
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावात श्रीकृष्णाची अतिशय दुर्मिळ अशी अष्टबाहू शिल्पमूर्ती आहे. काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती प्रचलित सर्व पुरातन मूर्तींपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असून संपूर्ण देशात अशा प्रकारची ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
मोहाडी गाव डोंगर, नद्या, वृक्षवल्ली यांनी समृद्ध आहे. हे गाव प्राचीन असून अकराव्या शतकामध्ये या गावाचा उल्लेख ‘मोहमल्ली’ असा सापडतो. गावातील मोहाडमल्लेश्वर (भैरवनाथ) मंदिरावरून गावाला ‘मोहाडी’ नाव पडले असावे. परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या मोहाच्या प्रचंड वृक्षांवरूनही तसे नाव पडले असण्याची शक्यता आहे. गावातील मुख्य मंदिर अष्टबाहू गोपालकृष्णांचे असून ते गावाचे आराध्य दैवत आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की फार वर्षांपूर्वी मोहाडी गावामध्ये ‘मोहाडमल्ल’ राहत होते. त्यांच्या काळात एक शिल्पकार कन्याकुमारीहून उज्जैनला जात असताना तो मोहाडी येथे थांबला होता. तेव्हा त्या शिल्पकाराने एक कृष्णमूर्ती तयार केली आणि दुसऱ्या दिवशी तो ती मूर्ती उचलायला गेला; परंतु ती मूर्ती जागेवरून हालली नाही. त्यानंतर त्या मूर्तीवर त्या मूर्तिकाराने रागाने कुऱ्हाडीचा प्रहारही केला; परंतु त्या मूर्तीला काहीच झाले नाही, म्हणून ती मूर्ती तो त्याच जागेवर सोडून गेला. त्यामुळे ही ऐतिहासिक कृष्णमूर्ती मोहाडी गावामध्येच राहिली. उज्जैन येथे याच मूर्तिकाराने बनवलेली अशीच गोपालकृष्णाची मूर्ती आहे, मात्र ती मूर्ती चार बाहूंचीच आहे. म्हणून अष्टबाहू कृष्णाचे रूप असलेल्या या दुर्मिळ मूर्तीचे वैभव मोहाडी गावामधील महत्त्वाचा वारसा ठरतो.
अष्टबाहू गोपालकृष्णाचे मंदिर तीन मजली असून ते प्राचीन आहे. लाकडी इमारतीमध्ये ५ खण रुंद व ७ खण लांब (एक खण म्हणजे साधारणतः २५ x १० फूट) असे हे प्रशस्त मंदिर असून १९५० च्या सुमारास मोहाडीकरांनी लोकवर्गणीतून त्याचा जीर्णोद्धार केला होता.
श्रीमंत पेशवे या मंदिराला वार्षिक १४४ रुपये दिवाबत्तीसाठी देत असत, असा उल्लेख सापडतो.
तळ मजल्यावर सभामंडप आहे, तेथे कथा, कीर्तन, व्याख्यान असे कार्यक्रम होत असतात. शेजारी धर्मशाळेसारखी राहण्याची व्यवस्था आहे. श्रावण वद्य प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत जन्माष्टमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भाद्रपद वद्य पंचमी ते एकादशीपर्यंत नामसप्ताह होतो.
सभामंडपासमोरील गाभाऱ्यात गोपालकृष्णाची मूर्ती शाळिग्राम पाषाणातील असून तिचे रूप हे अष्टबाहू स्वरूपात आहे. ही मूर्ती सुबक, प्रमाणबद्ध व कलात्मक आहे. सुशोभित कोरीव मखराच्या आयताकृती कोंदणात ती स्थापित आहे. डोक्यावर सुंदर मुकुट असलेल्या मूर्तीच्या एका हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेला असून त्या पर्वतावर कल्पतरू व मर्कटलीलेत दंग असलेली वानरे कोरलेली दिसतात. कृष्णमूर्तीच्या दोन हातांत आडवी बासरी आहे. अन्य हातांमध्ये शंख, चक्र, गदा अशी आयुधे आहेत. या गोपालकृष्णाच्या कमरेस लंगोट व त्यावर दागिनापट्टा आहे. गोपालकृष्णाच्या अंगाभोवती कालियाने विळखा घातला असून गोपालकृष्णाच्या कानाला तो दंश करतो आहे, असे दृश्य कोरलेले आहे. हे दृश्य फार बारकाईने कोरलेले दिसते. मूर्तीच्या पायांपाशी एक गोपी मृदुंग, तर दुसरी सनई वाजवीत आहे. गाई प्रभूंची बासरी ऐकण्यात दंग आहेत. तर विष्णूचे वाहन असलेला गरूड पायाशी उभा आहे.
आजपर्यंत या मंदिराला कै. ल. रा. पांगारकर, वै. मामासाहेब दांडेकर, पांडुरंगशास्त्री आठवले, तसेच साहित्यिक आचार्य अत्रे, कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर), नाटककार वसंतराव कानेटकर, विद्याधर गोखले, विद्या वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी भेटी दिल्या असून त्यांचे जाहीर कार्यक्रम येथे झालेले आहेत. नामांकित विद्वान व्यक्तींना येथे उत्सवात पाचारण करण्याची या गावाची परंपरा आहे.
मंदिराचा कारभार विश्वस्तांकडे असून सारे विश्वस्त स्थानिक आहेत. देवाचे पुजारी वंशपरंपरागत असून ती व्यवस्था कै. गोपालकृष्ण काशिनाथ जोशी व वेदशास्त्र संपन्न कै. लक्ष्मीकांत यज्ञेश्वर जोशी यांच्या घराण्याकडे आहे. उत्सवात भागवत पुराण सांगण्याचा मानही या घराण्याकडेच आहे व तो ते आजही पाळतात. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत भाविक या मंदिरात जाऊन गोपालकृष्णाचे दर्शन घेऊ शकतात.