औसा शहराच्या सीमेवर, औसा-लातूर मार्गावरील एका टेकडीवर केशव बालाजी मंदिर वसलेले आहे. भक्तांबरोबरच पर्यटकांचेही हे एक आवडते ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर, स्वच्छ व भक्तिमय वातावरण आणि दक्षिण भारतीय वास्तुकलेची आठवण करून देणारे प्रशस्त मंदिर, यामुळे येथे आलेले भाविक एका वेगळ्याच विश्वात रमतात. ‘प्रति-बालाजी’ अशी ओळख असलेल्या या मंदिराला केशव बालाजी हे नाव, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री केशवराव सोनावणे आणि या परिसरातील एक आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व महर्षी केशवानंद बापू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आल्याचे समजते.
आंध्र प्रदेशातील तिरुमला डोंगररांगांत असलेल्या मूळ तिरुपती बालाजी मंदिराची केशव बालाजी मंदिर ही हुबेहूब प्रतिकृती भासते. व्यंकटेश्वर बालाजीचे ते मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. बालाजीची भक्तमंडळी भारतभर पसरलेली आहेत आणि त्यांच्या दर्शनाची इच्छा सर्वच भक्तांना असते. परंतु, आंध्र प्रदेशातील त्यांच्या मूळ मंदिरात जाणे अनेकांना विविध कारणांमुळे शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी ठिकठिकाणी ‘प्रति-बालाजी’ मंदिरे उभारण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्यातही बालाजीची अशी अनेक मंदिरे आहेत; त्यातील दोन मंदिरे प्रमुख मानली जातात. एक लातूर शहरातील जुने व्यंकटेश्वर बालाजी मंदिर आणि दुसरे म्हणजे औसा परिसरातील टेकडीवर नव्याने वसलेले हे केशव बालाजी मंदिर.
हे मंदिर ‘केशव बालाजी देवस्थान ट्रस्ट’द्वारे २०१४ मध्ये उभारण्यात आले. या मंदिराच्या निर्मितीमागे महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री केशवराव सोनावणे आणि आध्यात्मिक संत महर्षी केशवानंद बापू यांची प्रेरणा असल्याचे मानले जाते.
केशवराव सोनावणे (१९२५-२००६) हे महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकारणी आणि निष्णात वकील होते. औसा तालुक्यातील मोगरगा हे त्यांचे मूळ गाव. ते एकूण चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सहकार मंत्रिपद भूषविले. त्यांनी लातूरमध्ये आशियातील पहिली सहकारी ऑईल मिल (डालडा फॅक्टरी) सुरू केली. तसेच, तेरणा साखर कारखाना, किल्लारी साखर कारखाना आणि जवाहर सूतगिरणी यांसारख्या संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, त्यामध्ये केशवराव सोनावणे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी आयुष्यभर औसा आणि लातूर परिसरातील जनतेच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी काम केले. त्यांच्या २००६ मध्ये झालेल्या निधनानंतर, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या लोककल्याणाच्या कार्याला अभिवादन म्हणून ‘श्री केशव बालाजी देवस्थान ट्रस्ट’ स्थापन करून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.
या मंदिर उभारणीमागे महर्षी केशवानंद बापू यांचीही प्रेरणा होती. ते या परिसरातील एक सिद्ध पुरुष आणि महान आध्यात्मिक गुरु होते. ते मूळचे या भागातील नसले, तरी त्यांनी आपल्या आध्यात्मिक कार्यासाठी आणि तपश्चर्येसाठी औसा येथील या टेकडीची निवड केली होती. याच ठिकाणी आज बालाजी मंदिर दिमाखात उभे आहे. बापूंचे जीवन अत्यंत साधे आणि भक्तिमय होते. त्यांनी या परिसरात अनेक वर्षे मौन साधना आणि ईश्वरचिंतन केले. केवळ कर्मकांडावर भर न देता, मानवी सेवा आणि नामस्मरणाचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले. केशव बालाजी मंदिराच्या बाजूलाच महर्षी केशवानंद बापूंची मूर्ती असलेले मंदिरही आहे.
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर बांधलेले हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे आतल्या बाजूला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दाक्षिणात्य ‘गोपूर’ पद्धतीचे आहे. या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा साहित्याच्या दुकानांची रांग पार करावी लागते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुमारे तीस पायऱ्या उतरून मंदिराच्या विस्तृत पटांगणात प्रवेश होतो. उत्तम स्वच्छता राखलेल्या या प्रांगणाच्या मध्यभागी बालाजीचे मुख्य मंदिर आहे.
प्रांगणात उजवीकडे भाविकांना बसण्यासाठी प्रेक्षागृहासारखी रचना आहे. येथे उत्सवांच्या वेळी धार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. डाव्या हाताला देवस्थान ट्रस्टचे कार्यालय आणि त्याजवळच यज्ञशाळा आहे.
मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन अशी एकूण चार उपमंदिरे आहेत. यामध्ये सिद्धिविनायक गणपती, विठ्ठल-रुक्मिणी, चंद्रमौळीश्वर महादेव आणि महर्षी केशवानंद महाराज यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या समोर बालाजी मंदिराचे वैशिष्ट्य असलेला ‘गरुडध्वज’ आहे. सभामंडपात मुख्य गर्भगृहाच्या समोर हात जोडून उभा असलेल्या गरुड देवाची मूर्ती आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात स्टीलचे कठडे वापरून दर्शनरांगांची शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठ्या द्वारपालमूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी भगवान व्यंकटेश बालाजी यांची देखणी आणि प्रसन्न मूर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेली ही मूर्ती, हुबेहूब तिरुपती येथील मूर्तीसारखी दिसते. सुवर्ण अलंकार, मौल्यवान वस्त्रे आणि फुलांच्या माळांनी मूर्तीला सुशोभित केलेले असते.
बालाजीच्या मूर्तीसभोवती दोन्ही बाजूंना महालक्ष्मी आणि पद्मावती यांच्या मूर्ती आहेत. दाक्षिणात्य परंपरेनुसार, भगवान विष्णूंसोबत त्यांच्या या दोन्ही शक्तींची पूजा केली जाते. या सर्व मंदिरांची रचना दाक्षिणात्य ‘द्राविड’ शैलीची आहे. मंदिराचे उंच गोपूर, कोरीव काम आणि प्रांगणात ठिकठिकाणी लावलेली झाडे परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसादालयात भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येतो.
‘ब्रह्मोत्सव’ हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. तिरुपतीमध्ये ज्याप्रमाणे नऊ दिवस ब्रह्मोत्सव चालतो, तसाच सोहळा येथेही आयोजित केला जातो. या काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाच्या विविध वाहनांवरून (गरुड, गज, अश्व इत्यादी) मिरवणुका काढल्या जातात. उत्सवाची सुरुवात ध्वजारोहणाने होते आणि सांगता चक्रस्नान विधीने होते. ‘वैकुंठ एकादशी’ (मुक्कोटी एकादशी) हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मंदिरात ‘वैकुंठ द्वार’ म्हणजेच स्वर्गाचे द्वार तयार केले जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी या द्वारातून देवाचे दर्शन घेतल्यास जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. या निमित्ताने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून हजारो भाविक पहाटेपासून येथे गर्दी करतात. मंदिराचा वर्धापन दिन प्रतिवर्षी २२ फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यात विशेष होम-हवन, अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात व्यंकटेश बालाजीचे दर्शन घेता येते.