रुद्रेश्वर हे भगवान महादेवाच्या अनेक नावांपैकी एक विशेष नाव आहे. ‘रुधिर’ म्हणजे रक्त आणि ‘रुद्र’ म्हणजे कोपिष्ट किंवा उग्र स्वभाव. वाईट गोष्टी आणि प्रवृत्ती सहन न झाल्यामुळे त्यांचा समूळ नाश करण्यासाठी महादेव उग्र रूप धारण करून तांडव नृत्य करतात. या नृत्यातून निर्माण होणाऱ्या अग्नीतून सर्व वाईट गोष्टी नष्ट होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. याच वाईट प्रवृत्तींच्या नाशासाठी रुद्रेश्वर महादेवाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. भारतभरात रुद्रेश्वर महादेवाची अनेक प्राचीन देवालये पाहायला मिळतात. मराठवाड्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेत जालना जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. याच जालना जिल्ह्यातील नेर या गावी रुद्रेश्वर महादेवाचे एक अत्यंत जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे. येथील देवाच्या जागृततेची प्रचिती येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेले हे मंदिर परिसरातील एक प्रमुख धार्मिक केंद्र मानले जाते.
नेर हे गाव प्राचीन काळी एक महत्त्वाची व्यापारपेठ होते. या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
त्यापैकीच हे एक मंदिर आहे. हे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. याविषयी कोणताही ठाम पुरावा उपलब्ध नसला, तरी मंदिराची रचना आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम पाहता हे मंदिर पाचशे ते सहाशे वर्षे जुने असावे, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. बारावे शतक हा महाराष्ट्रात यादव राजांचा काळ होता. या काळात दगडी बांधकामाची अनेक भक्कम मंदिरे उभारली गेली, त्यातीलच हे एक मंदिर असावे. गावाजवळ रस्त्यालगत हे मंदिर वसलेले आहे. मंदिरासमोर कोरीव पाषाणात बांधलेली एक प्राचीन बारव आहे. या बारवेच्या आसपास मंदिराचे अनेक प्राचीन अवशेष विखुरलेले पाहायला मिळतात. यामध्ये मंदिराचे प्राचीन स्तंभ आणि काही शिल्पांचा समावेश होतो. बारवेजवळच एक शिवपिंड ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी या बारवेच्या पाण्याचा वापर देवाला अभिषेक करण्यासाठी केला जात असे.
हे मंदिर सुमारे तीन फूट उंचीच्या दगडी अधिष्ठानावर उभारलेले आहे. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवलेले प्रशस्त प्रांगण आहे. या अधिष्ठानावर येण्यासाठी तीन पायऱ्या बांधलेल्या आहेत. अधिष्ठानावरील वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना स्तंभांवरील नक्षी आणि सुरसुंदरींची शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला चक्राच्या आकाराची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची सुंदर नक्षी कोरलेली आहे.
याच्या ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प व मंडारकावर कीर्तिमुख कोरलेले आहे. तसेच प्रवेशद्वारावर कोरलेले महिरपी तोरण पाहायला मिळते.
येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. आत उजेड आणि हवा येण्यासाठी भिंतींमध्ये वातायने (खिडक्या) ठेवलेली आहेत. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका वज्रपीठावर बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतीकात्मक शिवपिंडी स्थापन केलेल्या आहेत. एकाच पाषाणात घडवलेल्या या सर्व शिवपिंडी अतिशय अनोख्या आहेत.
एकाच दगडात बारा ज्योतिर्लिंगे कोरण्याची कला मराठवाड्यातील काही मोजक्याच प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळते. या वज्रपीठाच्या बाजूला नागशिल्प ठेवलेले आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीमध्ये प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन देवकोष्टके आहेत. त्यामध्ये अनुक्रमे श्रीविष्णू आणि ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. सभामंडपाचे छत भिंतींवर तोललेले आहे. अलीकडील काळात या भिंतींना सिमेंटचा गिलावा केल्यामुळे भिंतींमध्ये असलेले मूळ स्तंभ आता अदृश्य झाले आहेत.
अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना दोन नक्षीदार स्तंभ उभारलेले आहेत. अंतराळात डाव्या आणि उजव्या बाजूला दोन देवकोष्टके आहेत.
त्यामध्ये अनुक्रमे गौरीहर आणि गणपती यांच्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहेत. याच्या पुढे गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर पर्णशाखा, पुष्पशाखा आणि स्तंभशाखा कोरलेल्या आहेत. द्वारशाखांवर खालच्या बाजूला गंगा, यमुना, भैरव द्वारपाल आणि द्वारपालिका यांची शिल्पे कोरलेली आहेत.
ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. तसेच तोरणामध्ये गजमुखाची (हत्तीच्या मुखाची) शिल्पे आहेत. मंडारकावर चंद्रशिळा कोरलेली असून त्याच्या दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे आहेत. मंडारकाच्या दोन्ही बाजूंनाही गजमुख शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. गर्भगृहामध्ये जमिनीवर मुख्य शिवपिंड स्थापित आहे. गर्भगृहाचे अष्टकोनी आकाराचे छत भिंतींवर तोललेले आहे. या छताच्या (वितानाच्या) मध्यभागी चक्राची नक्षी कोरलेली आहे.
मंदिराच्या बाह्यभागात सभामंडपाच्या भिंतींवर सुरसुंदरींची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या बाह्य अंगावर (मंडोवरावर) स्तंभांची नक्षी आहे. मंदिराच्या छतावर चारही बाजूंनी बाशिंगी आकाराचा कठडा बांधलेला आहे. या कठड्यामध्ये समोरील बाजूला तीन देवकोष्टके आहेत. त्यामध्ये गौरीहर, गणपती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. या कठड्यामध्ये डाव्या, उजव्या आणि मागील बाजूला देखील देवकोष्टके आहेत. त्यामध्ये विविध देवीदेवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. या कठड्यावर जागोजागी छोट्या आकाराची कूट शिखरे (मिनिएचर शिखरे) तयार केलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे मुख्य शिखर उभारलेले आहे. या शिखराचा खालचा थर चौकोनी आकाराचा असून त्याच्या चारही दिशांना देवकोष्टके आहेत. शिखराचा दुसरा थर गोल घुमटासारखा आहे. शिखराच्या सर्वात वरच्या भागावर (शीर्षभागी) स्तूपिका आहे आणि त्यावर कळस बसवलेला आहे.
महाशिवरात्रीला येथे मुख्य वार्षिक उत्सव साजरा केला जातो. याशिवाय वैकुंठ चतुर्दशी, आमली बारस आणि देव दिवाळी हे उत्सवदेखील मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सर्व उत्सवांच्या वेळी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात, विशेषतः सर्व सोमवारी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे आवर्जून येतात. उत्सवांच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली जातात आणि भजनाचे कार्यक्रम पार पडतात. उत्सवांच्या वेळी भाविकांसाठी विशेष सेवा म्हणून अन्नदान केले जाते. सोमवार, प्रदोष, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी महादेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची मंदिरात मोठी गर्दी असते. दररोज सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना येथे दर्शन घेता येते.