महादेव मंदिर आणि बारव

कुपटा, ता. मानोरा, जि. वाशीम

प्राचीन काळी वत्सगुल्म म्हणून ओळखले जाणारे वाशिम ही वाकाटकांची राजधानी होती. वाकाटक हे शिवाचा अवतार मानल्या जाणाऱ्या भैरवाचे उपासक होते. त्यांच्यानंतर येथे सत्तेवर आलेले राष्ट्रकूट हेही शिवउपासक होते. वेरूळमधील कैलास लेणे हे राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याने बांधल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. या राजांच्या काळात अनेक शिवमंदिरे उभारण्यात आली. यानंतर येथे यादव काळातही अनेक लहान-मोठी मंदिरे उभारण्यात आल्याचे पुरावे आढळतात. कुपटा येथील महादेव मंदिर हे त्यांपैकीच एक होय. या प्राचीन मंदिरासमोर दगडात बांधलेली मोठी बारव आहे.

वाशिमचे प्राचीन नाव ‘वत्सगुल्म’ होते, ज्याचा उल्लेख महाभारत काळात आढळतो. महाभारत, वात्सायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, वत्सगुल्म माहात्म्य आदी ग्रंथांत ‘वत्सगुल्म’ असा त्याचा उल्लेख आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, हा प्राचीन दंडकारण्याचा भाग होता. येथे वत्सऋषींचा आश्रम होता. त्यांच्या घोर तपश्चर्येने देवांच्या मनातही धडकी भरली. ते सर्व जण येथे जमा झाले व वत्सऋषींच्या आश्रमाच्या परिसरात देवांचे हे ‘गुल्म’ वास करू लागले; म्हणून त्यास ‘वत्सगुल्म’ असे नाव पडले. त्याचे प्राकृतमध्ये ‘वच्छगुम्म’ असे झाले आणि त्यावरून त्यास मुस्लिम राजवटीत वाशिम असे नाव पडले. येथे इ.स. ३३० ते ५५० या काळात वत्सगुल्म शाखेच्या वाकाटक राजघराण्याची सत्ता होती. यानंतर येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादवांची सत्ता प्रस्थापित झाली.

इ.स. १२१० मध्ये गादीवर आलेला यादव नृपती सिंघण याचा खोलेश्वर हा सेनापती होता. खोलेश्वर हा मुद्गल गोत्री ऋग्वेदी ब्राह्मण होता. काही इतिहासकारांच्या मते तो मूळचा आंबाजोगाईचा असावा. त्याची योगेश्वरी देवीवर भक्ती होती. विदर्भातील वऱ्हाड प्रांताशी त्याचा निकटचा संबंध होता. अमरावतीच्या पश्चिमेस पूर्णेच्या काठावरील खोलापूर हे गाव त्याने आपल्या नावाने वसवले होते. हे गाव कुपटापासून सुमारे १०० किमी अंतरावर वसलेले आहे. सिंघणाचा एक सेनापती चमूप याने बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यात शिवपूर नावाची शैवांची एक वसाहत वसवली होती. शैव धर्मास मिळालेल्या अशा प्रकारच्या राजाश्रयामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक शिवमंदिरे उभारण्यात आली. कुपटा येथील महादेव मंदिर हे त्यांतीलच एक होय. या मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील असले, तरी त्याच्या अलंकरणहीन साध्या रचनेवरून ते यादवोत्तर काळातील असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

शंकराचे मंदिर हे सहसा नदी वा जलाशयाशेजारी बांधलेले असते. या मंदिरासमोरही मोठी बारव (पायऱ्या असलेली मोठी विहीर) आहे. दगडात बांधलेली ही बारव बरीच खोल आहे. तिचे तीन स्तर आहेत. वरच्या दोन्ही स्तरांमध्ये चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. वरच्या स्तरात नऊ, तर त्याखालील स्तरात सात पायऱ्या आहेत. वरच्या स्तरातील पायऱ्यांच्या कठड्याच्या भिंतीवर जलाशयाकडील बाजूने देवकोष्ठके कोरलेली आहेत. त्यांत विविध स्वरूपातील गणेशमूर्ती आहेत. येथून काही पावलांवर हनुमानाचे अलीकडच्या काळात बांधलेले मंदिर आहे. त्यात हनुमानाची अनघड पाषाण मूर्ती विराजमान आहे. हनुमान मंदिराच्या बाजूच्या भिंतीलगत असलेल्या ओट्यावर नंदीच्या तीन पाषाण मूर्ती विराजमान आहेत. समोरच प्राचीन महादेव मंदिर आहे.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे बांधकाम हे मोठ्या पाषाण शिळांनी केलेले आहे. मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे आणि त्यास नव्याने केलेल्या तीन पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या उजवीकडील ओट्यावर गणेशाची देवळी आहे. येथील प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. भिंतीत दोन्ही बाजूला असलेले अर्धस्तंभ व त्यांना जोडणाऱ्या कमानी अशा प्रकारचा हा सभामंडप आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या भिंतींत दगडी देवकोष्टके आहेत. त्यात गणेशाची आणि विष्णूची मूर्ती विराजमान आहेत.

मंदिरास छोटेखानी अंतराळ आहे. गर्भगृहास दगडी प्रवेशद्वार आहे. द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील पितळी आवरण असलेली मोठी शिवपिंडी आहे. येथे शिवलिंगास पंचधातूच्या नागदेवतेने वेटोळे घातले आहे. वरच्या बाजूस अभिषेकपात्र आहे. अंतराळ आणि गर्भगृहातील छत मोठ्या चौकोनी दगडी शिळांनी तयार केले आहे. गर्भगृहावर छोट्या देवळीसारखे शिखर आहे. खाली चौकोनाकार, त्यावर घुमट आणि वर कळस असे त्याचे स्वरूप आहे.

मुख्य मंदिराच्या बाजूला होमकुंड आणि त्यासमोर तुळशीवृंदावन आहे. येथे एका बाजूस गजानन महाराजांचे मंदिरही आहे. त्यात गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मूर्तीच्या बाजूस विठ्ठल-रुक्मिणीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. या मूर्ती वस्त्रालंकारांनी शृंगारलेल्या आहेत. येथेच गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांच्या तसबिरीही ठेवलेल्या आहेत. हनुमान, तसेच गजानन महाराजांच्या नावाने येथे शनिवारी व गुरूवारी प्रसाद वाटप केला जातो. महाशिवरात्र हा येथील महादेव मंदिरातील महत्त्वाचा उत्सव होय. येथे सोमवारी व खासकरून श्रावणी सोमवारी गावातील भाविकमंडळींची देवदर्शनासाठी गर्दी होते.

उपयुक्त माहिती:

  • मानोरा येथून १० किमी अंतरावर
  • वाशिम येथून ६६ किमी अंतरावर
  • मानोरा येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहारीची सुविधा आहे, निवासाची नाही
    संपर्क : शंकर पोहाणे, मो. ९६७३१२८४४०
Back To Home