हिंगोलीतील घोटा या गावी असलेले तुळजादेवीचे मंदिर हे तुळजापूरच्या देवीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर मराठवाडा आणि विदर्भातील जमदग्नी गोत्री देशमुखांचे कुलदैवत म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. १५० वर्षांपूर्वी देवीने एका भाविकाला दिलेल्या स्वप्नदृष्टांतानुसार एका विहिरीत ही मूर्ती सापडली होती. असे सांगितले जाते की आजही देवी दररोज त्या विहिरीवर स्नानाला जाते. सकाळच्या वेळी या विहिरीच्या पाण्यावर तेलाचे तवंग दिसतात; ते (तवंग) देवीच्या अंगावरील तेलामुळे आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की केशवराव उर्फ नानासाहेब देशमुख हे लहान असताना त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची संपत्ती हडप केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर नानासाहेब हैदराबाद येथे निजामाकडे गेले व त्यांनी निजामाच्या कानावर ही सर्व हकीगत घातली. यांची परीक्षा घेतल्यानंतर निजामाने त्यांना कडोळी व घोटा या भागाची देशमुखी दिली. ते देशमुख बनून घोटा येथे आले. ते सतत तुळजा देवीच्या भक्तीत तल्लीन असत. नवरात्रीचे नऊ दिवस ते उपवास करीत असत. त्यामुळे ते मोठ्या वाड्यात न राहता एक झोपडी बांधून राहू लागले. एके दिवशी देवीने स्वप्नदृष्टांत देऊन त्यांना जिऱ्याची पट्टी परिसरातील एका शेतातील विहिरीत आपण असल्याचे सांगितले.
स्वप्नदृष्टांताप्रमाणे नानासाहेबांनी शोध घेतला असता या विहिरीत देवीची महिषासूरमर्दिनी स्वरूपातील मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती आपल्या झोपडीत आणून ठेवली.
नानासाहेबांना या देवीसाठी मंदिर बांधायचे होते. परंतु त्यांच्याकडे द्रव्य नसल्याने ते शक्य होत नव्हते. त्या दरम्यान निजामाकडे त्यांच्या जमिनीचा खटला सुरू होता. पुढील तारखेला या खटल्याची सुनावणी झाली व त्यात नानासाहेबांच्या बाजूने निकाल लागला. या निकालामुळे नानासाहेबांची जमीन त्यांना परत मिळाली व काही रक्कमही मिळाली. या रकमेतून नानासाहेबांनी आपल्या जमिनीवर हे मंदिर बांधले. तेव्हापासून हे स्थान येथे प्रसिद्ध आहे.
घोटा (देवी) या गावात मध्यवर्ती ठिकाणी तुळजा देवीचे मंदिर आहे. उंच जगतीवरील या मंदिरासमोर असलेल्या पाच पायऱ्या चढून मुख्य प्रवेशद्वारातून मोठ्या सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभशाखांवर दीपकोष्टके आहेत. दुमजली सभामंडपात मध्यभागी अंतराळ व गर्भगृह आहे. सभामंडपात अंतराळाच्या समोरील बाजूला असलेल्या देवळीत नानासाहेब देशमुख यांची देवीकडे तोंड असलेली मूर्ती आहे.
अंतराळाच्या दर्शनी भागात चार स्तंभ तीन महिरपी कमानीकार कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. तेथून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून मूळ दगडी गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर देवीची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे, कानातील मासोळी, नाकातील नथ व मुकुट चांदीचे आहे. विविध शस्त्र धारण केलेली ही देवी विविध वस्त्रे व अलंकार लेऊन उभी आहे. या गर्भगृहाशेजारी आणखी एक गाभारा असून त्यात शिवपिंडी व विष्णूची मूर्ती आहे.
शारदीय नवरात्र उत्सव हा या मंदिरातील सर्वात मोठा आणि प्रमुख उत्सव आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज महापूजा व दुर्गासप्तशतीचे पाठ होतात. नवरात्रोत्सवात दररोज आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे (पंगत) आयोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी महाअभिषेक व पालखी मिरवणूक काढली जाते. या काळात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणातूनही येथे भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण वद्य पंचमीला देवीचा वाढदिवस साजरा केला जातो. यावेळी होणाऱ्या उत्सवासाठी व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक घोटा येथे उपस्थित असतात. दररोज सकाळी ६ व सायंकाळी सात वाजता देवीची आरती व सकाळी ६.३० व सायंकाळी ७.३० वाजता नानासाहेब देशमुख यांच्या मूर्तीची आरती केली जाते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.