सांडव्यावरची देवी

पंचवटी, नाशिक , जि. नाशिक

देवीच्या साडेतीन पीठांपैकी ‘सप्तशृंगनिवासिनी’ हे अर्धपीठ नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सप्तशृंगी मातेची मंदिरे आहेत. केवळ नाशिक शहरात या देवीची पन्नासहून अधिक मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमध्ये पंचवटीतील गोदावरीच्या तीरावर असलेले ‘सांडव्यावरची देवी मंदिर’ प्रसिद्ध आहे. या मंदिराला ‘राजेबहाद्दरांची देवी’ असेही संबोधले जाते.

मंदिराची आख्यायिका अशी की पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. प्रत्येक पौर्णिमेला ते सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनाला जात. हा त्यांचा नित्यनेम अनेक वर्षांपासून सुरू होता. पुढे वार्धक्यामुळे गडावर जाणे-येणे त्यांना कठीण होऊ लागले. देवीचे दर्शन आता नियमितपणे आपल्याला होणार नाही, याची त्यांना खंत वाटू लागली. देवीने त्यांच्या मनातील खंत ओळखली व दृष्टांत देऊन ‘मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन’ असे सांगितले. परंतु हे सांगताना देवीने एक अट घातली ‘मी तुझ्यासोबत येताना तू मागे पाहायचे नाही. जर तू मागे पाहिलेस तर त्याच ठिकाणी मी थांबेन. तेथून पुढे येणार नाही.’ नारोशंकर राजेबहाद्दर यांनी देवीची ही अट मान्य केली. नारोशंकर पुढे व देवी मागे असे करत सप्तशृंगी गडापासून ते निघाले. देवी चालत असताना तिच्या पैंजणांचा आवाज येत होता. गोदावरी तीरावर आल्यानंतर नारोशंकर यांना आपण बांधलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यासाठी ते तेथे थांबले असताना देवीच्या पैंजणांचा आवाज येणे बंद झाले. त्यामुळे नारोशंकरांच्या मनात शंका आली, खरेच देवी आपल्यासोबत येत आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिले तर देवी त्यांच्या समोरच उभी होती. अटीप्रमाणे देवी तेथेच थांबली. देवी जेथे थांबली त्याच ठिकाणी नारोशंकर राजेबहाद्दर यांनी मंदिर बांधले, तेच हे ‘सांडव्यावरची देवी मंदिर’ होय.

गोदावरीच्या पात्रात नारोशंकरांच्या मंदिराला लागूनच या देवीचे मंदिर आहे. थेट नदीपात्रातच हे मंदिर असल्यामुळे पुराच्या वेळी मंदिरात पाणी शिरते. या मंदिरासमोर उंच दगडी दीपमाळ आहे. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिव्यांनी प्रज्वलित केली जाते. रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते.

असे मानले जाते की सांडव्यावरची देवी ही वणी येथील सप्तशृंगनिवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंग गडावरील देवीसारखीच आहे. या मूर्तीला असलेल्या १८ हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानामागे ठेवला असून, जणू देवी भक्तजनांची गाऱ्हाणी ऐकत आहे, असे वाटते. गडावरील सप्तशृंगदेवीचे दर्शन घेतल्यानंतर ‘सांडव्यावरची देवी’चेही दर्शन घेण्याची पद्धत आहे.

गोदावरीच्या पात्रात आता ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे, तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा (कालवा, पाट) होता. या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की, जाणे-येणे बंद होत असे. इतर वेळी ये-जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करीत असत. देवीच्या मंदिराजवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ असे नाव पडले. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवातील देवीचा शृंगार वैशिष्ट्यपूर्ण असतो. पहिल्‍या माळेपासून देवीला दैनंदिन महावस्त्र, तसेच तिच्या शृंगारात नवमीपर्यंत दागिन्यांचा वेगवेगळ्या प्रकारातील साज चढविला जातो. यावेळी शृंगारातील देवीचे रूप आणखी खुलून दिसते. आजही सरदार नारोशंकर यांची चौदावी पिढी या मंदिराचा कारभार सांभाळत आहे.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक एसटी बस स्थानकापासून ३ किमी, तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून १० किमी अंतरावर
  • नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • पंचवटी परिसरात येण्यासाठी नाशिक महापालिका बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने गोदावरीच्या तीरावर थेट येऊ शकतात
Back To Home