नीलकंठेश्वर मंदिर

निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर

लातूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिराचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. हे मंदिर सर्व थरातील भाविकांचे श्रद्धास्थान तर आहेच, शिवाय ते प्राचीन भारतीय वास्तुकलेचा आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट आविष्कार आहे. पाषाणात कोरलेले हे काव्य पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांसह पर्यटक आणि इतिहासप्रेमीही निलंगा शहराला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. त्रिकूट पद्धतीच्या म्हणजेच तिहेरी गर्भगृह असलेल्या या पुरातन मंदिरात वर्षातील काही विशिष्ट दिवशी किरणोत्सव होतो. तो पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.

या मंदिराची निर्मिती ११ व्या ते १२ व्या शतकात झाल्याचे मानले जाते. या काळात येथे कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता होती. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा, तसेच त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा ऊर्फ आहवमल्ल हे या काळात राज्य करीत होते. या चालुक्यांच्या काळात दक्षिण भारतात अनेक भव्य आणि सुंदर मंदिरे उभारली गेली. लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर व भूतेश्वर मंदिर, औसा तालुक्यातील बोरगाव येथील नकुलेश्वर मंदिर, पानगाव येथील मूळचे विष्णूचे असलेले विठ्ठल मंदिर ही या परिसरातील काही उदाहरणे आहेत. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे त्यापैकी एक होय. निलंगा येथील कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर त्या काळातील प्रगत स्थापत्यशैलीचे दर्शन घडवते.

या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की प्राचीन काळी या भागात निळवंती नावाची एक निस्सीम शिवभक्त राहत होती. तिने भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी येथे कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न होऊन शिवशंकर येथे प्रकट झाले. निळवंतीमुळे ते येथे आल्यामुळे त्यांचे नाव नीलकंठेश्वर असे झाले. या मंदिरावरून गावाला निलंगा असे नाव पडल्याचे सांगितले जाते. काहींचा तर असा दावा आहे की निलंगा शहराचे मूळ नाव निळवंती होते; पण त्याला ठोस आधार नाही. या मंदिराच्या खालून एक गुप्त भुयार थेट औसा किल्ल्यात जाते असाही दावा केला जातो. मात्र, त्यास कोणताही ऐतिहासिक वा स्थापत्यशास्त्रीय आधार नाही.

नीलकंठेश्वराचे हे मंदिर भूमीज स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मंदिरासमोर कमलाकृती स्तंभ असलेला खुला सभामंडप आहे. हे बांधकाम आधुनिक काळातील आहे. मूळ मंदिराची संरचना गूढमंडप म्हणजेच बंदिस्त सभामंडप, अंतराळ आणि तिहेरी गर्भगृह म्हणजेच त्रिकूट वा त्रिदल पद्धतीची आहे. या संरचनेत चालुक्यकालीन स्थापत्य शैलीबरोबरच यादवकालीन स्थापत्यशैलीची काही वैशिष्ट्ये आढळतात. यादवकाळात या मंदिराच्या रचनेत काही सुधारणा वा दुरुस्त्या झाल्यामुळे त्यावर ही यादवकालीन स्थापत्याची छाप आढळते, असे मंदिर अभ्यासकांचे मत आहे. मंदिराची तारकाकृती रचना हे चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचे एक वैशिष्ट्य येथे दिसते. यामुळे मंदिराच्या बाह्य भिंतींमध्ये असंख्य कोपरे आणि खाचा तयार झाल्या आहेत. साध्या सपाट भिंतीपेक्षा या भिंतींचे पृष्ठक्षेत्रफळ जास्त असते. यामुळे येथे शिल्पे कोरण्यासाठी अधिक जागा मिळते. त्याचप्रमाणे या रचनेमुळे निर्माण होणारा छायाप्रकाशाचा खेळ मंदिरास जिवंतपणा प्राप्त करून देतो. नीलकंठेश्वराच्या या मंदिराच्या निर्मितीत स्थापत्यशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राचाही विचार केल्याचे दिसते. हे मंदिर विशिष्ट कोनात बांधले आहे. त्यामुळे वर्षातील ठराविक काळात, विशेषतः सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असताना, सूर्योदयाची किरणे मंदिराच्या मुख्य महाद्वारातून आत प्रवेश करतात. ती सभामंडप आणि अंतराळ ओलांडून थेट मुख्य गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात. यालाच ‘किरणोत्सव’ असे म्हणतात.

मंदिरासमोरील खुल्या सभामंडपातून मंदिराच्या बंदिस्त दगडी सभामंडपात प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वारासमोरच एक प्राचीन नंदीमूर्ती आहे. सभामंडपात अनेक नक्षीदार स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभावर विविध पौराणिक व्यक्तिरेखा कोरलेल्या आहेत. सभामंडपाचे वितान म्हणजेच छत ‘नवरंग’ प्रकारचे आहे. सभामंडपाचे छत जेव्हा नऊ समान किंवा प्रमाणबद्ध भागांत विभागलेले असते, तेव्हा त्याला ‘नवरंग मंडप’ असे म्हटले जाते. सभामंडपात मध्यभागी चार मुख्य खांब आहेत. या चार खांबांमुळे मंडपाचे नऊ भाग तयार झाले आहेत. मध्यभागी रंगशिळा आणि तिच्या सभोवताली आठ उपभाग अशी ही नवरंगाची विभागणी आहे. मंदिरातील मध्यवर्ती वितानावर अत्यंत बारीक कोरीव काम आहे. त्यात अष्टकोनी कमळाची रचना आहे. हे चालुक्य शैलीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात येते. सभामंडपातील देवकोष्टकांत गणपती, सप्तमातृका, सूर्यनारायण यांच्या मूर्ती स्थापित आहेत. मध्यभागी असलेल्या रंगशिळेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अंतराळ आणि गर्भगृहे आहेत. येथे एक मुख्य व दोन उप अशी तीन गर्भगृहे आहेत.

या तिन्ही गर्भगृहांची रचना एकसारखी आहे. त्यांचे अंतराळ आणि तेथील नक्षीकामही बहुतांश एकसारखे आहे. या गर्भगृहांची द्वारचौकट पंचशाखीय आहे. यास ‘नंदिनी’ प्रकारची द्वारचौकट असे म्हणतात. येथील उजवीकडील उपगर्भगृहात भगवान विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे. विष्णूने हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले आहे. मूर्तीशिळेवर विष्णूच्या पायाशी दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन अशा स्त्रीप्रतिमा कोरलेल्या आहेत. त्या देवतांच्या आणि नद्यांच्या असल्याचे सांगण्यात येते. वैष्णव परंपरेत आणि विशेषतः चालुक्यकालीन मूर्तीकलेत विष्णूच्या पायापाशी दोन स्त्रिया दाखवण्याची प्रथा आहे. विष्णू हा विश्वाचा पालक असल्याने, लक्ष्मी आणि पृथ्वी या दोन्ही त्याच्या शक्ती म्हणून त्याच्या चरणांशी दाखवल्या जातात. काही प्राचीन मंदिरांमध्ये मूर्तीच्या प्रभावळीच्या तळाला गंगा आणि यमुना यांच्या प्रतिमा कोरण्याची परंपरा आहे. विष्णूच्या पायातून गंगेचा उगम झाला आहे, अशी धारणा असल्याने आणि पवित्रतेचे प्रतीक म्हणून या नदी देवतांची शिल्पे तिथे कोरलेली असतात. डावीकडील उपगर्भगृहात हरगौरीची मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीशिळेवरील कोरीव नक्षीकाम विष्णूच्या मूर्तीशिळेशी साधर्म्य साधते. येथे मुख्य मूर्ती शंकर आणि पार्वतीची आहे. मूर्तीच्या तळाशी गणेश, कार्तिकेय आणि नंदीची मूर्तीही आहे.

मुख्य गर्भगृह चौकोनाकार आहे. त्याच्या चार कोपऱ्यांत नक्षीदार खांब कोरण्यात आले आहेत. त्याचे वितान घुमटाकार आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणात घडवलेली शिवपिंडी स्थापित आहे. शिवपिंडी नेहमीपेक्षा थोडी उंच आहे. शाळुंकेचा आकारही मोठा आहे. मंदिराच्या बाह्यभागांवर अनेक छोट्या-मोठ्या मूर्ती दिसतात. त्यात महिषासुरमर्दिनी, शिव, उमा, भैरव, चामुंडा, वराह, नरसिंह, विष्णू, हरिहर इत्यादी देवदेवतांच्या मूर्तींसह डालमालिका, केतकीभरणा, पद्मगंधा, मर्दला, शुकसारिका, जया, कर्पूरमंजिरी, दर्पणा या प्रकारच्या सुरसुंदरींची शिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत.

या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १.३० पर्यंत आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८.३० पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. उत्सवकाळात मात्र दिवसभर दर्शन सुरू असते. येथे रोज सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वाजता धूपारती होते. महाशिवरात्र हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव आहे. या दिवशी पहाटेपासूनच लघुरुद्र, अभिषेक करण्यात येतो. लातूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यावेळी मोठी जत्रा भरते. भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यातही मंदिराचा परिसर भक्तिमय असतो. श्रावणी सोमवारी शिवभक्त लांबून अनवाणी चालत दर्शनाला येतात. श्रावणातील प्रदोष तिथीला विशेष पूजा आणि आरती केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात मोठा दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवशी मंदिराचा संपूर्ण परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघतो. मंदिर परिसरात मारुतीचे मंदिर असल्याने हनुमान जयंतीही येथे मोठ्या उत्साहात साजरी होते.

उपयुक्त माहिती:

  • निलंगा बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • लातूर येथून ५२ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून निलंगासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

नीलकंठेश्वर मंदिर

निलंगा, तालुका निलंगा, जिला। लातूर

Back To Home