म्हाळसादेवी मंदिर

मधलामाज, मांद्रे, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा

विष्णूचे मोहिनी रूप आणि खंडोबाची पत्नी असलेल्या म्हाळसा देवीचे प्रसिद्ध मंदिर पेडणे तालुक्यातील मधलामाज येथे आहे. ही देवी गोव्यासह पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर भारतातील गौड सारस्वत, कऱ्हाडे, पाध्ये, दैवज्ञ, कलावंत, भंडारी आदी अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील किनारी भागात देवीची अनेक मंदिरे आहेत. गोव्यातील मार्डोल येथे या देवीचे मूळ स्थान असल्याची मान्यता आहे. पेडणे येथील या देवीचे मंदिर हे प्राचीन व प्रसिद्ध असून येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्रीमद्‌भागवत महापुराणातील अष्टम स्कंधामधील उल्लेखानुसार, खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. या अवतारात म्हाळसाई आणि बाणाई या दोघी त्याच्या पत्नी होत्या. त्यापैकी म्हाळसाई ही त्याची पहिली पत्नी. म्हाळसाईला जोगेश्वरी आणि भैरवी या नावानेही ओळखले जाते. मोहिनी अवतार म्हणूनही म्हाळसाई प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्यावेळी दैत्यांकडून अमृत मिळविण्यासाठी विष्णूने मोहिनीचे (सुंदर स्त्री) रूप धारण करून दैत्यांना आपल्याकडे आकर्षित केले. मोहिनीच्या सौंदर्यावर भाळलेल्या दैत्यांनी आपल्याकडील अमृतकुंभ विष्णूरूपी मोहिनीकडे दिले. त्यामुळे सर्व देवांना अमृत प्राशन करता आले. मात्र त्याचवेळी मोहिनीच्या अलौकिक रूपावर देवही भाळले होते.

एके दिवशी महादेवाने विष्णूकडे मोहिनीरूप दाखवण्याचा हट्ट धरला. विष्णूने त्याला नकार दिला. मात्र काही केल्या महादेव ऐकेना. अखेर विष्णूने महादेवासाठी पुन्हा मोहिनी रूप धारण केले. मोहिनीचे ते रूप पाहून महादेव तिच्यावर मोहित झाले. त्यावेळी मोहिनीने पार्वतीच्या देहात प्रवेश केला. पार्वतीचे मोहिनीसारखे रूप पाहून महादेवाने तिला ‘म्हाळसा’ असे नाव दिले. जेव्हा महादेव मोहिनीरूपाला पाहून तिच्याकडे आकर्षित झाले, त्यावेळी मोहिनीने महादेवास आश्वासन दिले की भविष्यात जेव्हा तुम्ही मार्तंडभैरव रूपात (खंडोबा) पृथ्वीवर अवतार घ्याल, तेव्हा मी म्हाळसा रूपाने अवतार घेऊन तुमची पत्नी होईन.

महाराष्ट्रातील नेवासे बुद्रुक येथे तिमशेठ या नावाचा एक श्रीमंत लिंगायत वाणी राहत होता. त्याला मूलबाळ नव्हते. तिमशेठ महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या घरी म्हाळसाईने जन्म घ्यावा, असे महादेवाने तिला सुचवले. एके दिवशी तिमशेठ पूजाविधीत तल्लीन असताना त्याच्यासमोर देवी पार्वती प्रकट झाली. पार्वतीने तिमशेठला डोळे मिटण्यास सांगितले. त्याने डोळे मिटल्यावर पार्वतीने बाळरूप धारण केले. तिमशेठने या मुलीचे नाव ‘म्हाळसा’ असे ठेवले. ती उपवर झाल्यावर एका रात्री महादेवाने तिमशेठ यांच्या स्वप्नात येऊन म्हाळसाचा खंडोबासोबत विवाह लावण्यास सांगितले. महादेवाने सांगितल्यानुसार पौष पौर्णिमेला खंडोबा व म्हाळसाचा विवाह महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाली येथे पार पडला होता. हे सर्व विष्णूच्या ज्या मोहिनी रूपामुळे घडले ते मोहिनी रूप अनेक ठिकाणी म्हाळसा देवी म्हणून पूजले जाते. त्यातीलच देवीचे एक महत्त्वाचे व प्रसिद्ध ठिकाण पेडणे तालुक्यातील मधलामाज येथे आहे.

हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मार्डोल येथून स्थलांतरित झालेल्या भाविकांनी आपापल्या नव्या वस्तीच्या ठिकाणी देवीची पुनर्स्थापना केली. त्यापैकीच हे एक मंदिर होय. येथील मूर्ती पूर्वी वेरणे येथील मंदिरात होती. परंतु पोर्तुगीज आक्रमणात ते मंदिर उध्वस्त झाल्यावर तेथील ग्रामस्थांनी मूर्ती आपल्यासोबत मांद्रे येथे आणली व येथे मंदिर बांधले, असे सांगितले जाते.

गावापासून काही अंतरावर समुद्र किनाऱ्याजवळ निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे. प्रशस्त वाहनतळाला लागून मंदिराचे प्रांगण आहे. प्रांगणात तुलसी वृंदावन व दीपमाळ आहे. सुमारे दोन फूट उंच चौथऱ्यावर असलेल्या या नऊ थरांच्या दीपमाळेची रचना अनोखी आहे. दीपमाळेतील प्रत्येक थर समईच्या आकाराचा आहे व त्याच्या शीर्षभागी कडी व कळस आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपात समोरील बाजूला दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. मुखमंडपात डाव्या व उजव्या बाजूला देखील प्रत्येकी दोन नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. त्यात गरुड व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत.

येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी सहा नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. दोन्ही बाजुला उतार असलेल्या सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला सज्जा आहे आणि त्यावर जाण्यासाठी वक्राकार जीने आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांवर अर्धचंद्राकार तोरण आहेत. तोरणात मध्यभागी पद्मफुल व दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर म्हाळसा देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज कोरीव मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल, पाश आदी शस्त्र आहेत. देवीस चांदीचा मुखवटा व डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत मयूर तोरण व त्यात शीर्षभागी कीर्तीमुख आहे.

मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी कठडा आहे. मुखमंडपाच्या छतावर तिन्ही बाजूंनी बाशिंगे आहेत. समोरील बशिंगांत गजराज व मयूर शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. म्हाळसा देवी मंदिराच्या परीसरात जवळच गिरोबा देव व सातेरी देवी मंदिर आहे.

गुढीपाडवा हा येथील मुख्य वार्षिक जत्रा उत्सव आहे. या दिवशी देवीचा पालखी सोहळा साजरा केला जातो. परिसरातील हजारो भाविक यावेळी देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. आलेले भाविक देवीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मंदिरात शारदीय नवरात्र, श्रावण मास, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा आदी वर्षभरातील सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, नृत्य, जागरण, गोंधळ महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. येथे येणारे पर्यटकही आवर्जून देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात.

उपयुक्त माहिती:

  • पेडणे येथून १५ किमी आणि पणजी येथून ३४ किमी अंतरावर
  • पेडणे येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक सुविधा
  • संपर्क : रुपेश म्हामल, अध्यक्ष, मो. ७०३८४७२४३५
  • राजेश मांद्रेकर, उपाध्यक्ष, मो. ९९२३०२६३६४
Back To Home