नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहराच्या उत्तरेला तांबकडा परिसरातील डोंगरावर ‘चंद्रेश्वर महादेवा’चे प्राचीन स्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी गौतम ऋषींनी अहिल्या, इंद्र व चंद्राला शाप दिल्यानंतर चंद्राने या ठिकाणी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यानंतर स्वतः चंद्राने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. तेव्हापासून येथील शिवलिंगाला ‘चंद्रेश्वर’ व पार्वतीला ‘चंद्रेश्वरी’ या नावाने ओळखले जाऊ लागले, अशी मान्यता आहे.
या मंदिराची अख्यायिका अशी की राजा चंद्रसेनची राजधानी ‘तामलिदापूर’ म्हणजेच आजची चांदवड नगरी होती. राजा चंद्रसेन शिवभक्त होता. चंद्रसेन राजाने शंकर व पार्वतीचा आशीर्वाद मिळवून या ठिकाणी चंद्रेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती. राजा विक्रमादित्याला शनीची साडेसाती लागल्यानंतर त्याने याच परिसरात तपश्चर्या केली होती. शनिदेवाने प्रसन्न होऊन राजाला साडेसातीतून मुक्त केले. विक्रम राजाची तपश्चर्या पाहून राजा चंद्रसेनने आपली कन्या चंद्रकला हिचा विवाह राजा विक्रमादित्याशी या चंद्रेश्वर मंदिरात लावून दिला होता. जमदग्नी ऋषी, रेणुका माता, परशुराम यांच्यासह या धार्मिक पीठावर हजारो वर्षांपासून अनेक साधू-संत, ऋषी-मुनी, राजे-महाराजे यांनी तपसाधना केली आहे.
मुगल राजवटीत औरंगजेबाने अनेक मंदिरांची मोडतोड केली होती. त्यापासून बचावासाठी येथील ग्रामस्थांनी त्यावेळी ‘चंद्रेश्वरा’चे हे प्राचीन मंदिर चिखल व शेणामातीने बुजविले होते. त्यामुळे औरंगजेबाचे या मंदिराकडे लक्ष गेले नाही. त्यानंतर अनेक वर्षे हे मंदिर तशाच अवस्थेत होते.
असे सांगितले जाते की सन १९०० मध्ये दयानंद स्वामी तीर्थयात्रा करत चांदवड मुक्कामी आले. त्यावेळी त्यांना शंकराने साक्षात्कार देऊन ‘माझे शिवलिंग व मंदिर चिखल-मातीत बुजले आहे. याचा जीर्णोद्धार कर’ असे सांगितले. स्वामींनी तीर्थाटन थांबवून चंद्रेश्वर गडाकडे धाव घेतली व खोदकाम केले. तेव्हा तेथे त्यांना मोठे शिवलिंग व पार्वती (चंद्रेश्वरी माता) यांच्या मूर्ती सापडल्या. ही माहिती जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा स्थानिकांनी दयानंद स्वामींच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दयानंद स्वामींनी ६६ वर्षे सेवा केल्यानंतर १९६६ मध्ये याच ठिकाणी समाधी घेतली. त्यानंतर द्वितीय महाराज स्वामी विद्यानंद महाराज यांनी ३५ वर्षे चंद्रेश्वराची सेवा केली. यादरम्यान त्यांना १९९८ साली झालेल्या कुंभमेळ्यात साधू-संतांनी ‘महामंडलेश्वर’ ही पदवी प्रदान केली. चंद्रेश्वरी मातेच्या मूर्तीची पुनर्स्थापना करून भव्य मूर्तीची स्थापना त्यांनी केली. विद्यानंद महाराजांचे १८ जानेवारी २००० रोजी येथे निधन झाले.
परशुरामासह अनेक थोर तपस्वींच्या, तसेच दयानंद स्वामी, विद्यानंद महाराज यांच्या समाध्या या मंदिर परिसरात पाहायला मिळतात. चांदवडमधील रेणुका माता मंदिराच्या परिसरात असलेल्या डोंगरावर हे सुंदर व प्रशस्त चंद्रेश्वराचे मंदिर आहे. पायथ्यापासून येथे येण्यासाठी काँक्रीटचा रस्ता असल्यामुळे वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. येथून पूर्ण चांदवड शहर नजरेच्या टप्प्यात येते. डोंगरावर असल्यामुळे व परिसरात मंदिर ट्रस्टतर्फे अनेक झाडे लावण्यात आल्यामुळे हिरवाईने नटलेला हा परिसर शांत व प्रसन्न भासतो.
मंदिरात प्रवेश करण्याआधी एक कमान आहे. त्या कमानीवर वरच्या बाजूला शंकर-पार्वती, गणपती व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. सुमारे ३० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या सभोवती सर्वत्र पेव्हर ब्लॉक लावले आहेत. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व नीटनेटका भासतो. प्रशस्त अशा या मंदिराला चार कळस आहेत. मुख्य गाभाऱ्यावरील कळसावर अनेक लहान-मोठ्या कळसांच्या प्रतिकृती आहेत.
बाह्य भिंतींबरोबरच मंदिराच्या आतील बाजूलाही सुबक कलाकुसर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. सुंदर रंगकाम केल्यामुळे ती आणखी आकर्षक भासतात. सभामंडपातील नंदीच्या मूर्तीवरही वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम दिसते. गाभाऱ्यात सुंदर शिवपिंडी असून तिला पितळेचे आवरण आहे.
मंदिरात श्रावणातील प्रत्येक सोमवारी, महाशिवरात्री, हरिहर भेट, कोजागिरी पौर्णिमा, स्वामी दयानंद महाराज पुण्यतिथी हे दिवस मोठ्या उत्साहात साजरे होतात. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. त्यावेळी गावातून पालखी निघते. पालखीत शंकराचा चांदीचा मुखवटा, शेषनाग, दयानंद स्वामींची प्रतिमा व पार्वती मातेचे दागिने ठेवले जातात. प्रत्येक घरासमोर या पालखीची सुवासिनींकडून पूजा केली जाते. श्रावणात एक लाख बेलाची पाने ‘ओम नम: शिवाय’ या जपाने शिवलिंगावर वाहिली जातात. विविध तीर्थक्षेत्रांवरून आणलेल्या पाण्याने यावेळी श्रींचा महाभिषेक केला जातो. श्रावण समाप्तीला येथे सत्यनारायण व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
मंदिर परिसरात असलेल्या गोशाळेत परिसरातील भाकड गायींची काळजी घेतली जाते. याच परिसरात एक पाण्याचे टाक आहे. ‘गणेश टाक’ असे त्याला संबोधतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वर्षभर थंड पाणी असते. गडावर आलेले भाविक आवर्जून येथील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मंदिराचे सर्वाधिकार श्री संस्थान महामंडलेश्वर, हरिद्वार यांच्याकडे आहेत. या मंदिरात जाण्यासाठी जुना पायरी मार्गही उपलब्ध आहे. पहाटे ५ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना मंदिरात चंद्रेश्वराचे दर्शन घेता येते.