सोमेश्वर महादेव मंदिर

चास, ता. खेड, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा नदीच्या तीरावर वसलेले चास येथील सोमेश्वर महादेव मंदिर मराठेशाहीच्या वैभवशाली स्थापत्यकलेचा वारसा मानले जाते. शारीरिक व्याधी आणि गृहकलह दूर करणारे जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे. येथील २५६ दिवे लावता येणारी दगडी दीपमाळ हे मुख्य आकर्षण आहे. येथे त्रिपुरारी पौर्णिमेला होणारा दीपोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. पेशवे घराण्यातील थोरले बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई यांची या सोमेश्वरावर गाढ श्रद्धा होती. त्यांच्याच प्रेरणेने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, अशी ऐतिहासिक नोंद आहे. चास (चास कमान) परिसरातील लेण्यांचे अवशेष, प्राचीन शिलालेख आणि भीमा नदीच्या पात्रातील भौगोलिक रचना पाहता, या गावाचा इतिहास प्राचीन काळापासून असल्याचे सिद्ध होते. या मंदिर परिसरातील शिलालेख व भग्न मूर्तीवरून या ठिकाणी पूर्वीपासूनच एखादे भव्य मंदिर असण्याची शक्यता वर्तविली जाते. मध्ययुगीन कालखंडात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ताळसुरे म्हणजेच जालगाव येथील रहिवासी असलेले महादजी कृष्ण जोशी हे चास येथे स्थायिक झाले. त्यांनी आपल्या पराक्रमाने व कौशल्याने मोठे नाव कमावले. महादजी जोशी हे मराठा साम्राज्यात अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कल्याणचे सुभेदार म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अत्यंत श्रीमंत सावकार म्हणून ओळख असलेल्या या ‘चासकर-जोशी’ घराण्याने पेशव्यांना मोहिमांच्या काळात आर्थिक मदत केल्याने या दोन घराण्यांमध्ये कौटुंबिक स्नेह निर्माण झाला होता. याच स्नेहबंधातून महादजी जोशी यांची कन्या लाडूबाई यांचा विवाह १७२० च्या सुमारास थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव काशीबाई असे ठेवण्यात आले. काशीबाईंची सोमेश्वर महादेवावर अढळ श्रद्धा होती. त्या वारंवार दर्शनासाठी चास येथे येत असत. ऐतिहासिक नोंदींनुसार जुलै १७४७ मध्ये काशीबाई रामेश्वरच्या तीर्थयात्रेहून परतल्यावर त्यांनी आपले बंधू कृष्णराव जोशी यांना चास येथे भव्य मंदिर उभारण्याची विनंती केली होती. त्यांच्या याच सूचनेनुसार मंदिराच्या बांधकामाला गती मिळाली आणि १७४९ च्या सुमारास या मंदिराचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले. काही कागदपत्रांमध्ये ६ ऑगस्ट १७५१ रोजी हे काम पूर्ण झाल्याची नोंद आढळते. थोरले बाजीराव पेशवे आणि काशीबाई सण-उत्सवांच्या वेळी येथे दर्शनासाठी येत असत. थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव रघुनाथराव पेशवे यांचा जन्मही चास येथील ऐतिहासिक वास्तूत झाला असल्याचा संदर्भ इतिहासात दिला जातो. आजही चास गावात चासकर जोशींचा ऐतिहासिक वाडा सुस्थितीत उभा आहे. त्या ठिकाणी जतन केलेल्या सात तोफा, पितळी हत्ती, ऐतिहासिक तलवारी आणि जुनी कागदपत्रे या गावाच्या इतिहासाची साक्ष देतात. या स्थानाशी अनेक पौराणिक कथाही जोडलेल्या आहेत. त्यानुसार, भगवान ब्रह्मदेवाकडून विशेष वर प्राप्त केल्यामुळे उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध महादेवाने कार्तिक पौर्णिमेला केला होता. या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दैत्याचे संहारक म्हणून शंकराने धारण केलेले रूप आणि त्यानंतर झालेल्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. पेशवे घराण्याची अशी श्रद्धा होती की सोमेश्वर महादेवाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर घरातील वाद आणि शारीरिक आजार पूर्णपणे बरे होतात. यामुळेच संकटाच्या काळात पेशवे येथे प्रार्थना करण्यासाठी येत असत. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी महादेवाची भक्ती करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात निसर्गाचा कोप कमी होऊन समृद्धी लाभावी यासाठी अभिषेक केले जातात. पुणे-नाशिक महामार्गावरून राजगुरुनगरपासून वाडा रस्त्याने पुढे आल्यावर भीमा नदीच्या काठावर चास हे गाव आहे. मंदिराच्या सभोवताली भीमा नदीचा विस्तीर्ण परिसर पसरलेला आहे. नदीपात्रात दगडांच्या घर्षणामुळे नैसर्गिकरीत्या तयार झालेले भव्य रांजणखळगे पाहायला मिळतात. मंदिराच्या जवळच भीमा नदीवर बांधलेले चास कमान धरण आहे. या धरणामुळे या संपूर्ण परिसराचा कायापालट झाला आहे. मुख्य मंदिराला चोहोबाजूंनी उंच आणि भक्कम अशी दगडी तटबंदी आहे. या तटबंदीमुळे हे मंदिर एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘दिंडी दरवाजा’ असे म्हटले जाते. या भव्य दरवाजातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात सोमेश्वर मंदिरासोबतच हनुमान आणि दत्ताचे लहान मंदिर व चासकर जोशी घराण्यातील पूर्वजांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या आवारात एक प्राचीन बारव आहे. यातील पाणी अत्यंत पवित्र मानले जाते व भाविक ते तीर्थ म्हणून प्राशन करतात. नदीच्या काठावर बाजीराव पेशव्यांच्या काळात बांधलेला दगडी घाट आहे. सोमेश्वर मंदिराची स्थापत्य शैली ही मराठेशाहीच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात केलेले आहे. मंदिरासमोर सात मीटर उंचीची डौलदार आणि भव्य दगडी दीपमाळ आहे. ही दीपमाळ या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. या दीपमाळेवर एकूण पंधरा थर असून त्यावर २५६ पणत्या ठेवण्यासाठी छोटे हस्त आहेत. दीपमाळेच्या बांधकामात गणपती, नाग, पशू-पक्षी आणि वेलींच्या सुंदर आकृत्या कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप आहे. या मंडपात एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. या मूर्तीवरील दागिने आणि नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे.

मुख्य मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपाच्या द्वारपट्टीवर सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती आहे. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक आहे. सभामंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. गर्भगृह जमिनीच्या पातळीपासून थोड्या खालच्या स्तरावर आहे. येथे असलेली मोठी शिवपिंडी ही स्वयंभू मानली जाते. मंदिराचे शिखर मराठेशाहीच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे आहे. त्यावर अनेक देव-देवतांची शिल्पे साकारलेली आहेत. या शिखराच्या माथ्यावर सोन्याचा मुलामा दिलेला कळस आहे. शिखराची रचना दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय शैलींचा मिलाफ दर्शवते.

वर्षभरातील सण व उत्सवांमध्ये येथे त्रिपुरारी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रात्री ९ वाजल्यानंतर होणारा दीपोत्सव हा चास गावाचा सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा आहे. या दिवशी मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ प्रज्वलित केली जाते. या दीपोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दीपमाळ पेटवताना संपूर्ण गावातील विजेचे दिवे बंद करण्यात येतात. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर केवळ तेलवातींच्या प्रकाशाने उजळून निघतो. हा सोहळा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक आणि पर्यटक येथे उपस्थित राहतात. माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला येथे जत्रा असते. या दिवशी मंदिरात अखंड नामस्मरण आणि रुद्राभिषेक केले जातात. यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये विशेष धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद दिला जातो. या सर्व उत्सवी सोहळ्यांमध्ये काशीबाईंचे वंशज असणारे चासकर कुटुंबीय आजही मानाने सहभागी होतात. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • राजगुरुनगरपासून १० किमी अंतरावर
  • पुणे शहरापासून ५५ किमी अंतरावर
  • चाकण व राजगुरुनगर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२०२३०९१
Back To Home