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच लक्ष्मणाची मूर्ती बसवलेली आहे आणि जमिनीवर मध्यभागी एक शिवपिंडी प्रतिष्ठित आहे. अशा प्रकारे हे विष्णू, श्रीराम, लक्ष्मण, शिवपिंडी आणि नागशिळा यांचे मिळून एक अनोखे पंचायतन असल्याचे मंदिराचे पुजारी सांगतात. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणामार्ग तयार केलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी आकाराचे नक्षीदार शिखर बांधलेले आहे. या शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.

बाचेगावच्या या मंदिरामध्ये रामनवमी हा मुख्य वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत सलग नऊ दिवस हा जन्मोत्सव सोहळा चालतो. या नऊ दिवसांच्या काळात मंदिरात रोज भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील हजारो भाविक देवांच्या दर्शनासाठी आणि आपले नवस फेडण्यासाठी मंदिरात गर्दी करतात.

या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे पाळला जाणारा बारा गाडे ओढण्याचा ऐतिहासिक रिवाज होय. ज्या भाविकांनी देवाला नवस बोललेला असतो, ते भाविक एकमेकांना जोडलेले बारा गाडे तब्बल आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून स्वतः ओढत मंदिरापर्यंत आणतात. हा सोहळा पाहण्यासाठी मोठी मांदियाळी जमते.

याच वेळी प्रभू श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूकही काढली जाते. रामनवमीव्यतिरिक्त या मंदिरात दसरा, दिवाळी, संपूर्ण श्रावण मास, मार्गशीर्ष मास, महाशिवरात्री आणि नागपंचमी हे सण व उत्सवसुद्धा अतिशय उत्साहात साजरे केले जातात. तसेच प्रत्येक आठवड्यातील सोमवार, गुरुवार आणि महिन्यातील पौर्णिमा व अमावस्या या तिथींना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मंदिरात मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • घनसावंगीपासून १३ किमी अंतरावर
  • जालना शहरापासून ५३ किमी अंतरावर
  • घनसावंगी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

श्री राम मंदिर

बाचेगांव, घनसावंगी, जिला. जलना

Back To Home