अन्नपूर्णा देवी मंदिर

आरळ, ता. वसमत, जि. हिंगोली

भाविकांवर अन्नधान्य, धनसंपत्ती आणि कौटुंबिक सौख्याची कृपा करणारी अन्नपूर्णा देवी हे गौरीचेच एक रूप मानले जाते. महर्षी वेदव्यास रचित ‘मार्कंडेय पुराणा’त देवी पार्वतीला अन्नपूर्णा असे संबोधण्यात आले आहे. अन्नदा, अन्नपूर्णेश्वरी, शाकंभरी या नावांनी ओळखली जाणारी ही देवी समग्र सृष्टीचे भरणपोषण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीच्या या विविध रूपांची मंदिरे देशात सर्वत्र आहेत. त्यातीलच एक सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणजे वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णा मंदिर होय. हे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

अन्नपूर्णा देवीविषयी पौराणिक आख्यायिका अशी की एकदा भगवान शंकर आणि पार्वती यांच्यात प्रकृतीचे महत्त्व आणि पुरुषाची श्रेष्ठता यावरून वाद झाला. त्यावेळी शंकर म्हणाले की संसार हा एक भ्रम आहे; येथील सर्व काही मृगजळ आहे. एवढेच नव्हे, तर अन्न हीसुद्धा माया आहे. पार्वती ही अन्नधान्याची देवता असल्याने तिला हे ऐकून राग आला. ती म्हणाली, ‘जर मी एक भ्रम असेन, तर माझ्याशिवाय तुम्ही आणि हे विश्व कसे राहू शकते हेच मी पाहते’, असे म्हणून पार्वती अदृश्य झाली. ती गेल्याने सर्व ब्रह्मांडात हाहाकार माजला. काळ स्थिर झाला. ऋतुपरिवर्तन थांबले. धरतीवर दुष्काळ पडला. त्यावेळी भगवान शंकर आपल्या अनुयायांचे पोट भरण्यासाठी भिक्षा मागू लागले. परंतु कोणाकडेही त्यांना देण्यासाठी अन्नाचा कणही शिल्लक नव्हता.

त्यावेळी शंकरास कोणीतरी काशीतील एका स्त्रीविषयी सांगितले की ती लोकांना भोजनदान करीत आहे. ते ऐकून शंकर काशीस आले. त्यांनी पाहिले की लोकांसाठी अन्नसत्र चालवणारी ती महिला दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर साक्षात देवी पार्वती होती. सिंहासनावर बसून ती तिन्ही लोकांतील देवता आणि मानवांसाठी भोजनदान करीत होती. तेव्हापासून अन्नपूर्णा देवीला वाराणसीची नगरदेवता किंवा वाराणसीची राणी म्हटले जाते. वाराणसीमध्ये या देवीचे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात देवीकडे शंकर भिक्षा मागण्यासाठी येतात, असे मानले जाते. महाराष्ट्रात विवाहाच्या आधी वधू गौरीहर पूजन करते, तेव्हा अन्नपूर्णेची पितळी वा चांदीची मूर्ती पूजली जाते. अनेक देवघरांमध्येही नित्यनेमाने अन्नपूर्णा देवीचे पूजन केले जाते.

हिंगोलीतील वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णा देवीचे मंदिर किती प्राचीन आहे याची निश्चित माहिती नसली, तरी ते ५०० ते ६०० वर्षे जुने असावे, असा ग्रामस्थांचा कयास आहे. असे सांगितले जाते की हे प्राचीन मंदिर अनेक वर्षे दुर्लक्षित होते. या ठिकाणी मातीचे ढिगारे व अस्वच्छता होती. एकदा तीर्थाटनासाठी ओंकारनाथ महाराज आरळ येथे आले आणि ते या पडक्या मंदिरात थांबले होते. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत देऊन मंदिराची दुरुस्ती करण्यास सांगितले. दृष्टांतानुसार ओंकारनाथ महाराजांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. येथील अन्नपूर्णा देवीची पाषाण मूर्ती भंग पावलेली होती, त्यामुळे त्याऐवजी धातूची सुबक मूर्ती घडविण्यात आली. १९४७ साली या मंदिरात ओंकारनाथांच्या हस्ते अन्नपूर्णा देवीची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दररोज प्रसादाची सेवा उपलब्ध असते. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातही या मंदिराचा समावेश आहे.

आरळ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. येथील दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदीयुक्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजवीकडे व डावीकडे भाविकांच्या सोयीसाठी ओवऱ्या आहेत. मुख्य मंदिरासमोर तुळसीवृंदावन आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपाच्या दर्शनी बाजूला चार दगडी स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. हे मंदिर काहीसे उंचावर असल्याने दोन पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपात दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला नक्षीदार स्तंभशाखा, खालील बाजूला दोन कीर्तिमुखे, ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व उत्तरांगावरही गणेशमूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात चार दगडी स्तंभांमध्ये काही इंच उंच सारीपाटाची रचना केलेली आहे. या मंदिराचे पूर्ण बांधकाम हेमाडपंती शैलीतील आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वारही स्तंभशाखांनी सजलेले आहे. प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस अर्धचंद्रशिळा आणि त्याच्या बाजूला कीर्तिमुखे आहेत. गर्भगृहात संगमरवरी मखरात अन्नपूर्णा देवीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या हातांत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत. डोक्यावर चांदीचा मुकुट, भरजरी साडी आणि अलंकार परिधान केलेले देवीचे हे रूप वैशिष्ट्यपूर्ण भासते. या मूर्तीच्या पायाजवळ देवीची धातूची उत्सवमूर्ती आहे.

मंदिराच्या सभामंडपावर आडव्या रचनेचे शिखर व त्यावर लहान लहान कळस आहेत. गर्भगृहावरील मुख्य शिखरावरही अशाच आडव्या रचनेच्या शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या मंदिराच्या प्रांगणात महादेव मंदिर आहे. हे मंदिरही अन्नपूर्णा देवीच्या मंदिराप्रमाणे दगडात बांधलेले आहे. यामध्ये गर्भगृहात अखंड पाषाणातील शिवपिंडी विराजमान आहे. याशिवाय येथे ओंकारनाथ महाराज यांचे समाधी मंदिर देखील आहे. येथील गर्भगृहात एका वज्रपीठावर ओंकारनाथ महाराजांची शुभ्र संगमरवरी बैठी मूर्ती आहे.

मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे अन्नपूर्णा मातेची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण षष्ठीला येथे यात्रोत्सव असतो. ओंकारनाथ महाराजांनी हा उत्सव सुरू केला होता. यावेळी देवीची विधिवत महापूजा, पालखी सोहळा, दिवसभर भजन, कीर्तने होतात; तसेच कुस्त्यांचे सामनेही रंगतात. भाविकांकडून देवीला वर्षभर मिळालेल्या साड्या भाऊबीजेच्या दिवशी भाविक महिलांना मोफत वाटल्या जातात. भाविकांसाठी येथे विश्रामगृहे आणि भोजनाची सुविधा आहे.

उपयुक्त माहिती:

  • वसमत येथून २० किमी अंतरावर
  • हिंगोली येथून ६० किमी अंतरावर
  • वसमत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे

अन्नपूर्णा देवी मंदिर

अरल, ताल. वासमत, जिला. हिंगोली

Back To Home