जगदंबा माता मंदिर

कोटमगाव, ता. येवला, जि. नाशिक


पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून श्रीक्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा मातेचे मंदिर बहुश्रृत आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी या जगदंबेची ख्याती आहे. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिघींचे त्रिगुणात्मक रूप असल्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे. कोल्हापूर, माहूर व तुळजापूर या क्षेत्रांचे उगमस्थान कोटमगावची ही जगदंबा माता असल्याची मान्यता आहे.

या देवीची आख्यायिका अशी की महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालिंदर याने वृंदेच्या भक्तीच्या पुण्याईमुळे त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. प्रत्येक लढाईमध्ये तो सहज विजय मिळवत असे. सततच्या विजयामुळे सत्तांध होऊन त्याने देवलोकावर स्वारी करण्याचे ठरविले. आता जालिंदर देवलोक ताब्यात घेऊन देवांना बंदी बनविणार म्हणून सर्व देवांनी विष्णूचा धावा केला. जालिंदराच्या या विजयाचे कारण त्याची पत्नी वृंदा हिचे सतीत्व असल्याचे विष्णूंनी जाणले. त्यासाठी विष्णूंनी जालिंदराचे रूप धारण करून वृंदेचे शीलहरण केले. पतिव्रता वृंदा हिचे शीलहरण झाल्याने जालिंदर पराभूत होऊन त्याचा मृत्यू झाला. जालिंदराच्या मृत्यूनंतर झालेला प्रकार वृंदेच्या लक्षात आला आणि तिने विष्णूला तुम्ही शाळिग्राम होऊन पडाल, असा शाप दिला. वृंदेच्या या शापामुळे विष्णू शाळिग्राम होऊन कोटमगावी पडले. यानंतर महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या तिघीही विष्णूला शोधावयास निघाल्यानंतर विष्णू त्यांना कोटमगाव येथे शाळिग्राम होऊन पडलेले दिसले. त्यांनी सतीवृंदेचा उद्धार करून विष्णूंना शापमुक्त केले आणि तिघी या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज, तम आणि सत्व अशा त्रिगुणात्मक रूपात वास करू लागल्या.

जगदंबा मातेचे हे स्थान नाशिक, नगर व छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर नारंदी नदीच्या किनाऱ्यावर आहे. असे सांगितले जाते की जगदंबेच्या स्थापनेचा काळ निश्चित नसला तरी येवला शहर वसण्याच्या शेकडो वर्षे आधीपासून देवीचे येथे स्थान होते.

हे प्राचीन मंदिर पूर्वी दगड व मातीचे होते. १९५५ ते ६० या काळात ग्रामस्थांनी प्रथम या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १९८८ मध्ये मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराचा विस्तार करून नव्याने बांधकाम करण्यात आले. चारही बाजूने मंदिराला तटभिंती आहेत. मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून त्यात ४०० ते ५०० वाहने राहू शकतील असा वाहनतळ आहे. मंदिराच्या समोरील बाजूस अद्ययावत भक्तनिवास असून त्यात भाविकांसाठी ४२ सुसज्ज खोल्या आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक लावून अनेक शोभेच्या झाडांची लागवड केलेली दिसते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व टापटीप भासतो. मुख्य मंदिरासमोर सुंदर कलाकुसर केलेल्या दोन दीपमाळा असून मंदिराचा उंच कळस वैशिष्ट्यपूर्ण आहे. या कळसावर लहान-मोठ्या कळसांच्या शेकडो प्रतिकृती आहेत.

सभागृह व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या मुख्य लाकडी प्रवेशद्वारावर सुंदर कलाकुसर केलेली असून प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्यावर गणेशमूर्ती आहे. सभागृहात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहेत. गाभाऱ्यातील जगदंबा मातेची स्वयंभू व शेंदूरचर्चित वालुकामय मूर्ती ३ फूट उंचीची आहे. या मूर्तीमध्ये तीन मुखे असून ती महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची असल्याची मान्यता आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे मोठा उत्सव असतो. हजारो भाविक यावेळी देवीच्या दर्शनाला येतात. संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. या काळात देवीला दररोज नवनवीन पैठण्या परिधान करून सोन्या-चांदीचे अलंकार चढविले जातात. विविध फुलांनी गाभाऱ्यासह मंदिराची सजावट करण्यात येते. त्यामुळे मातेचे रूप आणिकच खुलते. चंदनाच्या पाटावर, चांदीच्या ताटात मातेला शाही थाटात नैवेद्य दाखविला जातो.

जागृत देवस्थान असल्यामुळे येथे नवरात्रीत हजारो स्त्री-पुरुष घटी बसतात. या नऊ दिवसांत देवीच्या सानिध्यात राहून पूजाविधी करणे, देवीचे गुणगाण, स्तोत्र, मंत्रोच्चार, सप्तशतीचे पठण आणि महत्त्वाचे म्हणजे नऊ दिवस देवीच्या नावाचा जप करणे याला ‘घटी बसणे’ असे म्हटले जाते. या घटी बसणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी, फराळ व निवासाची व्यवस्था मंदिर समितीतर्फे करण्यात येते. या नऊ दिवसांत भाविक श्रद्धेनुसार शंकरपाळे, खारीक यांची देवीसमोर उधळण करतात. हा प्रसाद झेलण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी असते.

उत्सवकाळात सकाळी व सायंकाळी मातेची महाआरती केली जाते. दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात भाविकांसाठी मंदिराची दारे २४ तास खुली असतात. येवला ते कोटमगाव हा ३ किमीचा रस्ता या काळात भाविकांनी दुतर्फा भरून वाहत असतो.

जगदंबा देवीच्या मुख्य मंदिराजवळच महादेवाचे व यमाई-तुकाई देवी यांची मंदिरे आहेत. धार्मिक कार्याबरोबरच मंदिर ट्रस्टतर्फे पूरग्रस्त व दुष्काळग्रस्तांना वेळोवेळी आर्थिक मदत करण्यात येते. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना, तसेच उदयोन्मुख खेळाडूंनाही मंदिर ट्रस्टतर्फे साह्य केले जाते. नवरात्रीच्या काळात घटी बसलेल्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. उत्सव काळाव्यतिरिक्त दर मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी येथे भक्तांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ८६ किमी, तर येवल्यापासून तीन किमी अंतरावर
  • नाशिक, येवल्यापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home