महादजी शिंदे छत्री / महादेव मंदिर

वानवडी, पुणे, ता. जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वानवडी येथे वसलेली महादजी शिंदे छत्री व महादेव मंदिर हे मराठा साम्राज्याचे महान सेनानी महादजी शिंदे यांचे स्मारक, शिवालय, त्यांची समाधी, मारुती मंदिर व विठ्ठल मंदिर अशा संपूर्ण परिसरासाठी ओळखले जाते. ही ऐतिहासिक वास्तू पुणे शहरातील वानवडी भागातील बहिरोबा नाल्याच्या काठावर उभी आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी म्हणजेच १७९४ मध्ये निधन होण्यापूर्वी महादजी शिंदे यांनी वानवडी येथे हे महादेवाचे मंदिर बांधले होते. त्यांच्या निधनानंतर या मंदिरासमोरच त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाशेजारीच त्यांची समाधी आहे. ब्रिटिश व राजस्थानी स्थापत्यशैलीचा एक अनोखा संगम या स्मारकाच्या रचनेत पाहायला मिळतो.

ऐतिहासिक नोंदींनुसार, इसवी सन १७६१ च्या पानिपतच्या युद्धात अनेक अनुभवी सरदार धारातीर्थी पडल्यामुळे मराठा सत्तेची मोठी हानी झाली व उत्तर भारतातील वर्चस्वाला मोठा धक्का बसला. पानिपतच्या पराभवाच्या धक्क्याने नानासाहेब पेशव्यांचेही निधन झाले. अशा बिकट परिस्थितीत शिंदे व होळकर या सरदारांनी मराठा साम्राज्याचा डोलारा पुन्हा सावरला. महादजी शिंदे यांनी १७६८ मध्ये शिंदे घराण्याची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतली. युद्ध आणि राजकारणाचे प्राथमिक धडे त्यांनी आपले बंधू जयाप्पा व दत्ताजी यांच्याकडून गिरवले होते. पानिपतच्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झाल्यामुळे त्यांना रणांगणाचा दांडगा अनुभव होता.

माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर पुणे दरबारात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, नारायणराव पेशव्यांची हत्या, राघोबादादांचे बंड तसेच तोतयाच्या बंडामुळे प्रशासन खिळखिळे झाले होते. अशा वेळी महादजींनी बारभाई मंडळाला खंबीर पाठिंबा देऊन परिस्थिती कौशल्याने सावरली. १७७९ ची वडगावची लढाई व १७८३ चा सालबाईचा तह या प्रसंगी इंग्रजांना महादजींच्या मुत्सद्देगिरी सोबतच त्यांच्या युद्धकौशल्याची प्रचिती आली. उत्तर भारतात पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्वाल्हेर, दिल्ली, जोधपूर तथा चितोडगड यांसारख्या ठिकाणी लष्करी मोहिमा यशस्वी केल्या.

अंतर्गत मतभेद व होळकरांशी स्पर्धेचे संबंध असतानाही महादजींनी नेहमीच मराठा साम्राज्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी दिल्लीचा सम्राट शाहआलम याला पुन्हा तख्तावर बसवून आपले वर्चस्व सिद्ध केले. या कामगिरीबद्दल बादशहाने महादजींना ‘आलिजाह बहादूर’ हा किताब दिला, तसेच पेशव्यांसाठी ‘वकील-ई-मुतलक’ यांसारखी अत्यंत प्रतिष्ठेची पदे मिळवून दिली. पुण्यात एका भव्य समारंभात त्यांनी ही पदे अत्यंत विनम्रतेने पेशव्यांना अर्पण केली. सुमारे पावणेदोन लाख सैनिकांची सुसज्ज व आधुनिक फौज असलेल्या महादजींनी पुणे दरबाराशी असलेली आपली निष्ठा शेवटपर्यंत जपली.

महादजी हे पराक्रमी योद्धे असण्यासोबतच एक संवेदनशील कवीही होते. मराठी, हिंदी व गुजराती अशा तिन्ही भाषांचा सुंदर संगम त्यांच्या काव्यरचनांमध्ये आढळतो. त्यांच्या बहुतांश कविता कृष्णभक्तीवर आधारित आहेत. आयुष्यातील पंचवीस वर्षे सतत रणांगणावर घालवल्यानंतर, वयाच्या उत्तरार्धात ते पुण्यात स्थायिक झाले होते. मात्र ज्वराचा विकार बळावल्यामुळे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी पुण्यातील वानवडी येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्याचा एक खंबीर आधारस्तंभ कोसळला. अनेक पाश्चात्य इतिहासकारांनीही महादजींच्या बुद्धिमत्तेसह लष्करी कर्तृत्वाची प्रशंसा केली असून वानवडी येथील त्यांचे भव्य स्मारक, समाधी व मंदिर आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात.

वानवडी येथील ओढ्याकाठी असलेल्या या समाधीला माळव्यातील परंपरेनुसार ‘शिंदे छत्री’ असे संबोधले जाते. ब्रिटिश गॅझेटियरमधील नोंदींनुसार, मूळ समाधी ही दगडमातीचे बांधकाम असलेली एक उंच वास्तू होती. छत्रीच्या आवारातील महादेवाच्या मूळ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम इ.स. १८३० मध्ये महादजींचे नातू जनकोजी शिंदे यांनी हाती घेतले होते. परंतु इ.स. १८४२ मध्ये त्यांच्या निधनानंतर थांबलेले हे काम पुढे १९०९ मध्ये माधवराव शिंदे यांनी पूर्ण करून या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन केले. छत्री परिसरात प्रवेश करताच समोर मारुतीचे मंदिर व त्यासमोर शिंदे छत्रीचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. या वास्तूभोवती सुमारे पंधरा फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या ट्रस्टच्या तिकीटघरातून शुल्क भरून या स्मारकाच्या प्रांगणात प्रवेश करता येतो. प्रांगणात स्मारकाची सुंदर व प्रशस्त दुमजली इमारत आहे.

मराठा व राजस्थानी स्थापत्यशैलीचा उत्तम मिलाफ असलेले हे दुमजली स्मारक दगडांनी बांधलेले असून ते एका उंच चौथऱ्यावर उभे आहे. या वास्तूच्या भिंतींवरील कोरीव काम अतिशय सुबक व रेखीव आहे. बाहेरील भिंतींवर नक्षीदार कमानी आणि भव्य खांब आहेत. स्मारकाच्या खिडक्यांमध्ये युरोपियन शैलीचा प्रभाव असलेल्या रंगीत काचा वापरल्यामुळे वास्तूच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. स्मारकाच्या वरच्या भागात लहान घुमट व नक्षीदार कळस आहेत. फरसबंदी प्रांगणातून नऊ पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या स्मारकात प्रवेश होतो. स्मारकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम असलेल्या स्तंभशाखा आहेत. दुमजली सभामंडपात महादजी शिंदे यांच्यासह घराण्यातील वंशजांची छायाचित्रे लावली आहेत. काळ्या-पांढऱ्या संगमरवरी दगडांतील सभामंडपाचे काम व गोलाकार नक्षीदार कमानींमुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. राजस्थानी शैलीतील या सभामंडपाच्या छतावर आतील बाजूने फुलांचे नक्षीकाम तसेच काचेची झुंबरेही लावली आहेत.

या सभामंडपाला लागूनच पुढे महादजींनी बांधलेले शिवमंदिर आहे. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून महादेव मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका चौथऱ्यावर नंदीची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नक्षीदार द्वारशाखा व त्यांवर खालील बाजूला दोन कोरीव द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर सरस्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी असलेल्या काळ्या घोटीव दगडातील शिवलिंगाच्या मागे महादजी शिंदे यांचे शिल्प आहे. या शिल्पाची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली असून त्याच्या डाव्या बाजूला एक लहानसे देवकोष्टक आहे.

उत्तर भारतीय किंवा राजस्थानी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले मंदिराचे शिखर हे स्मारकाच्या इमारतीच्या बाजूला असून ते उंच व निमुळते होत जाते. उरुश्रुंगी स्थापत्य रचनेच्या या मुख्य शिखराभोवती अनेक लहान उपशिखरे आहेत. शिखराच्या प्रत्येक स्तरातील दगडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. सर्वात वरच्या भागावर एक आमलक व त्यावर कळस आहे. या शिखराजवळूनच स्मारकात असलेल्या सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी मागील बाजूने गोलाकार जिना आहे.

या प्रांगणात एका बाजूला मुघल स्थापत्यशैलीत बांधलेली महादजी शिंदे यांची मुख्य समाधी वास्तू आहे. या वास्तूच्या मुख्य घुमटाच्या चारही बाजूंना चार लहान घुमट आहेत. इमारतीच्या गर्भगृहात महादजींचा शिंदेशाही मुखवटा व त्यामागे घोड्याचे शिल्प आहे. सभामंडपाच्या छतावर व स्तंभांवर विविध रंगांच्या फुलांच्या आकृत्या आहेत. याशिवाय परिसरात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. महादेव मंदिरात दररोज पूजा व आरती केली जाते आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. ३ डिसेंबरला महादजी शिंदे यांची जयंती व १२ फेब्रुवारीला पुण्यतिथी असते. ज्या निमित्ताने मंदिरात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत भाविकांना येथील मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून ६.५ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • देशभरातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपब्लध
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर सेवक, मो. ९३७२८५४२८६
Back To Home