पुणे आणि गणपती यांचे नाते ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत दृढ आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक पाच मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत. पेशवे काळात गणपतीला मोठा राजाश्रय मिळाला. येथील ‘मानाचे पाच गणपती’ आणि विसर्जन मिरवणुकीची शिस्तबद्ध परंपरा यामुळे पुणे ही जागतिक स्तरावर गणेशाची नगरी म्हणून ओळखली जाते. याच जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेले वडगाव काशिंबेग येथील मोरया अर्धपीठ हे गणपतीचे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या स्थानाचा लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीशी संबंध जोडला जातो. येथील गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती केवळ सोंड आणि मुखाच्या स्वरूपात आहे. अशा प्रकारचे गणपतीचे रूप दुर्मिळ आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी श्रीमंत काशीबाई या गणपतीच्या उपासक होत्या. जुन्नर जवळील लेण्याद्रीच्या दर्शनासाठी जाताना त्या वडगाव काशिंबेग येथील या सोंड स्वरूपातील गणपतीच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असत. हे मंदिर त्यांच्यासाठी एका खासगी देवघरासारखे होते. त्यांच्या श्रद्धेमुळे पेशवे दरबारातून या मंदिराला मोठा राजाश्रय मिळाला. मंदिराच्या दैनंदिन देखभालीसाठी व नंदादीपाच्या खर्चासाठी दरवर्षी एक रुपयाची रसद पेशव्यांकडून दिली जात होती. १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारने पेशवे काळातील धार्मिक इनामे तपासण्यासाठी १८५२ मध्ये विशेष इनाम कमिशनची स्थापना केली.
या कमिशनने वडगाव येथील मंदिराचे सर्व जुने दस्तऐवज आणि धार्मिक महत्त्व तपासून पाहिले. या प्रक्रियेनंतर १५ एप्रिल १८७५ रोजी इंग्रजी सत्ताधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची सनद जारी केली. मोडी लिपी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असलेली ही ऐतिहासिक सनद आजही मंदिर प्रशासनाकडे आहे. पेशव्यांपासून सुरू झालेली ही परंपरा इंग्रज काळातही अखंडपणे सुरू राहिली. आज हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
‘गणेश पुराणा’त आलेल्या उल्लेखानुसार, मंचर ते भीमाशंकर हा विस्तीर्ण परिसर पूर्वी मणिपूर नगरी म्हणून ओळखला जात असे. या समृद्ध भूमीत प्राचीन काळी अनेक ऋषी-मुनी आपली तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी वास्तव्यास येत असत. या काळात भीमासुर नावाच्या एका बलाढ्य राक्षसाने या ऋषींच्या कार्यात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाने सर्व देव व ऋषी त्रस्त झाले. या संकटातून सुटका करण्यासाठी भगवान शंकराने या मणिपूर नगरीत पाऊल ठेवले आणि भीमासुराशी युद्ध पुकारले. राक्षसाच्या सामर्थ्यामुळे शंकरांना सुरुवातीला यश मिळाले नाही, तेव्हा ऋषींनी त्यांना वडगाव काशिंबेग येथील गणपतीची आराधना करण्याचा सल्ला दिला.
या सल्ल्यानुसार भगवान शंकराने या भूमीत सलग बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. गणपतीच्या आशीर्वादामुळेच त्यांना भीमासुराचा वध करणे शक्य झाले. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाची सोंड येथे स्वयंभूपणे प्रकट झाली, अशी मान्यता आहे. ही सोंड उत्तराभिमुख असून लेण्याद्री येथील गणपतीची पाठ दक्षिणाभिमुख आहे. दोन्ही स्थाने समुद्रसपाटीपासून एकाच उंचीवर असून येथील गर्भगृहातून पाहिले असता लेण्याद्रीचा डोंगर सरळ रेषेत दृष्टीपथात येतो. या भौगोलिक आणि आध्यात्मिक संरेखनामुळे या स्थानाला ‘अर्धपीठ’ हे नाव देण्यात आले आहे.
मंचरहून भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर वडगाव काशिंबेग हे छोटेसे गाव आहे. या गावाच्या दक्षिण दिशेकडील एका टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. टेकडीच्या पायथ्याशी घोड नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. निसर्गाची अनोखी किमया असलेले रांजणखळगे या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. नदीच्या प्रवाहामुळे खडकात तयार झालेले हे गोलाकार खड्डे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या प्रवेशद्वाराच्या कमानीतून आत शिरल्यावर डोंगराच्या माथ्यापर्यंत पायऱ्यांचा मार्ग आहे.
या पायऱ्या चढून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या डोंगरमाथ्यावरून सभोवतालच्या परिसराचे विहंगम दर्शन होते.
हेमाडपंती स्थापत्य शैलीचा वारसा जपणाऱ्या या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केलेले आहे. हे छोटेखानी मंदिर देवघराप्रमाणे भासते. मंदिरासमोर पत्र्याचे छत घालून मंडप केलेला आहे. मंडपात भाविकांना बसण्यासाठी बाके व दर्शनरांगेची व्यवस्था आहे. मंदिरात गणपतीची साडेतीन फूट उंचीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे.
केवळ सोंड आणि मुखाचे स्वरूप असलेली ही मूर्ती शेंदराच्या लेपाने आच्छादलेली आहे. मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. मंदिराचे शिखर पारंपरिक रचनेचे आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम आजही मूळ स्वरूपात टिकून असल्याचे सांगितले जाते.
मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा सोहळा येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात मंदिरात अभिषेक, गणेश याग आणि कीर्तनाचे कार्यक्रम रात्रंदिवस सुरू असतात.
माघ महिन्यातील गणेश जयंती हा देखील या मंदिरातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो व हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या धार्मिक कार्यक्रमांसोबतच येथे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. महाराष्ट्र शासनाकडून या क्षेत्राला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.