पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी या गावात खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. जेजुरी येथील खंडोबा मंदिराची प्रतिकृती असल्याने हे ठिकाण ‘प्रतिजेजुरी’ म्हणूनही ओळखले जाते. मुळा, मुठा आणि भीमा नद्यांच्या संगमाजवळ एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. या परिसराला ‘मल्हार गड’ असे म्हटले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला १०५ कळस आहेत.
मंदिराची आख्यायिका अशी की देलवडीजवळील वांझरवाडी येथील एक मुलगा दररोज रात्री खंडोबाच्या भेटीसाठी १८ कोस दूर जेजुरी येथे पायी जात असे व दर्शन घेऊन पुन्हा घरी येत असे. कित्येक वर्षे त्याचा हा नित्यक्रम होता. खंडोबा या मुलावर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला विचारले, ‘तू एवढी भक्ती करतोस, तुला काय वरदान देऊ?’ त्या मुलाने ‘मला तुझी नित्य भक्ती करता येईल, असे काही दे’ असे मागणे देवाकडे मागितले. देव लगेच तयार झाले आणि म्हणाले, ‘दिले.’ तेव्हापासून खंडोबा देव, बाणाई, म्हाळसा हे देलवडी गडावर राहू लागले. देवाने म्हटल्याप्रमाणे या गावचे नाव ‘दिले-वाडी’ असे होते. त्यानंतर ते ‘देलवडी’ असे झाले.
खंडोबाचे मंदिर पुरातन असून हेमाडपंती शैलीतील आहे. निसर्गसमृद्ध परिसरात असलेल्या या मंदिराला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळालेला आहे. देलवडी गावात असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून पायऱ्या चढून गडावरील मंदिरापर्यंत पोहचता येते. गडावर आल्यानंतर मंदिरात जाण्यासाठी कमान आहे. मंदिराभोवती सुमारे ५०० फूट लांबीची व १८ फूट उंचीची चिरेबंदी तटभिंत आहे. या तटभिंतीच्या तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. त्यातील एक दक्षिणेला, दुसरे उत्तरेला व मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. मंदिर परिसरात तीन दीपमाळा आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. येथे दररोज सकाळी व सायंकाळी नगारा व चौघडा वाजविण्यात येतो.
मंदिरासमोर नंदीमंडप आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला जुन्या दगडी बांधकामातील खोल्या आहेत. डाव्या बाजूच्या खोलीमध्ये देवाच्या विश्रांतीची जागा आहे. सभामंडपात खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्याच्या दोन मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील द्वारपट्टीवर मध्यभागी गणपती असून बाजूला नक्षीदार फुले कोरलेली आहेत. गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसा व बाणाई यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात शंकर व बाणाई यांची मंदिरे आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीनिमित्त या मंदिरात खंडोबा देवाची यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. संपूर्ण गावातून देवाची पालखी फिरविण्यात येते. त्यावेळी गावातील भाविक वेगवेगळी सोंगे घेतात. यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री ‘तेलहांडा’ हा कार्यक्रम असतो. यामध्ये देवाच्या मूर्तीला तेलाने आंघोळ घालतात. मुख्य यात्रेच्या दिवशी देवाची महापूजा व महाभिषेक होतो. त्यानंतर तळीभंडार होते. गावोगावचे वाघ्या-मुरळी येऊन मंदिरात कला सादर करतात. यावेळी नैवेद्य म्हणून भाजी-भाकरी, कांद्याची पात, वांग्याचे भरीत तयार केले जाते, तसेच पुरणपोळीचा नैवेद्यही देवाला दाखवला जातो. नवस फेडण्यासाठी यावेळी भाविकांची गर्दी असते. भंडारा व खोबरे उधळत भाविक आपला नवस फेडतात. यावेळी संपूर्ण मंदिराला रोषणाई करण्यात येते.