देव मामलेदार यशंवत महाराज

सटाणा, बागलाण, जि. नाशिक


कलियुगात असा एक सरकारी अधिकारी होऊन गेला, ज्याचे लोकांनी मंदिर बांधून त्याला देवपदावर नेऊन बसवले. त्या देवाचे मंदिर आहे नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातील सटाणा शहरात आणि त्या मंदिराचे नाव आहे ‘देव मामलेदार यशवंत महाराज मंदिर.’
देव मामलेदार यांचे मूळ नाव यशवंत महादेव भोसेकर. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावी १३ सप्टेंबर १८१५ रोजी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण सुरू असतानाच १२ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पुढील शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे नाशिकमध्ये आले. त्यावेळच्या नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या ओळखीने येवला महसूल विभागात वयाच्या १४ व्या वर्षी बदली कारकून म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर पारनेर येथे त्यांची बदली झाली. या ठिकाणी त्यांचा संसार आणि सेवाकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या ठिकाणी स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्नदृष्टांत दिला. त्यांनी यशवंतरावांच्या हाती शाळिग्राम दिला आणि मला मंगळवेढ्याला येऊन भेट, अशी आज्ञा केली. यशवंतराव मंगळवेढ्याला गेले तेव्हा स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि तुझ्या कार्यकर्तृत्वामुळे लोक तुला देव समजू लागतील, असे सांगितले. कालांतराने ते खरेही झाले.

स्वामींकडून परतल्यानंतर यशवंतरावांचे सेवाव्रत जोमाने सुरू झाले. हे करीत असताना नोकरीच्या कामात त्यांनी कधीही कसूर केली नाही. त्यांच्या कामातील सचोटीमुळे त्यांची बढती होत होत १८५३ मध्ये त्यांना चाळीसगाव येथे मामलेदारपदी नियुक्त करण्यात आले. डोक्यावर लाल पगडी आणि पांढरा सदरा, पांढरे धोतर असा त्यांचा पेहराव असायचा. दिवसभर काम आणि रात्री भजन-कीर्तन असा त्यांचा दिनक्रम असे. यात त्यांची सहधर्मचारिणी रुक्मिणीबाई यांचीही साथ होती. यशवंतरावांना चार अपत्ये झाली. मात्र, त्यातील एकही अपत्य तीन महिन्यांपेक्षा जास्त जगले नाही. पण त्याचे दुःख न करता त्यांनी मानवतेच्या सेवेला वाहून घेतले. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार, गोरगरीब मुलांची लग्ने व मुंज यशवंतराव स्वखर्चाने करीत असत.

आपल्या या सेवाकार्यात अडथळा येत असल्याने यशवंतरावांनी नोकरीचा राजीनामा दिला. ही माहिती लोकांना कळल्यानंतर त्यांनी यशवंतरावांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली, मात्र त्यांचा निर्धार पक्का झाला होता. राजीनामा देऊन त्यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्याला जोमाने सुरुवात केली. याचदरम्यान ते अंमळनेरच्या सखाराम महाराजांच्या मंदिरात गेले होते. तेथे सखाराम महाराज स्वामी समर्थांना यशवंतरावांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी विनंती करीत असल्याचा दृष्टांत त्यांना झाला. मामलेदार पदावरून यशवंतरावांना लोकांची अधिक सेवा करता येईल, असे ते स्वामींना सांगत होते. या दृष्टांतानंतर यशवंतरावांनी राजीनामा मागे घेण्याचे ठरवले आणि त्यानुसार त्यांना पुन्हा मामलेदार म्हणून रुजू करून घेण्यात आले.

यावेळी त्यांना शहादा येथे बदली देण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी बदल्या होत १८६९ मध्ये त्यांची बदली सटाणा येथे झाली. या कार्यकाळात १८७० मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. लोकांची अन्नान्न दशा झाली होती. यावेळी यशवंतरावांची महती या लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांचे तांडेच्या तांडे यशवंतरावांकडे येऊ लागले. या गरीब लोकांसाठी यशवंतरावांनी आपले सगळे वेतन, पत्नीचे मंगळसूत्र, घरातल्या वस्तू खर्च केल्या. तरीही लोकांची रांग कमी होत नव्हती. दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांचे दुःख त्यांना सहन होईना. त्यांनी आजूबाजूच्या सावकारांना पत्र लिहून त्यांच्याकडून कर्ज घेतले. तरीही दुष्काळाची झळ कमी होत नव्हती. शेवटी यशवंतरावांनी सरकारचा खजिनाच खुला करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र त्यांनी सरकारदरबारी धाडले, पण तिथून काही होकार येईना. अखेर त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सरकारी खजिना खुला केला. १,२७,००० रुपये (एक लाख सत्ताविस हजार) लोकांमध्ये वाटून टाकले.

सरकारी खजिना लोकांना वाटल्याची बातमी सरकारपर्यंत पोहोचली. सरकारचे अधिकारी चौकशीसाठी आले. यशवंतरावांची उलटतपासणी सुरू असताना ही माहिती कर्णोपकर्णी लोकांपर्यंत पोहोचली. हळूहळू कचेरीसमोर गर्दी वाढू लागली. अधिकाऱ्यांनी खजिना उघडून त्यातील पैशांची मोजणी केली, तर त्यांना खजिना जसाच्या तसाच दिसला. एक पैदेखील कमी नव्हती. ही गोष्ट वाऱ्यासारखी लोकांमध्ये पसरली आणि त्या दिवसापासून लोक त्यांना ‘देव मामलेदार’ म्हणू लागले.

रविवारी, ११ डिसेंबर १८८७ रोजी मार्गशीर्ष वद्य एकादशीला यशवंतरावांनी नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर समाधी घेतली. या जागेवर ‘देव मामलेदार’ यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. त्यांच्या समाधीनंतर सटाणा येथे भाविकांनी त्यांच्या चरणपादुका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर येथे आरव नदीच्या किनारी, जुन्या कचेरीच्या शेजारी लाकडी मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले. १९०० पर्यंत मंदिराचे काम पूर्ण झाले आणि त्याच वर्षी पहिला उत्सव साजरा करण्यात आला.

मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे स्वरूप आहे. गर्भगृहात लाल पगडी, पांढरा सदरा आणि पांढरे धोतर असा पेहराव असलेली खुर्चीवर बसलेली ‘देव मामलेदार यशवंतराव महाराज’ यांची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींवर महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला गणपतीची संगमरवरी मूर्ती दिसते. विठ्ठल-रुक्मिणीच्याही मूर्ती येथे आहेत.

दरवर्षी मार्गशीर्ष वद्य एकादशीला (सफला एकादशी) यशवंतराव महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे त्यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला जातो. या दिवसाची पहिली पूजा येथील विद्यमान तहसीलदार यांच्या हस्तेच पार पडते. सायंकाळी ‘देव मामलेदार’ यांच्या चांदीच्या मूर्तीची देऊळ रथावरून (देवळासारखा दिसणारा व खाली चाके असलेला रथ) मोठी मिरवणूक काढली जाते. ही चांदीची मूर्ती १७ किलो वजनाची आहे. ‘सफला एकादशी’पासून साधारण १५ दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो.

मंदिरात पहाटे काकड आरती, त्यानंतर सकाळी ७.३० वाजता आरती होते. देव मामलेदार हे सटाणा शहराचे ग्रामदैवत बनले असून, त्यांच्या आशीर्वादाने सटाणावासीयांची प्रगती होत आहे, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक शहरापासून ६५ किमी, तर सटाणा बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागांतून एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • केवळ उत्सवकाळात भक्तनिवासाची सोय उपलब्ध
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home