रामाच्या वनवास काळातील ज्या मुख्य कालखंडाने रामायणाला एक वेगळी दिशा मिळाली, तो कालखंड नाशिकमधील पंचवटीतील सीता गुंफेत घडल्याचे बोलले जाते. गोदाकाठच्या याच पंचवटी परिसरातील भूमीतून रावणाने वेष बदलून सीतेचे अपहरण केल्याचे सांगितले जाते.
नाशिकच्या उत्तरेला असलेला पंचवटी हा भाग व त्यातील ही ‘सीता गुंफा’ आजही सर्व भाविकांच्या उत्सुकतेचे व श्रद्धेचे अधिष्ठान आहे. सीता गुंफेबाबत आख्यायिका अशी की शूर्पणखा ही रावणाची धाकटी बहीण. लक्ष्मणाला ती आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करते. लक्ष्मण रामाच्या परवानगीने तिचे नाक व कान कापून तिला कुरूप करतो. चिडलेली शूर्पणखा रावणाकडे लक्ष्मणाची तक्रार करते. त्यामुळे रावण चिडतो. आपल्या बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो सीतेचे अपहरण करून राम-लक्ष्मणाला धडा शिकविण्याचे ठरवतो. एका साधूचे रूप घेऊन रावण भिक्षा मागण्याच्या बहाण्याने सीतेचे अपहरण करतो. ज्या ठिकाणाहून सीतेचे अपहरण झाल्याचे मानले जाते, ते ठिकाण म्हणजेच ‘सीता गुंफा’ होय.
असे सांगितले जाते की राम-लक्ष्मण यांना काही कारणास्तव सीतेला एकटे ठेवून जावे लागे, त्या वेळी ते तिला याच गुंफेत ठेवत असत, असेही सांगितले जाते. रामाने आपल्या वनवासाचा दोन वर्षांचा काळ नाशिकमधील या भागात वास्तव्य केले असल्याचे म्हणतात, तर काही अभ्यासकांच्या मते, वनवासाचा संपूर्ण काळ रामाने येथील भूमीतच व्यतित केला होता.
‘सीता गुंफा’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचनाकृती म्हणता येईल. मंदिराच्या आवारात वडाची पाच मोठी झाडे आहेत. सीता गुंफेच्या सभोवतालचे, राम-लक्ष्मणाने रोपण केल्याचे मानले जाणारे हे पाचही वटवृक्ष अजूनही सुस्थितीत आहेत. त्यांतील एका वृक्षाला ‘पर्णकुटी’ असे नाव देण्यात आले आहे. यालगतच ‘सीता गुंफे’चे प्रवेशद्वार आहे.
गुंफेच्या आत प्रवेश करताना गर्दी नियंत्रित करण्यासाठी म्हणून स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहे. त्या भागात एका छोट्याशा मंदिरात गणपतीची मूर्ती आहे. पुढे गेल्यावर गुंफा सुरू होते. एका छोट्या, गोलाकार, अरुंद मार्गिकेतून चालत गुंफेच्या आत जाता येते. या ठिकाणी काही भागांवर नक्षीकामही केलेले दिसते. पुढे पायऱ्या लागतात. त्या उतरून तशाच पद्धतीच्या, अडीच ते तीन फूट उंचीच्या अरुंद गुहेतून बसून उतरल्यावर एक छोटे दालन लागते. त्यात राम-सीता-लक्ष्मण यांचे काळ्या दगडातील महिरपी मंदिर आहे. राम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्तीही काळ्या दगडांत घडविल्या आहेत. रामाच्या डाव्या बाजूला सीता, तर उजव्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत. त्यांच्या शिरावर चांदीचे मुकुट आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला, दुसऱ्या एका दालनात शिवलिंग आहे. त्याला वेटोळे घातलेली पंचधातूची नागाची प्रतिमा आहे. या शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय सीता अन्नग्रहण करीत नसे, असे सांगितले जाते. येथील आणखी एक दालन म्हणजे सीतेचे शृंगारगृह आहे. ही गुंफा अगदी छोटी आहे. गुंफेतून बाहेर पडण्यासाठी मंदिराच्या पायऱ्या चढून वर जावे लागते. ही सारी गुंफा सफर काही मिनिटांची असली, तरी ती वैशिष्ट्यपूर्ण ठरते. रामायण कालखंडाच्या नंतरच्या काळात कधीतरी या गुंफेसमोर दुमजली लाकडी मंदिर बांधण्यात आले. आता या लाकडी मंदिरातून आत जाऊन मग गुंफेत प्रवेश केला जातो.
या गुंफेतील मार्ग अरुंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व व्याधीग्रस्तांना या गुंफेत प्रवेश दिला जात नाही. मंदिराच्या आवारातील वडांच्या झाडांना चौकोनी पार बनविले आहेत. त्यांना आकडेही दिले गेले आहेत. मंदिराच्या परिसरात धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य, हार-फुले, प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. सकाळी ६.१५ ते रात्री ८.३० या वेळेत या गुंफेत जाता येते.