चिंतामणी गणेश मंदिर

गड्डेपीर गल्ली, हिंगोली, ता. जि. हिंगोली

शैव, वैष्णव, शाक्त, दत्त व गाणपत्य हे हिंदू धर्मीयांचे प्रमुख भक्तीपंथ आहेत. गणपती पेशवाईत कोकणातून उर्वरित महाराष्ट्रात गेला, असे सांगितले जात असले तरी ते तितकेसे खरे नाही. सुमारे सातव्या ते बाराव्या शतकातील काही प्राचीन मंदिरांवर नृत्य गणेश व गणेशाची इतर रूपे आढळतात. ही शिल्पे पूजनीय देवता स्वरूपात कोरली गेली होती. तेव्हापासून आजतागायत हजारो गणेश मंदिरांची गावोगावी स्थापना होत आहे. हिंगोली शहरात असलेले हे गणेश मंदिर १९९२ साली स्थापन झाले आहे. ‘मोदकाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणेश जागृत आहे. तो नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

येथील पुजारी व विश्वस्त रमाकांत मिश्किन यांनी १९९२ साली या मंदिराची स्थापना केली. त्यांना सापडलेल्या गणेश मूर्तीची त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. सर्वप्रथम त्यांनी या गणपतीस हजार मोदकांचा नवस बोलून देवास ते मोदक अर्पण केले. ते पाहून इतर भाविकांनी नवस बोलण्यास सुरुवात केली. त्यात दिनप्रतिदिन वाढ होत गेली. आजघडीला सुमारे पस्तीस वर्षांनंतर मंदिरात दोन ते तीन लाख मोदक गणपतीस अर्पण करून भाविकांना वाटले जातात. गणपतीस मोदक अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे येथील देव ‘मोदकाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे.

गणपतीस मोदक कसे प्रिय झाले या बाबत पुराणात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार एकदा माता अनसूयेने महादेव, पार्वती व गणपती यांना भोजनास बोलावले होते. कितीही वाढले तरी गणपतीचे पोट भरत नव्हते. तेव्हा अनसूयेने गूळ-खोबरे घालून मोदक तयार केले. ते गणपतीस इतके आवडले की त्यानंतर गणपतीने दुसरे काहीही खाल्ले नाही. तेव्हापासून गणेशास मोदक प्रिय झाले.

मोदकांचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणपती मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. आपली इच्छा किंवा नवस बोलल्यानंतर मंदिरातून दिलेला मोदक डबाबंद करून वर्षभर घरातील देवघरात ठेवला जातो. दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीला या मोदकाची दुर्वा व फुले वाहून पूजा केली जाते. आपली इच्छा पूर्ण झाल्यावर हा मोदक व सोबत बोललेले नवसाचे १००८ मोदक मंदिरात नेऊन गणपतीच्या चरणी वाहिले जातात.

शहरातील दाटीवाटीच्या परिसरात हे मंदिर आहे. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. मंदिरासमोर लहानशी मोकळी जागा आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. आधुनिक स्थापत्यशैलीत सिमेंट काँक्रीट वापरून मंदिराचे बांधकाम केलेले आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंचावर आहे. या प्रवेशद्वारास चार पायऱ्या आहेत.

बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर गणपतीचे वाहन मूषक शिल्प आहे. पुढे स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. येथे मेजावर श्रीगणेशाची उत्सव मूर्ती आहे. सभामंडपात मध्यभागी अंतराळापुढे गर्भगृह आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभांवर द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात लोखंडी जाळीदार झडपा आहेत. गर्भगृहात रजतपटल आच्छादित वज्रपीठावर श्रीगणेशाची शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे.

गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर व कळस आहे. प्रदक्षिणा मार्गावर डाव्या बाजूला सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी दरवाजा आहे. मंदिराच्या बाह्यबाजूला डाव्या भिंतीला लागून छतावर जाण्यासाठी जिना आहे.

भाद्रपद मासातील दहा दिवसांचा गणेशोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. दहा दिवस गणेशाचे अभिषेक, पूजन, भजन व कीर्तन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष पूजन केले जाते. पहाटे गंगोदक व दुग्धाभिषेक करून गणेशास २१ सोवळी नेसवले जातात. गणेशाला महाभोजन व नवसाच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. त्यानंतर हे मोदक भाविकांना वाटले जातात. दर संकष्टी चतुर्थी, मंगळवार व सण, उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • हिंगोली बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून हिंगोलीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापासून काही अंतरावर ठेवून पायी यावे लागते
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२२३३३९९

चिंतामणि गणेश मंदिर

गद्देपीर गली, हिंगोली, ता. जिला। हिंगोली

Back To Home