शुकानंदनाथ मठ

वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली

विद्यादानाचे पवित्र कार्य करताना भेदाभेद पाहू नये, असे मानणाऱ्या अनेकांना एकेकाळी समाजाचा त्रास सहन करावा लागला. परंतु, विघ्नसंतोषी लोकांच्या त्रासाला न घाबरता आपले कार्य सुरू ठेवणारे अनेक महात्मे संतपदाला पोहोचले. त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य सुरू ठेवणारे शेकडो मठ आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शुकानंदनाथ मठ त्यातीलच एक आहे. येथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने आत्मिक समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हा मठ सुमारे दोनशेहून अधिक वर्षे प्राचीन आहे. कौंडिण्यगोत्री शुकानंदांचे वडील उमापत्यानंद हे गणेशभक्त होते. शाक्तपंथीय सिद्धपुरुष व भाळकीच्या जाधव घराण्याचे गुरु भासुरानंदांचे शिष्यत्व पत्करल्याने उमापत्यानंद शाक्तपंथाकडे वळले. त्यामुळे शुकानंद महाराज देखील शाक्तपंथाची उपासना करत. त्यांनी चंद्रपूरच्या शुकाश्रमात उपासना व तपस्या सुरू करून अध्यात्मात अधिकार प्राप्त केला. त्यामुळे चंद्रपूरचा किल्लेदार त्यांचा प्रथम शिष्य झाला. त्यानंतर ते भाळकीत परत आले व तीर्थाटनाला गेले. त्याच दरम्यान त्यांना देशकानंद नामक पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. वडिलांच्या मृत्यूपश्चात मुलाच्या शिक्षणासाठी शुकानंद नांदेड येथील सिद्धनाथपुरी मुक्कामी येऊन राहिले. येथे ते शेष घराण्याच्या पाठशाळेत संस्कृत शिकवत. याच ठिकाणी त्यांना नांदेडमध्ये राममंदिर बांधणारे कमलाकर सरदेशपांडे हे शिष्य भेटले. ते जातीभेद न पाळता ज्ञानदान करत. ही गोष्ट त्याकाळातील कर्मठ लोकांना आवडली नाही. त्यामुळे त्यांना समाजाच्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांची या त्रासातून सुटका करावी म्हणून नागोराव देशपांडे या शिष्याने त्यांना वसमतला आणले. येथे ते असना नदीच्या काठावर राहत. पुढे याच ठिकाणी सन १८२७ साली त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र देशकानंद महाराज यांनी पित्याची समाधी बांधून मठाची स्थापना केली. या मठाची देशकानंद, यज्ञेशानंद, लक्ष्मीशानंद, गगनानंद, सिद्धमहाराज, चिंतामणी महाराज अशी महंत परंपरा पुढे चालू आहे.

गावाजवळ असलेल्या या मठाला भक्कम तटबंदी आहे. तटबंदीची खालची सुमारे वीस फूट उंच भिंत कोरीव पाषाणात बांधलेली आहे, तर त्यावर सुमारे आठ फूट उंच भिंत विटांनी बांधलेली आहे. तटबंदीत दुमजली भव्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास लाकडी झडपा आहेत. तसेच आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. मठाच्या प्रशस्त प्रांगणात उजव्या बाजूला कोरीव पाषाणात बांधलेली आयताकृती बारव आहे. बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथील जलसाठा अक्षय असल्याचे सांगितले जाते. या बारवेला काशीतीर्थ म्हटले जाते. बारवेजवळ तुलसी वृंदावन आहे. मठात अनेक दुमजली इमारती आहेत.

पुढे मठाची मुख्य इमारत आहे. येथील बांधकाम विटा-चुन्याचे आहे. इमारतीसमोर लाकडी स्तंभांवर लाकडी तख्तपोशी असलेली ओसरी आहे. येथील लाकडी स्तंभ पाषाणी चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभांवर लाकडी हस्त व हस्तांवर तुळई आहेत. येथेच शुकानंद महाराजांचे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व तोरण आहे. मंदिरात मध्यभागी जमिनीवर समाधीचा चौथरा आहे. या चौथऱ्यावर चार कोनांवर स्तंभिका असलेले मखर आहे. मखरात शुकानंद महाराजांचे प्रतीक म्हणून शूक शिल्प आहे. मखराच्या शीर्षभागी स्फटिकाची शिवपिंडी आहे. समाधी चौथऱ्याच्या मागे लाकडी प्रवेशद्वार असलेल्या स्वतंत्र गर्भगृहाची रचना आहे. तेथे भिंतीलगत वज्रपीठावरील नक्षीदार लाकडी मखरात श्रीगणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात बारा रिकामी देवकोष्ठके आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक आहे, तर आमलकावर कळस आहे. मठात यज्ञेशानंद, लक्ष्मीशानंद, गगनानंद, सिद्धमहाराज इत्यादी दिवंगत महंतांच्या समाध्या आहेत. प्रत्येक समाधिस्थळी मागील भिंतीलगत वेगवेगळ्या देवींच्या मूर्ती आहेत. मठपरंपरा शाक्तपंथीय असल्याने येथील समाधिस्थळी देवींच्या मूर्ती असल्याचे सांगितले जाते.

ज्येष्ठ कृष्ण दशमी हा शुकानंद महाराजांचा पुण्यतिथी सोहळा येथील मुख्य वार्षिक उत्सव होय. यज्ञेशानंद महाराजांचा पुण्यतिथी सोहळा चैत्र कृष्ण अष्टमी ते दशमी असा तीन दिवस साजरा केला जातो. याशिवाय मठात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी मंगला देवीचा घट स्थापित करून पूजा केली जाते. सर्व उत्सवांच्या वेळी मठात अभिषेक, महापूजन, भजन, कीर्तन, जागरण, यज्ञयाग आदींचे आयोजन केले जाते. पुण्यतिथी सोहळ्यांची सांगता गावातून फिरणाऱ्या पालखी मिरवाणुकीने होते. देवीच्या पूजनाची सांगता महाप्रसादाने केली जाते. तसेच मठात वर्षभरातील इतर सण व उत्सव साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी व विशिष्ट मुहूर्ताला मठात शेकडो भाविक येतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची मठात वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • वसमत बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून वसमतसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मठापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे संपर्क :
  • संपर्क : स्वानंद चिंतामणी महाराज, मो. ९४२२८५०३१०, ९९२१६२१०४२

शुकानंदनाथ मठ

वासमत, ताल. वासमत, जिला. हिंगोली

Back To Home