नाशिक जिल्ह्यात महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये आवर्जून नाव घ्यावे असे ‘जोगेश्वर महादेव मंदिर’ सटाणा तालुक्यात देवळाणे येथे आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरलेल्या शेकडो मैथुनशिल्पांमुळे या मंदिराला ‘महाराष्ट्राचे खजुराहो’ असेही संबोधले जाते. हेमाडपंती रचनेत उभारलेल्या या मंदिराची ‘जोगेश्वर कामदेव मंदिर’ अशीही ओळख आहे. देवळाणे येथे दोधाड नदीच्या किनाऱ्यावर हे देखणे शिल्पमंदिर आहे. अतिशय सुंदर व उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. या मंदिरात एक शिलालेख आहे, ‘सिंगणदेवा हेमाद्रीदेवा रावळी बांधला’ म्हणजेच ‘यादवांच्या सेऊनदेव राजाच्या पंडित हेमाद्रीने हे मंदिर बांधले’. ऐतिहासिक नोंदींनुसार १३ व्या शतकात यादव काळात हेमाद्री पंडित याने अनेक मंदिरांची बांधकामे केली. त्यापैकीच देवळाणे येथील ‘जोगेश्वर महादेव मंदिर’ असल्याची नोंद ब्रिटिश गॅजेटमध्येही आहे. ब्रिटिश काळात या मंदिर परिसरात इतिहास संशोधकांना काही चांदीची नाणी सापडली होती. ही नाणी इ.स. ६२५ ते इ.स. ६३० या काळातील कलचुरी घराण्यातील कृष्णराज राजाच्या राजवटीतील नाण्यांशी मिळतीजुळती आहेत. यावरून पूर्वी या परिसरात कलचुरी घराण्याची राजवट असावी, असे मानले जाते.
मंदिराची आख्यायिका अशी, अजिंठा व वेरूळ येथील लेणी बांधून झाल्यानंतर तेथील कारागीर वन भटकंतीसाठी देवळाणे येथे आले होते. या कारागिरांनी येथीलच दगड वापरून एका रात्रीत हे मंदिर बनविले. संभाजीनगर जिल्ह्यातील पितळखोरे लेणी व नागार्जुन कोठी या लेण्यांवरील शिल्पांशी असलेल्या साधर्म्यामुळे या समजाला बळ मिळते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, पंधराव्या शतकात सोनज (ता. मालेगाव) ही पेठ लुटण्यासाठी राजपूत घराण्यातील देवसिंग व रामसिंग हे पराक्रमी बंधू जात असताना ते या मंदिरात मुक्कामाला थांबले होते. त्यावेळी काही कारणाने त्यांच्यात वाद झाला व रामसिंग रागाने तेथून निघून गेला. देवसिंगला मात्र हा परिसर आवडल्यामुळे त्याने या ठिकाणी असलेले जंगल तोडून येथे गाव वसवले. त्याच्या नावावरून या गावाला ‘देवळाणे’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
चारही बाजूने तटभिंती असलेला जोगेश्वर महादेव मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. या मंदिराचा चौथरा चांदणीच्या आकाराचा अष्टकोनी आहे. या चौथऱ्यावरूनच मंदिराला प्रदक्षिणा करता येऊ शकते. सुमारे ३ फूट उंची असलेल्या या चौथऱ्यावर मंदिराचे बांधकाम आहे. मंदिराच्या समोरच्या भागात १ मोठी व ३ लहान नंदीच्या मूर्ती आहेत. अखंड दगडापासून बनविलेल्या या मूर्तींवरील कोरीवकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हे संपूर्ण मंदिर म्हणजे शिल्पांचा खजिनाच आहे. या शिल्पमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्य भिंतींवर खजुराहोसारखी शारीरिक संबंधांची माहिती देणारी शेकडो मैथुनशिल्पे कोरलेली आहेत. त्यातील दोन नाग मैथुनशिल्पे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. ही शिल्पे प्रथमदर्शनी श्रीगणेश असल्याचा भास होतो, परंतु निरीक्षण केल्यावर दिसते की, एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातला आहे. या मैथुनशिल्पातील सौंदर्य, सौष्ठव उच्च प्रतीचे असल्याचे जाणवते. याशिवाय अनेक देव-देवतांची शिल्पे येथे कोरलेली पाहायला मिळतात. गर्भगृहात शिवपिंडीवरील अभिषेकाचे पाणी वाहून जाण्यासाठी बाहेरील बाजूस दोन मकरशिल्पे साकारली आहेत. त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते. भेदक जबडा, अणकुचीदार दंतपंक्ती व त्यातून बाहेर आलेली जीभ, याशिवाय त्याचा प्रत्येक अवयव शरीराची चपळता प्रकट करतो. अगदी जिवंत असे हे शिल्प भासते. अशी मोठ्या आकाराची व नक्षीदार मकरशिल्पे क्वचितच आढळतात.
मुख मंडपात प्रवेश केल्यानंतर आतील भागात शिल्पकलेचे आणखी नमुने पाहायला मिळतात. सभामंडपातील प्रत्येक खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. वर्तुळाकार घुमटाकृती भागात श्रीकृष्णाच्या लीलेत रमलेल्या गोपिका दिसतात. आतमध्ये आणखी एक नंदी आहे, त्याच्या पाठीवर छोट्या आकाराचे शिवलिंग कोरलेले दिसते. राजांची घोडेस्वारी, मुष्टियुद्ध, युद्धभूमीतील रणांगणात सैनिकांचे हत्तीसोबतचे युद्ध, जंगलात राजाने केलेली शिकार आदी प्रसंग शिल्परचनेच्या माध्यमातून येथे पाहायला मिळतात.
मंदिराचा गाभारा काहीसा खोल असल्याने तीन पायऱ्या उतरून जावे लागते. गाभाऱ्याच्या मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे. शिवलिंगासमोरील भिंतीवरील कोनाड्यात शंकर पार्वतीला मांडीवर घेऊन बसले आहेत, असे शिल्प आहे. याशिवाय गर्भगृहातील मुख्य कोनाड्यात पार्वतीची चार भुजा असलेली मीटरभर उंचीची मूर्ती आहे. छताच्या मध्यभागी कमळपुष्पाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाला शंकर, पंचमुखी नाग यांची शिल्पे दिसतात. याशिवाय गणपती आणि रिद्धी-सिद्धीच्या पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत.
मंदिराचे हे शिल्पसौंदर्य पाहण्यासाठी येथे दररोज शेकडो भाविकांसोबतच पर्यटक व अभ्यासकही भेट देतात. महाशिवरात्रीला येथे यात्रा असते. या दिवशी आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. याशिवाय श्रावणी सोमवारीही येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत या मंदिरात जोगेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.