खाटू श्याम मंदिर

सिकंदरपूर, लातूर, ता. जि. लातूर

लातूर शहरातील सिकंदरपूर भागात खाटू श्याम यांचे मंदिर अगदी अलीकडेच उभारण्यात आले आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू येथे असलेल्या प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराच्या धर्तीवर लातूरमध्येही या भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. खाटू श्याम बाबा यांना काही भागांत ‘बलियादेव’ या नावानेही ओळखले जाते. ते भगवान श्रीकृष्णाचे कलियुगातील अवतार मानले जातात. ‘हारे का सहारा, बाबा श्याम हमारा’, अशी त्यांच्याविषयीची भाविकांची भावना आहे. या भावनेतून येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात.

राजस्थान, गुजरात, तसेच उत्तर भारतात खाटू श्याम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्याविषयीच्या पौराणिक आख्यायिकांनुसार, खाटू श्याम हे महाभारतातील महाबली भीमाचे नातू व घटोत्कचाचे पुत्र होत. घटोत्कचास कटकंटा नावाच्या राक्षसकन्येपासून हा पुत्र झाला. त्यांचे केस जन्मतः कुरळे असल्याने त्यांना ‘बर्बरिक’ असे नाव पडले. त्यांचे अन्य एक नाव ‘सुहमद’ असे होते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बर्बरिक यांनी नवदुर्गेची तपस्या करून अमरत्वाचे वरदान मिळवले होते. त्यांनी कठोर तपश्चर्येने शंकरालाही प्रसन्न करून घेत त्यांच्याकडून तीन बाण प्राप्त केले होते. या बाणांच्या साहाय्याने ते कोणतेही युद्ध जिंकण्यास सक्षम झाले होते. पांडव व कौरवांदरम्यानच्या युद्धात कमकुवत पक्षाच्या बाजूने युद्ध लढण्याचे वचन त्यांनी आपल्या मातेला दिले होते.

बर्बरिकाला मिळालेल्या वरदानाची माहिती भगवान श्रीकृष्ण यांना होती. त्यामुळे श्रीकृष्णाने बर्बरिकाला समजावले की तू कोणाच्याही बाजूने युद्ध केले तरी विरुद्ध पक्ष कमकुवत होईल. कौरवांच्या बाजूने लढल्यावर पांडव कमकुवत झाल्यास तुला त्यांच्या बाजूने लढावे लागेल. पांडवांच्या बाजूने लढल्यावर कौरव कमकुवत झाल्यास तुला त्यांच्या बाजूने लढावे लागेल. त्यामुळे तुला दोन्ही पक्षांसोबत लढावे लागेल आणि अखेर केवळ तूच जिवंत राहशील, असे सांगून कृष्णाने त्याला युद्धात सहभागी होण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर श्रीकृष्णाने दान म्हणून त्यांच्याकडून त्यांचे शिर मागितले. त्यांनी ते दान दिले. बर्बरिकाच्या या बलिदानामुळे प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने त्याला वरदान दिले की कलियुगात त्याचे ‘श्याम’ या नावाने पूजन होईल व जो कुणी त्यांचे नाव श्रद्धेने घेईल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यावेळी बर्बरिकाने कौरव-पांडवांचे युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छाही व्यक्त केली होती. तेव्हा ते युद्ध त्याला पाहता यावे यासाठी कृष्णाने त्याचे शिर कुरुक्षेत्रावर एका उंच जागी ठेवले.

असे सांगितले जाते की अनेक वर्षांनी त्यांचे शिर सध्याच्या राजस्थानमधील खाटू या गावातील एका कुंडात आढळले. त्यानंतर तेथील तत्कालीन राजाने त्यांचे मंदिर उभारले. ते मंदिर खाटू श्यामजींचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अनेक भाविक ‘निशान यात्रा’ म्हणजे बाबांचा रंगीत ध्वज हाती घेऊन पायी येतात. भारतभर खाटू श्याम यांची अनेक मंदिरे उभारली गेली आहेत. लातूरमध्ये मोठ्या संख्येने राजस्थानी आणि उत्तर भारतीय समाज वास्तव्यास आहे. दरवर्षी येथून अनेक भाविक राजस्थानमधील खाटू धामला जात असत. आपल्या शहरातही बाबांचे एक भव्य धाम असावे, असे काही भक्तांना वाटले. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी ‘श्री श्याम सेवा समिती, लातूर’ची स्थापना करण्यात आली. समितीने लातूर-बार्शी रोडवरील सिकंदरपूर भागातील ही जागा मंदिरासाठी निश्चित केली. येथे २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. मंदिराची रचना राजस्थानच्या खाटू धामसारखी असावी, असा मानस होता. त्यासाठी खास राजस्थानमधील जयपूर आणि जोधपूर येथून तज्ज्ञ कारागीर बोलावण्यात आले होते. मंदिरात वापरण्यात आलेले दगड आणि त्यावर केलेले कोरीव काम हे राजस्थानी स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. खाटू श्याम यांची मुख्य मूर्ती देखील जयपूरमध्ये विशेषत्वाने घडवून घेण्यात आली आहे. तीन वर्षांत या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले व २२ फेब्रुवारी २०२४ रोजी मंदिरात खाटू श्याम बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या मंदिरास आकर्षक प्रवेशद्वार आहे. मंदिर प्रांगणात समोरच उंचीवर मुख्य खाटू श्याम मंदिर स्थित आहे. येथे चार उपमंदिरेही आहेत. गणपती, रामदेव, शिवशंकर आणि विठ्ठल-रखुमाईची ही मंदिरे आहेत. ही चारही मंदिरे एकाच प्रकारे बांधण्यात आली आहेत. खाटू श्याम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी समोरून दोन पायरीमार्ग आहेत. ज्यांना या पायऱ्या चढणे शक्य नाही, अशा भक्तांसाठी लिफ्टची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मंदिराचे एकूण बांधकाम राजस्थानच्या मंदिर स्थापत्यशैलीशी मिळतेजुळते आहे. मंदिर दुमजली आहे. त्याचा दर्शनी भाग आकर्षक आहे. उंचच उंच खांबांनी या मंदिराच्या रचनेला वेगळीच झळाळी आली आहे. मुख्य दरवाजातून प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या वर एक छोटा घुमट आहे. मंदिरास एकूण तीन शिखरे आहेत. यातील मधले मुख्य गर्भगृहावरील शिखर सर्वात उंच आहे. मंदिरास प्रशस्त सभामंडप आहे. समोरच मोठे गर्भगृह आहे. मध्यभागी मुख्य गर्भगृहात खाटू श्याम यांची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीचा मुखवटा राजस्थानमधील मूळ मूर्तीसारखाच तयार करण्यात आला आहे. त्याला मुकुट, कुंडल, दागिने आणि वस्त्रप्रावरणांनी शृंगारलेले आहे. या गर्भगृहाच्या डाव्या-उजव्या बाजूला राणी सती दादीमा म्हणजे नारायणी देवी आणि सालासर बालाजी म्हणजे हनुमानजी यांची स्थाने आहेत. या मूर्ती खास जयपूरहून घडवून येथे आणण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मंदिरात दिवसातून पाच वेळा आरती केली जाते. मंदिरात भाविक सकाळी सहा ते दुपारी बारा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन घेऊ शकतात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येथे विशेष पूजा आणि भजन संध्येचे आयोजन केले जाते. देवउठणी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होते. येथे कृष्णजन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या मंदिरात फाल्गुन महिन्यातील शुक्ल एकादशीला आणि द्वादशीला जत्रा भरते. यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. लातूर, धाराशिव, बीड आणि कर्नाटक सीमेवरील भाविकही येथे मोठ्या संख्येने येतात. या उत्सवाच्या वेळी खाटू श्याम बाबांची भव्य मिरवणूक (निशाण यात्रा) काढली जाते. बाहेरगावच्या भाविकांसाठी मंदिर परिसरात भक्तनिवास आणि प्रसादाची सुविधा आहे.

उपयुक्त माहिती:

  • लातूर बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

खाटू श्याम मंदिर

सिकंदरपुर, लातूर, टी. जिला. लातूर

Back To Home