महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिव मंदिरे आहेत. मात्र त्यात शिव आणि पार्वतीचे एकत्रित स्थान असलेली मंदिरे अतिशय मोजकीच. असेच एकत्रित स्थान असलेले एक मंदिर पुणे-सोलापूर मार्गावरील फुरसुंगी गावामध्ये आहे. फुरसुंगीचे ग्रामदैवत असलेल्या या शिव मंदिरामध्ये भक्तांची कायमच वर्दळ असते.
पुण्यापासून जवळच असलेल्या फुरसुंगी या शहरवजा गावामध्ये आल्यानंतर शंभू महादेव मंदिर नजरेस पडते. जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन मंदिर हे पूर्ण पांढऱ्या संगमरवरात बनविलेले आहे. त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामामुळे हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते. रात्रीच्या वेळी विविधरंगी विजेच्या दिव्यांमुळे वेगवेगळ्या रंगांमध्ये न्हाऊन निघणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते.
महादेवाची मंदिरे साधारणतः काळ्या दगडात बांधलेली दिसतात. हे मंदिर संगमरवरी दगडातील असून, ते महाराष्ट्रातील एकमेव असावे, असे ग्रामस्थांचे मत आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च झाला असून ग्रामस्थांनी दिलेल्या वर्गणीतून तो करण्यात आला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार ११ वर्षे सुरू होता.
मंदिर परिसर विस्तृत असून प्रवेशद्वार भक्कम दगड वापरून तयार करण्यात आले आहे. त्यावर ‘ओम् नमः शिवाय’ हा मंत्र आणि त्याहीवर प्रवेशद्वाराच्या शिखरावर शुभ्र रंगातील शिव-पार्वतीच्या मूर्ती दिसतात. मंदिरासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. मंदिराच्या पायऱ्यांच्या बाजूला मोठे त्रिशूळ आणि डमरू आहे. मंदिरावर सोनेरी लेप दिलेला कळस असून त्याच्या बाजूलाही डमरू आणि त्रिशूळ उभारण्यात आले आहेत.
सभामंडपातील खांबांवर व भिंतींवर सुरेख नक्षीकाम आहे. सभामंडपात दर्शनी भागात काळ्या दगडात घडवलेली नंदीची मूर्ती आहे. संपूर्ण शुभ्र मंदिरात सभामंडपाच्या मधोमध असलेली ही काळी मूर्ती उठून दिसते. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती, तर उजव्या बाजूला राम पंचायतन आहे. (राम-सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्ती). संगमरवरात घडवलेल्या या मूर्ती देखण्या आहेत.
गाभाऱ्यात दुर्मिळ असलेले शिव-पार्वती स्वरूप उत्तरमुखी शिवलिंग आहे. (एकाच पिंडीवर दोन लिंग आहेत. ते शंकर व पार्वतीचे प्रतीक असल्याचे मानले जाते.) सोबत नागदेवताही आहेत. अशा प्रकारचे शिवलिंग क्वचितच इतरत्र पाहायला मिळते. गाभारा प्रशस्त असून येथे एकाच वेळी अनेक जण ध्यानधारणा करू शकतात.
मंदिराच्या आवारात असलेले बेलाचे झाड १८ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या झाडाच्या छायेतच पूर्वीचे मंदिर होते, असे स्थानिक सांगतात. पाडव्यानंतर पाचव्या दिवशी फुरसुंगीमध्ये पुण्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येते. रोषणाई आणि लेझर शोमुळे मंदिर उजळून जाते. सुंदर अशी फुलांची सजावटही यावेळी करण्यात येते. महाशिवरात्री आणि यात्रेदरम्यान हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. उरुसादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचवेळी कुस्त्यांचा आखाडा आणि बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते. या मंदिरातील महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.