वर्षातील फक्त चार महिने दर्शन घेऊ शकतो, असे वाघेश्वर येथील शिव मंदिर पुण्यातील मावळ तालुक्यात आहे. स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना असलेले हे मंदिर पवना धरणाच्या पाणीसाठ्याच्या ठिकाणी आहे.
वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी भक्तिस्थळ आहे, तर इतिहास तज्ज्ञांसाठी ते ऐतिहासिक संदर्भ देणारे ठिकाण आहे. शिवाय हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांनाही मोलाची माहिती पुरवते. पावसाळा आणि नंतरचे चार महिने ते पाण्याखाली असते. या मंदिरातील वाघेश्वराचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येथे येत असतात.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी की येथून जवळच असणाऱ्या अजिवली येथील गुहेमध्ये एक ऋषी राहत होते. त्यांच्याकडे या परिसरातील एक गुराखी आला. त्याच्या गुरांमधली एक गाय नेहमी काही काळ गायब होत असल्याचे त्याने ऋषींना सांगितले. ऋषी व गुराख्याने गाईचा पाठलाग केल्यानंतर त्यांना दिसले की एका ठिकाणी तिच्या सडांमधून आपोआप दुधाच्या धारा खाली पडत होत्या. ऋषींनी त्या जागी जाऊन तिथे पाहिले असता, त्या ठिकाणी शंकराची पिंड असल्याचे दिसले. त्याच ठिकाणी आजचे हे वाघेश्वराचे मंदिर उभे आहे.
असे सांगितले जाते की या मंदिराची निर्मिती ११व्या किंवा १२व्या शतकातील असण्याची शक्यता आहे. हेमाडपंती शैलीचे हे मंदिर एकेकाळी मोठ्या विस्तारित जागेत वसले होते. मंदिराभोवती एक तलाव होता. त्या काळी या मंदिराभोवती पाच एकरांपेक्षा जास्त जागा मोकळी होती. त्या मोकळ्या जागेवर त्रिपुरारी पौर्णिमा व महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरत असे. भोर संस्थानचे पंतसचिव या यात्रेचा खर्च करीत असत.
पवना धरणाची निर्मिती १९६५ मध्ये करण्यात आली. १९७१ नंतर धरणातील पाणीसाठा वाढू लागल्यावर हे मंदिर पाण्याखाली जाऊ लागले. मंदिर संपूर्ण दगडांचे असल्यामुळे पाण्यामुळे मंदिराची काही प्रमाणात पडझड होऊ लागली आहे. सतत पाण्यात असल्याने हे मंदिर जेव्हा मार्च महिन्यात पाण्याबाहेर दिसयला लागते तेव्हा सर्व गावकरी मिळून या मंदिराची साफसफाई करतात. मंदिरातील कळसापासून ते भिंतीच्या दगडांना आलेली शेवाळ काढून मग मंदिरात पूजा-अर्चा सुरू होते.
या मंदिराशी छत्रपती शिवाजी महाराजांचाही संबंध असल्याचे सांगण्यात येते. कोकण-सिंधुदुर्गची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. महाराज तिकोणा व कठीणगड (तुंग) किल्ल्यावर आल्यानंतर आवर्जून येथे दर्शनाला येत असत. त्यामुळे पडझड झाली असली तरी भाविक आणि पर्यटक या मंदिरात दर्शन आणि त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी येथे येत असतात.
मंडपातील सुबक नंदी पाहून मंदिराच्या सौंदर्याची कल्पना येऊ शकते. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. सभामंडपातील काही स्तंभ चौकोनी; तर काही गोलाकार आहेत. सभामंडपातील देवकोष्ठके सततच्या पाण्याच्या माऱ्यामुळे भग्न झाली आहेत. येथेच सुळे बाहेर आलेला आणि मोठी कर्णफुले परिधान केलेला दैत्य दिसून येतो. आतमध्ये गणेशाच्या दोन मूर्ती आहेत. दोन पायऱ्या उतरल्यावर सभागृहात जाता येते. गाभाऱ्यातील शिवलिंग जास्तीत जास्त वेळ पाण्यात असूनही सुंदर दिसते. शिवलिंगासमोरच पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या आजूबाजूला ७० विरगळी आहेत. त्यापैकी काही सुस्थितीत आहेत. मंदिराच्या परिसरात बऱ्याच समाधी शिळाही दिसतात, त्या धरणातील गाळात रुतून बसल्या आहेत.