महादेव व विष्णू मंदिर

खरोसा लेणी, खरोसा, ता. निलंगा, जि. लातूर

महाराष्ट्रातील लेणी परंपरेत अजिंठा आणि वेरूळला जागतिक कीर्ती लाभली असली, तरी मराठवाड्याच्या मातीत अशी अनेक वास्तू दडलेल्या आहेत, ज्या स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील खरोसा लेणी हे असेच एक प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळ आहे. ही लेणी केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून त्या काळातील हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या सांस्कृतिक समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली विष्णू आणि शिवाची मंदिरे या समन्वयाची साक्ष देतात.

लातूर जिल्ह्यास अतिप्राचीन इतिहास आहे. येथे पुराश्मयुगापासून म्हणजे सुमारे तीन लाख वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व होते, असे पुरावे आढळले आहेत. प्राचीन काळी लट्टलूर किंवा लत्तनूर, लत्तलौर, रतनपूर या नावांनी लातूर ओळखले जात असे. मौर्यकाळात दक्षिणेकडे १६ महाजनपदे होती, असा उल्लेख ‘अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात आहे. अश्मक किंवा अस्सक वा आंधक महाजनपद हे त्यापैकी एक होते. यातील अश्मक महाजनपदाच्या दक्षिणेकडील कुंतल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात लातूरचा समावेश होता. लातूरवर बदामीच्या चालुक्यांचीही राजवट होती. काही बदामीच्या चालुक्यांनी स्थापत्य कलेस मोठा आसरा दिला होता. लातूर जिल्हा गॅझेटियरनुसार, त्यांच्या काळात खरोसा लेणी खोदण्यात आली. हा काळ इसवी सनाच्या सहाव्या ते आठव्या शतकातील आहे.

खरोसा गावाचा एक प्राचीन उल्लेख कल्पसमूह या ग्रंथामध्येही आढळतो. यादव काळात सैद महंमद या मुस्लिम ग्रंथकाराने रचलेल्या या मराठी ग्रंथामध्ये खरोसे हे रसविद्येस उपयुक्त ठरणारे स्थान असल्याचे म्हटले आहे. पाऱ्यावरील विशिष्ट प्रक्रियेने लोहादी धातूंचे सुवर्णात रूपांतर करणे आणि पाऱ्यापासून बनवलेल्या औषधांनी देह अजरामर बनवणे या विद्येस ‘रसविद्या’ म्हणत. या विद्येसंदर्भात महत्त्वाच्या असलेली अनेक यादवकालीन स्थाने सैद महंमदाने नमूद केली आहेत. त्यात खरोसेचा समावेश आहे. यावरून या स्थानाचे महत्त्व लक्षात येते. इतिहासकाळात या स्थानाचे माहात्म्य, तसेच येथील लेणी विस्मृतीत गेली होती. जेम्स बर्जेस या स्कॉटिश अधिकाऱ्याने ही लेणी सर्वप्रथम विद्वान अभ्यासकांच्या नजरेस आणून दिल्या.

या लेण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती जांभ्या दगडात खोदलेली आहेत. हा दगड सामान्यतः कोकणात आढळतो. पठारावर काळा बेसाल्ट आढळतो. खरोसा हा परिसर मात्र यास अपवाद आहे. या गावानजीक जांभ्या दगडाचा छोटा डोंगर आहे. त्यावर एकूण १२ लेण्यांचा समूह आहे. या समूहातील ‘महादेव’ आणि ‘लकोला’ नावाची लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अन्य लेणी दुय्यम प्रकारची मानण्यात येतात.
यातील विष्णूची मूर्ती असलेली गुंफा ‘दशावतार लेणी’ म्हणून ओळखली जाते. गुंफेच्या प्रवेशद्वारावर नक्षीदार खांब आहेत. आत प्रशस्त सभामंडप आहे. त्यात अनेक कोरीव खांब आहेत. गुंफेच्या भिंतींवर भगवान विष्णूच्या विविध रूपांचे आणि अवतारांचे चित्रण केलेले आहे. उठाव शिल्प पद्धतीची ही शिल्पे आहेत. या गुंफेत शेषशायी विष्णूचे सुंदर शिल्प आहे. विष्णूने नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध करतानाचे रौद्ररूपी दृश्य येथे कोरले आहे. विष्णूच्या वराह अवताराचे शिल्पही येथे आहे. वामनाने बळी राजाकडून तीन पावले भूमी दान मागितल्यानंतर धारण केलेले त्रिविक्रम रूप, ज्यात विष्णूचा एक पाय आकाशाकडे झेपावलेला आहे, येथे पाहायला मिळते. येथे असलेल्या गर्भगृहासारख्या रचनेत विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकी मुकुट आहे. हातांत शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले आहेत.

या लेण्याच्या शेजारी शिवलिंग असलेले लेणे आहे. त्यास महादेव लेणे म्हणून ओळखले जाते. सुमारे ६० फूट रुंद व ६९ फूट लांबीच्या या गुंफेसमोर प्रशस्त पटांगण आहे. लेण्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंच्या पाषाणांवर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. मुख्य लेण्यात प्रवेश करण्यापूर्वी नक्षीदार खांबांवर आधारलेला एक वऱ्हांडा लागतो. आत मोठा सभामंडप आहे. सभामंडपातील खांब हे चौकोनी आणि गोलाकार अशा मिश्र शैलीतील आहेत. खांबांच्या वरच्या भागात कीर्तिमुख आणि वेलींचे नक्षीकाम आहे. सभामंडपात मध्यभागी गर्भगृह आहे. या गर्भगृहात आधुनिक टाईल्स लावण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी एक भव्य आणि सुबक शिवपिंडी स्थापन केलेली आहे. ही पिंडी एका मोठ्या वेदीवर स्थित आहे. येथे आजही शिवलिंगाची पूजा केली जाते. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेसा कोरीव मार्ग आहे. या लेण्याच्या दक्षिणेकडील भिंतीवर सामान्यतः वैष्णव, तर उत्तरेकडील भिंतीवर शैव शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर मुख्यतः मल्ल, नागदेवता तसेच विष्णू अवतारांपैकी वराह, वामन, नरसिंह, कृष्ण, श्रीराम आदी अवतार कोरलेले आहेत. उत्तरेकडील भिंतीवर रावणानुग्रह मूर्ती, शिव-पार्वती, तांडवनृत्य, भैरव इ. शिल्पे आहेत. याशिवाय येथे समुद्रमंथन शिल्पपटही कोरलेला आहे.

या लेण्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला काही लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. येथे भगवान बुद्धांच्या शांत आणि भव्य मूर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्यांच्या रचनेत विहार आणि चैत्य असे दोन्ही प्रकार आढळतात. टेकडीच्या एका बाजूला जैन लेणीही आहेत. त्यात तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. लेणी समुहाच्या शेजारीच डोंगरमाथ्यावर रेणुका देवीचे मंदिर आहे.

या लेणी समूहातील महादेव लेण्यात महाशिवरात्रीला मोठी गर्दी असते. यावेळी येथे अभिषेक आणि भजन-कीर्तन केले जाते.

श्रावण महिन्यातही परिसरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. पावसाळ्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते. खरोसा लेणी आणि तेथील मंदिरे पर्यटकांसाठी सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत खुली असतात.

उपयुक्त माहिती:

  • निलंगा येथून १० किमी अंतरावर
  • लातूर येथून ४३ किमी अंतरावर
  • निलंगा व लातूर येथून खरोसासाठी एसटीची सुविधा
  • गावातून खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत येता येते
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

महादेव और विष्णु मंदिर

खरोसा गुफाएं, खरोसा, ताल। निलंगा, जिला. लातूर

Back To Home