देवी शर्वाणी मंदिर

अडवलपाल, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा

श्रीदेवी शर्वाणी म्हणजे दुर्गा वा उमा. शैवसंप्रदायातील एक महत्त्वाची देवता असलेली ही देवी वेताळ या दैवतासह अडवलपाल या गावामध्ये स्थित आहे. साळगाववाडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रशस्त परिसरामध्ये हे देवालय वसले आहे. सुमारे चार शतकांचा इतिहास असलेले हे मंदिर साळगावकरांप्रमाणेच अडवलपाल पंचक्रोशीतील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. शर्वाणी देवीची पांढरी शुभ्र मूर्ती, शिवस्वरुपात पूजल्या जाणाऱ्या वेताळाची कृष्ण रंगातील उंच मूर्ती आणि मंदिरात होणारा दिवजोत्सव ही या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये होत.

येथील शर्वाणी या नावाच्या देवीची मंदिरे दुर्मीळ आहेत. ‘शिवपुराणा’नुसार शर्वाणी हे देवी शिवाचे म्हणजेच उमा किंवा दुर्गेचे दुसरे नाव आहे. दहाव्या शतकात लिहिण्यात आलेल्या ‘सौरपुराणा’नुसार, शर्वाणी हे पार्वतीचे दुसरे नाव आहे. या नावाचा उगम शर्व या नावापासून झाला असल्याचे सांगण्यात येते. लकुलीश शैव तत्त्वज्ञानात शर्व हा ५० रुद्रांपैकी एक रूद्र असून त्याला विग्रहेश्वर असेही म्हटलेले आहे. गोव्यातील अनेक मंदिरांप्रमाणेच अडवलपाल येथील शर्वाणी देवीच्या मंदिराचा इतिहासही पोर्तुगीजांच्या धर्मछळाच्या (इन्क्विझिशन) इतिहासाशी निगडित आहे.

विजयनगर साम्राज्याचा दर्यासारंग थिमय्या उर्फ तिमोजा याने गोव्यातील आदिलशाही सत्ता हटवण्यासाठी पोर्तुगीजांचे साह्य घेतले. मुस्लिमांच्या धार्मिक अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या गोव्यातील काही हिंदू पुढाऱ्यांची त्याला साथ होती. पोर्तुगीजांचा हिंदुस्थानातील तत्कालिन व्हिसेरेई ऑफाँस द अल्बुकर्क याने प्रारंभी हिंदूना धार्मिक स्वातंत्र्य दिले. पण काही काळातच त्याने तिसवाडीतील सप्तकोटीश्वराचे मंदिर पाडले. पुढे १५४२मध्ये येथे सेंट फ्रान्सिस्कु द शाव्हिएर (झेव्हिएर) याचे आगमन झाले व येथील धर्मांतरास चालना मिळाली. यानंतर इ.स. १५६० साली गोवा बेटांत इन्क्विझिशन म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना झाली. सर्वांस ख्रिश्चन करून सोडावे हा त्याचा हेतू होता. १५६७ मध्ये साष्टी (सासष्टी) प्रांताचा सुभेदार दियोगु रुद्रिगिश याने त्या प्रांतातील २८० हिंदू मंदिरे, तसेच काही मशिदी पाडल्या. यामुळे तिसवाडी, बार्देश, साष्टी प्रांतातील हिंदूंमध्ये मोठी घबराट पसरली. अनेकांनी आपल्या देव-देवतांसह नजीकच्या आदिलशाही प्रदेशात स्थलांतर केले. याच काळात शर्वाणी देवी व वेताळ या देवतांचे बार्देश तालुक्यातील साळगाव येथून अडवलपाल येथे स्थलांतर झाले.
मंदिर अभ्यासक विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या ‘देवभूमी गोमंतक’ या पुस्तकातील माहितीनुसार, साळगाव येथे ग्रामसंस्था स्थापन होऊन वसाहत स्थिरस्थावर झाल्यानंतर तत्कालिन पद्धतीनुसार ग्रामदैवत म्हणून शर्वणी देवी व वेताळाची स्थापना करण्यात आली. साष्टीतील मूर्तिभंजनाचे कार्य पाहून बार्देशातील फ्रान्सिस्कन पाद्री यांनाही चेव चढला व त्यांनी बार्देशातील हिंदुंच्या सर्व देवालयांना उपद्रव देण्यास सुरूवात केली. त्या वेळी डिचोली परिसर पोर्तुगीजांच्या अंमलात नव्हता. त्यामुळे साळगावातील या देवतांचे स्थलांतर त्यांच्या कुळाव्यांनी डिचोलीच्या अडवलपाल गावात केले. देवस्थान ज्या कुटुंबांनी स्थापन केले आणि स्थापना काळापासून त्या देवस्थानचे संरक्षण, डागडुजी, दैनंदिन खर्च वगैरे सर्व जोखीम व जबाबदारी ज्या कुटुंबांनी केली त्यांस कुळावी महाजन असे म्हणतात. त्यांनी या देवतांबरोबर येथे आनुषंगिक दैवते म्हणून महादेव, रवळनाथ, सांतेरी, दामोदर, पुरमार, पुरवंश, भुलेश्वर यांचीही स्थापना केली.

साळगाववाडा या परिसराच्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच मोठ्या प्राकारात वसलेले हे मंदिर संकुल दिसते. असे सांगण्यात येते की पूर्वी या वाठारात (भागात) स्मशानभूमी होती. या वाठाराचे विधिपूर्वक शुद्धिकरण करून तेथे ही मंदिरे उभारण्यात आली. या प्राकारासही मोठे प्रवेशद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. या प्रांगणात गोलाकार चौथऱ्यावर उभे असलेले दोन सप्तस्तरीय दीपस्तंभ आहेत. समोरच देव वेताळ महारुद्राचे आणि त्या शेजारी शर्वाणी देवीचे भव्य मंदिर स्थित आहे. देवी शर्वाणीचे मंदिर गोमंतकीय स्थापत्यशैलीत उभारलेले आहे. सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीमध्ये तीन मोठ्या कमानी आहेत. त्यातील मधल्या कमानीतून आत प्रवेश होतो. या कमानींच्या वर तीन छोटेखानी मनोराकार शिखरे आहेत. त्यांतील घुमटांवर छोटे कलश आहेत. मंदिराच्या प्रशस्त व खुल्या प्रकारच्या सभामंडपास दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छत आहे. आत मध्यभागी होमकुंड आहे. मंदिराच्या अर्धमंडपास पाना-फुलांच्या नक्षीने सजवलेले कमानदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस देवकोष्ठकांमध्ये जय आणि विजय या वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. उतरांग भागाच्या वरील बाजूस गरुडविमान व त्यात विराजमान असलेल्या देवीची मूर्ती आहे. या विमानाच्या दोन्ही बाजूंस गजशिल्पे आहेत. अर्धमंडपात एका बाजूस दोन तरंगकाठ्यांची मांडणी आहे. या गुळगुळीत तरंगकाठ्यांवर विविध देवदेवतांची तसेच प्राण्यांची खास गोमंतकीय शैलीत चितारलेली चित्रे आहेत. अशी चित्रे काढलेल्या रंगीत तरंगकाठ्या हे खास गोव्यातील मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. मंदिराच्या गर्भगृहासही कमानदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. आत संगमरवरी वज्रपीठावर, नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याने मढवलेला मोठा देव्हारा आहे. त्यात मध्यभागी शर्वाणी देवीचा शुभ्र पाषाणशिळेत कोरलेला मुखवटा प्रकारची मूर्ती आहे. मूर्तीस सोनेरी डोळे लावलेले आहेत. नाकात नथ आहे. गळ्यात मंगळसूत्र व मस्तकी सोनेरी मुकूट आहे. मूर्तीलगत शुभ्र पाषाणातील शिवाची आणि देवीची छोटी मूर्ती, तसेच पितळेचा मोठा कलश आहे. गर्भगृहावर गोमंतकीय शैलीतील अष्टकोनी मनोऱ्याच्या आकारातील, वरच्या बाजूस मोठा घुमट असलेले शिखर आहे. देवी शर्वाणीच्या मंदिराच्या सभामंडपातून बाजूच्या भव्य अशा वेताळ मंदिरात जाण्यासाठी मार्गिका केलेली आहे.

येथील वेताळ मंदिराची रचनाही गोमंतकीय स्थापत्यशैलीतील व मोठा सभामंडप, दोन अर्धसभामंडप आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. येथील सभामंडप दुमजली आहे. त्यास उंच व रुंद असे कमानदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन अरुंद व छोटी प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपाच्या आत डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतींपासून काही फूट अंतर सोडून दोन्हीकडे जाडजूड गोलाकार स्तंभांच्या रांगा आहेत. यामुळे निर्माण झालेल्या चौकाच्या वरच्या भागात सज्जा आहे. चौकात मध्यभागी होमकुंड आहे. येथून पुढे दोन अर्धमंडप आहेत. भक्कम तुळया, रुंद मोठे खांब, दोन खांबाना जोडणाऱ्या कमानी हे या अर्धमंडपांचे वैशिष्ट्य होय. येथील दुसऱ्या अर्धमंडपातील तुळयांना तीन मोठ्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात चांदीच्या पत्र्याने सुशोभित केलेल्या मखरामध्ये वेताळाची उंच उभी पाषाणमूर्ती विराजमान आहे. काळ्या पाषाणातील या मूर्तीच्या एका हातात खड्ग आहे, तर दुसऱ्या हातात पात्र आहे. देवास पांढरे शुभ्र धोतर नेसवण्यात आले आहे. त्यावर मोठा कमरपट्टा आहे. गळ्यात मोठा हार आहे. याशिवाय गळ्यात कोरीव अलंकार व दंडामध्ये नागबंध आहेत. चांदीचे डोळे, मिशा, भुवया व गंध असलेल्या या मूर्तीच्या मस्तकी मोठा मुकूट आहे. ही मूर्ती एवढी उंच आहे की तिच्यावर मस्तकाभिषेक करण्यासाठी तिच्या मखराच्या बाजूने चार पायऱ्या तयार केलेल्या आहेत. असे सांगण्यात येते की वेताळाची ही मूर्ती पूर्वी चाफ्याच्या लाकडाची होती. १८६१मध्ये सध्याची मूर्ती घडवून प्रतिष्ठापित करण्यात आली.

वेताळ मंदिराच्या सभामंडपालगत रवळनाथ, सातेरी, भूतनाथ परिवार आदी अनुषंगिक दैवतांची, तसेच पाच वांगडांच्या (कुळांच्या) कुलपुरूषांची मंदिरे आहेत. यात देव पूर्वंस, देव पुरमार, देव बाळवंस, तसेच बाप ब्राह्मण आदींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे येथे ‘जागेचा मान’ म्हणून उभारण्यात आलेले महारुद्राचे मंदिरही आहे.
या देवस्थानात ‘श्री देवी शर्वाणी वेताळ महारुद्र पंचायतन संस्थान’तर्फे दैवतांची नैमित्तिक पूजाअर्चा, महानैवेद्य, त्याचप्रमाणे अन्य महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जातात. त्यातील सर्वांत प्रेक्षणीय असा उत्सव म्हणजे दिवजांची जत्रा. कार्तिक अमावस्येला येथे दिवजांची जत्रा भरते. या दिवशी सायंकाळी देवीची मोठी मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत असंख्य महिला हातात तेवते दीप घेऊन सहभागी होतात. याशिवाय येथे मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेला काला, त्याच्या दुसऱ्या दिवशी गौळणकाला, मार्गशीर्ष पौर्णिमेस देवी शर्वाणीचा पालखी उत्सव, फाल्गुन शुक्ल पंचमीस मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने तीन दिवसांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. दररोज दुपारी १.३० ते २.३० या काळात हे मंदिर दर्शनासाठी बंद असते.

उपयुक्त माहिती:

  • डिचोली येथून ९ किमी, तर पणजी येथून ३० किमी अंतरावर
  • डिचोली येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ २२१५६३७
Back To Home