जगदंबेच्या ५१ शक्तिपीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली (रेणुकादेवी) ही पूर्णपीठे, तर वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ आहे. सप्तशृंगी गडावर स्थित असलेली ही देवी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरूप असल्याचे मानले जाते. समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे ४५०० फूट उंचीवर आहे.
एका आख्यायिकेनुसार, महादेवांची पत्नी देवी सती ही राजा दक्ष प्रजापतींची मुलगी होय. एकदा दक्ष प्रजापतींनी यज्ञपूजेचे आयोजन केले आणि त्यासाठी महादेव सोडून सर्व देवांना आमंत्रण दिले होते. जेव्हा हे देवी सतीला समजले, तेव्हा तिने वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यावर दक्ष प्रजापतींनी सर्वांसमोर महादेवांची निंदा केली. पतीबद्दल अपमानकारक उद्गार ऐकून सती क्रोधित झाली आणि त्यातच तेथील यज्ञामध्ये तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. महादेवांना जेव्हा हे समजते तेव्हा ते प्रचंड क्रोधीत झाले. त्यांचा क्रोध पाहून देवतांनी तेथून पळ काढला. महादेवांनी त्या यज्ञातून सतीचे मृत शरीर काढले आणि ते घेऊन इकडे-तिकडे भटकू लागले. महादेवांच्या क्रोधामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकतो म्हणून सगळे देव चिंतेत पडले. तेव्हा श्रीविष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. सतीच्या शरीराचे तुकडे आणि दागिने हे वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन पडले. जेथे जेथे सतीच्या शरीराचे तुकडे आणि दागिने पडले ते ठिकाण हे देवीचे शक्तिपीठ बनले. देवीची अशी ५१ शक्तिपीठे असून ती भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये आहेत.
देवीसंदर्भात आख्यायिका अशी की सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक व पुराणे ऐकवीत असत म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून पुराणे ऐकत असल्याचेही म्हटले जाते. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रगट झाली व देवीने महिषासुराचा वध केला. दृष्ट शक्तींच्या विनाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले.
असे सांगितले जाते की सप्तशृंगी म्हणजे सप्त (सात) आणि शृंग म्हणजे शिखर. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध असताना हनुमान आकाशमार्गाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचे सात तुकडे या भागात पडले ते म्हणजे सप्तशृंग पर्वत असल्याचेही म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी नांदुरी या गावात सप्तशृंगी देवीचे प्राचीन स्थान आहे. गडावरील देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे ४०० पायऱ्या आहेत. नव्याने बांधलेल्या पहिल्या पायरीशेजारी म्हसोबा आणि गणपती मंदिर आहे. त्यानंतर रामटप्पा, कासव टप्पा, औदुंबर टप्पा, गणेश मंदिर व गाभाऱ्यात जाण्यापूर्वी उजवीकडे जुन्या मंदिराचे वाघाचे दगडी मुखवटे ठेवलेले आहेत. आता या गडावरील मंदिरात जाण्यासाठी पायथ्यापासून रोप-वेची सुविधाही करण्यात आली आहे. ८ फूट उंचीची दगडात कोरलेली शेंदूरचर्चित देवीची मूर्ती भव्य आणि रौद्र भासते. देवीच्या १८ हातांमध्ये विविध आयुधे आहेत. त्यामुळे या देवीला ‘अष्टादश देवी’ असेही म्हणतात. देवीचा डावा हात कानामागे आणि मान तिरकी आहे. मुकुट, कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज देवीच्या अंगावर घालण्यात येतात.
पूर्वी या गडावर १०८ कुंडे होती, परंतु सध्या त्यातील १० ते १५ कुंडे अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीने पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला, त्यामुळे पाणी लालसर झाले, तर काजलतीर्थ या कुंडात देवीने काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचे झाले, अशी मान्यता आहे. जवळच जलगुंफा आहे. ही गुंफा देवीच्या लत्ताप्रहाराने निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते.
सप्तशृंग गडाला पौराणिक अन् धार्मिक महत्त्व आहे तेवढेच प्राचीन अन् ऐतिहासिक संदर्भही आहेत. असे सांगितले जाते की, देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नवनाथांना मंत्रशक्ती प्राप्त झाली. श्रीराम, लक्ष्मण व सीता, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, मच्छिंद्रनाथ, तसेच छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला या गडावर आले होते. सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. या गडावर मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली आहे, तर संत गाडगे महाराज समाजप्रबोधनासाठी गडावर थांबल्याच्याही नोंदी आहेत. देवीचे भक्त संत दाजिबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते. त्यांची समाधी सध्या गडावर आहे.
सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव (रामनवमीपासून पुढील दहा दिवस) प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेसह कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी उत्सव साजरे केले जातात. या सोहळ्यांसाठी हजारो भाविक उपस्थित असतात. चैत्र व अश्विन नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी २४ तास मंदिर खुले असते. प्रत्येक महिन्यातील दुर्गाष्टमी व कालाष्टमी मुहूर्तावर सकाळी ९.३० ते दुपारी ३ या दरम्यान नवचंडी यज्ञ केला जातो. देवीची पहाटेची काकड आरती ५.३० वाजता, त्यानंतर सकाळी ७ ते ९ पंचामृत महापूजा व आरती, दुपारी १२ वाजता महानैवेद्य आरती आणि सायंकाळी ७ वाजता सांजआरती होते. आरती सशुल्क स्वरूपातही उपलब्ध आहे. ज्या भाविकांना आरती करायची आहे, ते आगाऊ नोंदणी करू शकतात. भाविकांना गडावरील देवीचे दर्शन सकाळी ५ पासून रात्री ९ पर्यंत घेता येते. मंदिरात जाण्यासाठी रोप-वेची सुविधा सकाळी ४.४५ ते रात्री ८.४५ या वेळेत आहे. याशिवाय या देवीचे वेबसाईटवरून ऑनलाईन लाईव्ह दर्शन घेता येते. सप्तशृंगी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना अल्प दरात निवासाची व महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये व्हीआयपी जेवण असाही पर्याय आहे. भक्तनिवासात साध्या खोल्यांप्रमाणे अत्याधुनिक खोल्याही उपलब्ध आहेत.