माळाचा गणपती संस्थान

अहंकार देऊळगाव, ता. जि. जालना

जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यात अहंकार देऊळगाव नावाचे एक गाव आहे व ते नंदापूर म्हणूनही ओळखले जाते. येथे श्री माळाचा गणपती संस्थान नावाचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराची स्थापना श्री रंगनाथ स्वामी यांनी केलेली आहे. सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी एका विस्तीर्ण माळावर या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यामुळे याला ‘माळाचा गणपती’ असे म्हटले जाते. येथे असलेला गणपती नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गुरु-शिष्य परंपरेचा वारसा सांगणारे हे मंदिर भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. या मंदिरात भाविक आणि वारीतील वारकरी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. विशेषतः नवीन लग्न झालेली जोडपी सुखी संसारासाठी या गणेशाचे आशीर्वाद घ्यायला येथे येतात.

मंदिराच्या स्थापनेबद्दल असे सांगितले जाते की शेगावचे संत गजानन महाराज दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला जात असत. पंढरपूरला जाताना किंवा तेथून परत येताना ते या माळावर विश्रांतीसाठी थांबत असत. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य रंगनाथ स्वामी सुद्धा या वारीमध्ये असायचे. एका वारीच्या वेळी गजानन महाराजांनी रंगनाथ स्वामींना एक कार्य सांगितले. त्यांनी या ठिकाणी एका गणपती मूर्तीची निर्मिती करून तिची स्थापना करण्यास सांगितले. आपल्या गुरूची आज्ञा मानून रंगनाथ स्वामींनी येथीलच एका मोठ्या दगडातून गणपतीची मूर्ती तयार केली. ही मूर्ती ‘सरळ सोंडेची’ असून स्वामींनी ती स्वतः या ठिकाणी प्रतिष्ठित केली. दोन संतांची शक्ती या मूर्तीमध्ये समाविष्ट आहे, असे मानले जात असल्याने या मूर्तीला मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही शेगावची आषाढी वारीची पालखी पंढरपूरहून परत येताना या ठिकाणी विसाव्यासाठी थांबते. हे मंदिर जालना ते सिंदखेड राजा या मुख्य रस्त्यावर आहे. मंदिराच्या समोर वाहने उभी करण्यासाठी मोठी आणि मोकळी जागा उपलब्ध आहे. संपूर्ण मंदिर परिसराच्या बाजूने एक मजबूत तटबंदी बांधलेली आहे. या भिंतीमध्ये एक मोठे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा उंचावर असून तिथे जाण्यासाठी पाच पायऱ्या चढाव्या लागतात. या प्रवेशद्वारापेक्षा मंदिराचे मुख्य प्रांगण आणखी उंचावर आहे, त्यामुळे प्रांगणात जाण्यासाठी भाविकांना पुन्हा पाच पायऱ्या चढाव्या लागतात. मुख्य दरवाजापासून ते मंदिराच्या सभामंडपापर्यंत एक लांब रांगमंडप बांधलेला आहे. हा रांगमंडप लोखंडी खांबांवर उभा असून त्यावर पत्र्याचे अर्धवक्राकार छत आहे.

मंदिराचे प्रांगण पेव्हर ब्लॉक लावून तयार केले आहे. या प्रांगणात काही मोठी झाडे असून भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकडे लावले आहेत. येथे असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे, कारण याच झाडाखाली बसून रंगनाथ स्वामींनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. प्रांगणामध्ये देवस्थानचे कार्यालय, सेवा करणाऱ्या लोकांसाठी निवासाच्या खोल्या, भाविकांसाठी अन्नछत्र आणि मंगलकार्यासाठी एक सभागृह आहे. मंदिराची मुख्य रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागांत आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार रांगमंडपापेक्षा थोडे उंच आहे. येथील सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा व अष्टकोनी आकाराचा आहे. या सभामंडपात आठ नक्षीदार खांब आहेत. हे सर्व खांब एका चौकोनी पायावर उभे असून त्यांच्यावर कुंभ आणि कमळाच्या पाकळ्यांची नक्षी आहे. खांबांच्या वरच्या भागात कणी, हस्त व त्यावर मंदिराचे छत तोलले आहे. या छताला एक पितळी घंटा टांगलेली आहे. छताच्या आतील बाजूवर चक्राची नक्षी आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एका उंच चौथऱ्यावर गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाचे शिल्प आहे. त्याच्या हातात एक मोदक आहे.

सभामंडपाच्या पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. या दरवाजाच्या चौकटीवर खांबांची नक्षी आहे. वरच्या बाजूला बल्लाळेश्वर गणपतीचे छोटे शिल्प आहे. अंतराळात मेजावर गणेशाची चांदीची उत्सव मूर्ती ठेवलेली आहे. भाविकांना गर्दीच्या वेळी येथूनच गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. याच्या पुढे मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर आणि लाकडी मखरामध्ये गणपतीची पाषाण मूर्ती आहे. ही मूर्ती शेंदूरचर्चित व सरळ सोंडेची आहे. मुख्य गणपती मूर्तीच्या जवळच एक छोटी बाळ गणेशाची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की या दोन्ही मूर्ती एकाच पाषाणातून तयार केलेल्या आहेत. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व समोर एक मूषक शिल्प आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपाच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. या कठड्यावर आठ दिशांना असलेल्या देवकोष्टकांमध्ये अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर दक्षिण भारतीय पद्धतीचे पाच थरांचे एक चौकोनी आणि उंच शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरात शुभचिन्हे आणि खांबांची नक्षी आहे. शिखराच्या सर्वात वरच्या टोकावर सोनेरी कळस आणि ध्वज लावलेला आहे.

मंदिराच्या समोरच्या प्रांगणात भिंतीला लागूनच एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली मारुतीचे एक छोटे मंदिर आहे. या मंदिरात मारुतीची शेंदूर लावलेली दगडी मूर्ती आहे. मारुती मंदिराच्या डाव्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात जमिनीवर शिवपिंड असून त्यावर तांब्याचा नाग आणि चांदीचे अभिषेक पात्र आहे. पिंडीच्या जवळ त्रिशूळ असून समोर काळ्या दगडाचा नंदी आहे. तसेच मंदिर परिसरात माता अन्नपूर्णा देवीचे देखील छोटे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांवर उंच आणि नक्षीदार शिखरे आहेत.

माळाचा गणपती संस्थानात माघी गणेशोत्सव म्हणजेच गणेश जयंती हा वर्षातील सर्वात मोठा सण असतो. याशिवाय भाद्रपद महिन्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होतो. या काळात गायक आनंद शिंदे आणि लेखक चंद्रकांत निर्भवणे यांनी तयार केलेली गणपतीची भक्तीगीते मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर लावली जातात. ‘माळाचा गणपती’ हे त्यांचे गाणे भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला येथे छोटेखानी जत्रा भरते. या सर्व सणांच्या वेळी जालना आणि आसपासच्या जिल्ह्यांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या दिवसांत मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंगळवार आणि रविवारी दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. दररोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथील गणपतीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • जालना येथून १४ किमी अंतरावर
  • जालना व सिंदखेड राजा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क – दादाराव सोमधाने, विश्वस्त, मो. ९६३७५८६०४७, किशोर मिश्रा, विश्वस्त, मो. ९४२२२१९१९०

मलाचा ​​गणपति संस्थान

अहमकर देउलगांव, तालुका, जिला। जलना

Back To Home