माणकेश्वर मंदिर

झोडगे ता.मालेगाव, जि.नाशिक

नाशिक-धुळे जिल्ह्याच्या सीमेवर मालेगावजवळ झोडगे या गावात १३ व्या शतकातील प्राचीन माणकेश्वर महादेव मंदिर आहे. हेमांडपंती शैलीतील या मंदिराची बाह्यरचना आणि आतील भिंती कलाकुसरींनी अक्षरशः भरलेल्या आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर त्रिदल रचनेचे म्हणजेच यात मुख्य गाभाऱ्यासह आणखी दोन असे तीन गाभारे आहेत. मालेगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुलाच हे मंदिर आहे. असे सांगितले जाते की मंदिराला लागून असलेल्या झोटिंग डोंगरावर नाथपंथीय साधू राहत असत. त्यांच्यासाठी हेमाद्री पंडीत याने शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे माणकेश्वर मंदिर बांधले. ऐतिहासिक नोंदींनुसार यादव काळात हेमाद्री पंडित याने हेमाडपंती शैलीतील अनेक मंदिरांची बांधकामे केली होती. त्यापैकीच हे एक असल्याचे सांगितले जाते. झोटिंग डोंगरावरूनच या गावालाही ‘झोडगे’ नाव पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. माणकेश्वर मंदिर हे केंद्र शासनाने संरक्षित वास्तु म्हणून घोषित केलेले आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून ते कुंपणाने बंदिस्त केलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या चौथऱ्यावर नंदीची अलंकृत भव्य मूर्ती पाहायला मिळते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिरावर शेकडो शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करण्याआधी मुखमंडपावर असलेली वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे पाहायला मिळतात. ‘सिंहव्याल’ म्हणजेच सिंहाचे दोन पायांवर उभे राहून मागे बघत असलेले शिल्प येथे आहे. मुखमंडपाच्या आतील भिंतींवर नृत्य करणाऱ्या अप्सरांची शिल्पे व त्यासोबत पखवाज आणि संगीत वादक यांचीही शिल्पे कोरलेली दिसतात.

सभामंडपात असलेल्या १२ खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. हे सर्व खांब भिंतींमध्ये आहेत. मंदिरातील वातावरण प्रकाशमान राहावे व हवा खेळती राहावी यासाठी येथे वरच्या बाजुला पूर्व व पश्चिम दिशेला उभ्या आयताकृती खिडक्या केलेल्या दिसतात. सभामंडपाच्या छतावरही कलाकुसर आहे. यक्ष, अप्सरांची नृत्ये करणारी शिल्पे तेथे कोरलेली दिसतात. सभामंडपात दोन्ही बाजुला छोट्या खोल्या आहेत. त्रिदल रचना असलेल्या मंदिरांमध्ये मुख्य गर्भगृहासह असे आणखी दोन गाभारे असतात. काही अभ्यासकांच्या मते या खोल्यांना भोगमंडप म्हणतात. येथे मूर्तीऐवजी देवाच्या वस्तू अथवा देवाला दान केलेल्या वस्तू ठेवत असत. ही दोन गर्भगृहे मुख्य मंदिराच्या निर्मितीनंतर ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर बांधली असावीत, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

सभामंडपातून अंतराळ आणि नंतर गर्भगृहात प्रवेश करता येतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अप्सरा, यक्ष, किन्नर कोरलेले आहेत. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. दोन पायऱ्या उतरून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेश केल्यावर समोर शिवपिंड आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असल्याने वर्षांतील काही दिवस सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात.

बाहेरच्या बाजुनेही मंदिर पायापासून शिखरापर्यंत असलेल्या सुंदर शिल्पांमुळे नखशिखांत सजलेले दिसते. शिवमंदिर असल्याने येथे शिवाच्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. बाहेरील देवकोष्ठकामध्ये अंधकासूरवधाचे सुंदर शिल्प आहे. भगवान विष्णूच्या १० अवतरांची शिल्पे येथे आहेत. याशिवाय इतर देवदेवतांची शिल्पेही आहेत. भिंतींवर अनेक सुरसुंदरी कोरण्यात आल्या आहेत. आंबाडा सावरणारी, शृंगारमग्न असलेली, कामायनी, हातात नाग असेलेली, गुप्तहेरीचे काम करणारी, शंख वाजविणारी, केस मोकळे सोडलेली अशा अनेक सुरसुंदरींनी मंदिर सजले आहे. याशिवाय अनेक मैथूनशिल्पेही येथे आहेत.

मंदिराच्या कळसाची रचनाही विशेष आहे. कळसावरील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीचे दिसते. मध्यान्हीची सूर्यकिरणे शिवपिंडीचे दर्शन घेऊ शकतील, अशी अनेक लहान छिद्रे कळसावर आहेत. येथे अनेक लहान लहान कळसांच्या प्रतिकृती उतरत्या क्रमाने रचलेल्या पाहायला मिळतात. या कळसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेली तीन कीर्तिमुखे. एकात एक गुंफलेली अशा प्रकारची कीर्तिमुखे प्राचीन मंदिरांमध्ये सहसा पाहायला मिळत नाहीत.

महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी यात्रा भरते. त्यावेळी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक धार्मिक कार्यक्रमांसोबतच यावेळी येथे होणारी कुस्ती स्पर्धा प्रसिद्ध आहे. त्यावेळी शेकडो कुस्तिपटू आखाड्यात आपले कसब दाखवितात. महाशिवरात्रीनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. येथील तरूणांकडून दरवर्षी दीपावली पाडव्याला मंदिर व परिसरात ‘दीपोत्सव’ साजरा केला जातो. त्यावेळी २५०० दिवे लावले जातात.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून १०४ किमी, तर मालेगावपासून २२ किमी अंतरावर
  • नाशिक व धुळे जिल्ह्यातून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home