नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात विंध्यवासिनी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या देवीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावरील मिर्जापूरपासून जवळ असलेल्या विंध्यचल पर्वतावर आहे. विंध्यचल पर्वतावरील देवीचे स्थान हे पूर्णपीठ, तर दिंडोरी येथील स्थान हे अर्धपीठ मानले जाते. दिंडोरी येथील देवीचे स्थान साडेतीनशे ते चारशे वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या हाकेला धावून जाणारी व नवसाला पावणारी देवी, म्हणून या देवीची ख्याती आहे.
विंध्यवासिनी देवीबाबत आख्यायिका अशी की देवकीच्या आठव्या गर्भातून जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवाने कंसापासून वाचविण्यासाठी यमुना नदी पार करून गोकुळात नंद व यशोदेच्या घरी पोहोचवले. त्याचवेळी यशोदेच्या गर्भातून मुलीच्या रूपात जन्मलेल्या आदि पराशक्ति योगमाया देवीला गुप्तपणे मथुरेतील तुरुंगात आणले. कंसाला जेव्हा देवकीच्या आठव्या मुलीच्या जन्माबाबत समजले, तेव्हा तो तत्काळ कारागृहात पोहोचला. त्याने त्या नवजात कन्येला दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न केला असता ती त्याच्या हातातून निसटली व आकाशात पोहोचली. तिने आकाशात आपले दिव्य स्वरूप प्रगट करून कंसाच्या वधाची भविष्यवाणी केली व ती तेथून विंध्यचल येथे परतली. त्यामुळे ‘नंदाघरची देवी’ असेही या देवीला म्हटले जाते.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सर्वात प्रथम मनु आणि शतरूपा यांचे निर्माण केले. विवाहानंतर मनुने आपल्या हाताने देवीची मूर्ती बनवून अनेक वर्षें कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवी भगवतीने त्याला निष्कण्टक राज्य, वंश-वृद्धी, तसेच परमपद मिळण्याचा आशीर्वाद दिला. वर दिल्यानंतर देवी विंध्यचल पर्वतावर निघून गेली. सृष्टीच्या प्रारंभापासूनच विंध्यवासिनी देवीची पूजा होत आली आहे. तसेच सृष्टीचा विस्तार तिच्याच आशीर्वादाने झाला, अशी मान्यता आहे.
दिंडोरीतील विंध्यवासिनी देवी ही येथील सोनार, तेली, ब्राह्मण, माळी, न्हावी आदी कुळांचे कुलदैवत आहे. तसेच दिंडोरीचे ग्रामदैवत म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. दिंडोरीपासून जवळच एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. पूर्वी लहान असलेल्या या मंदिराचा १९९७ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासोबतच ट्रस्टतर्फे मंदिराच्या परिसरात २५ वर्षांपूर्वी हजारो झाडे लावण्यात आली होती. ती आता मोठी झाल्यामुळे येथे गर्द वनराई पाहायला मिळते. त्यामुळे येथील वातावरण काहीसे थंड व प्रसन्न असते. मंदिर परिसरात विविध पक्षी व मोर वावरताना दिसतात. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे स्वच्छतेवर भर देण्यात आल्याचे जाणवते.
मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे आहे. मुख्य मंदिर व परिसरातील मंदिरे ही संपूर्ण पांढऱ्या रंगात आहेत. हा संपूर्ण परिसर दोन एकर इतका आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर मंदिरापर्यंत जाताना भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वाटेवर पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र पेव्हर ब्लॉक लावलेले दिसतात.
मंदिरातील सभागृह संपूर्ण संगमरवरात बनविले असून तेथील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभागृहाच्या मध्यभागी गर्भगृहासमोर पितळेची सिंहाची सुबक मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नवदुर्गांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्यामध्ये कात्यायनी देवी, कालरात्री देवी, महागौरी देवी, सिद्धिदात्री देवी, कुष्मांडा देवी, चंद्रघंटा देवी, ब्रह्मचारिणी देवी, शैलपुत्री देवी यांचा समावेश आहे. गाभाऱ्यातील विंध्यवासिनी देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून ती सव्वा पाच फूट उंचीची आहे. ही मूर्ती विंध्यचल पर्वतावर असलेल्या मूर्तीप्रमाणेच आहे. या मूर्तीशेजारी शेंदूरचर्चित देवीची जुनी मूर्ती ठेवण्यात आली आहे.
महाशिवरात्र, कालभैरव जयंती, देवदिवाळी, अरण्यषष्ठी (विंध्यावासिनी देवी प्रगटदिन), चैत्र पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा व नवरात्रीत मंदिरात उत्सव असतो. नवरात्रीत येथे यात्रा भरते. या काळात मंदिर ट्रस्टतर्फे आलेल्या भाविकांना अन्नदान केले जाते. दररोज सकाळी व सायंकाळी देवीची नित्यपूजा व आरती होते. मुख्य मंदिराच्या बाजूला काळभैरव व महादेव यांची मंदिरे आहे. विंध्यवासिनी ही शक्ती, दीर्घायु, संतान, व्याधिनाश, ऐश्वर्य आणि आनंद यांची देवी मानली जाते. ही देवी अनेक कुळांचे कुलदैवत असून भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिरात दर्शनासाठी येतात.