कुसुमेश्वर मंदिर

देवखोल, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

प्राचीन काळापासून प्रसिद्ध बंदर व व्यापारपेठ असलेल्या श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध आहे. या भागातील ऐतिहासिक मंदिरे व मंदिरातील प्राचीन मूर्ती आजही आपले अस्तीत्व टिकवून आहेत. श्रीवर्धन जवळील हरिहरेश्वर, सोमजाई, श्रीराम, लक्ष्मीनारायण आदी मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. श्रीवर्धन शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील देवखोल गावाच्या परिसरात प्राचीन व प्रसिद्ध कुसुमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. घनदाट अरण्यात, निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराच्या आवारातील विष्णू व इतर देवतांच्या प्राचीन मूर्ती अभ्यासकांचे कुतूहल जागृत करतात. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे
हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत अख्यायिका अशी की पांडव वनवासात असताना त्यांनी आपल्या दैनंदिन पुजेसाठी या शिवपिंडीची स्थापना केली होती. काही अभ्यासकांच्या मते या मंदिराच्या परीसरात सापडलेल्या केशवस्वरूप विष्णूच्या प्राचीन मूर्ती पाहता हे मंदिर बाराव्या शतकातील अथवा शिलाहार कालीन असावे.
देवखोल गावाकडून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागत कमान आहे. दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व त्यावरील आडव्या तुळईवर बाशिंग असे कमानीचे स्वरूप आहे. तेथून एक किलोमीटर गर्द झाडीने वेढलेला रस्ता थेट मंदिराच्या प्रांगणापर्यंत येतो. मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे. मुखमंडप, मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंडपास समोरील बाजूने तीन प्रवेशद्वारे आहेत व त्यापैकी मधल्या प्रवेशद्वारासमोर मुखमंडप आहे. मुखमंडपास समोरील बाजूला दोन नक्षीदार स्तंभ आहेत. चौकोनी स्तंभपादावर उभ्या असलेल्या स्तंभांच्या खालील बाजू कुंभाकार व वर उभ्या धारेची नक्षी आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आहे व हे स्तंभ अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. मुखमंडपाच्या छताची मागील बाजू सभामंडपाच्या भिंतीवर तोललेली आहे. मुखमंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर आणि आमलकावर कळस आहे.
अर्धखुल्या स्वरूपाच्या मंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहे. या मंडपाचे बाह्यबाजूचे स्तंभ कक्षासनात आहेत. या मंडपात शाळूंकासदृश वज्रपिठावर नंदीची शुभ्र संगमरवरी मूर्तीं व त्यापुढे कासवशिल्प आहे. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आणि बाजुला स्तंभशाखा व सिंहशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. येथील मंडारकास चांद्रशिला आहे. स्तंभशाखांवर नक्षीदार कमान आहे.
या सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभावर कणी व कणीवर तुळई आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात उजवीकडे जमिनीवर एक शिवपिंडी आहे. सभामंडपाच्या पुढील बाजुला प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. हे गर्भगृह सभामंडपापेक्षा चार फूट खोल असल्याने पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व छताला जलधारा धरलेले अभिषेक पात्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराचा पहिला थर घुमटाकार आहे व त्यावर कमळफुलांची प्रतिकृती आहे. दुसऱ्या निमुळत्या थरावर उभ्या धारेची नक्षी, त्यावर आमलक व शिखर आहे.
मंदिराच्या बाजूला असलेल्या विष्णू मंदिरात श्रीविष्णू, हरिहर, गौरीहर आदी प्राचीन मूर्ती आहेत. या मंदिराबाबत असे सांगितले जाते की पूर्वी हे मंदिर उघड्या छताचे होते व फक्त पावसाळ्यात गावकरी या मंदिरावर तात्पुरते गवत पेंढ्याचे छत घालायचे. परंतु कधीकाळी गावात आलेल्या अनामिक साधूने हे मंदिर व बाहेरील मंडप नीट बांधून घेतला व परीसरात पडलेल्या सर्व प्राचीन मूर्ती आणि शिल्पे येथे एकत्रित ठेवली.
विष्णू मंदिरांच्या समोर अर्धखुल्या स्वरूपाच्या मंदिरात वज्रपिठावर सप्तऋषींच्या ध्यानस्थ मूर्ती व त्यामागे नवनाथांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या बाजूला चौथऱ्यावर अनेक प्राचीन मूर्ती व शिल्पे आहेत. त्यात गद्धेगळ व विरगळ स्वरुपाच्या शिल्पांचाही समावेश आहे. या पुढे लहान छताखाली विष्णूची सुंदर परंतू काहीशी भग्न मूर्ती आहे. देवाच्या डोक्यावर पाच फण्यांच्या नागाने छत्र धरलेले आहे. पाठशिळेवरील पानाफुलांची नक्षी सुस्थितीत आहे. प्रांगणात काही मेघडंबरी व त्यात प्राचीन मूर्ती आहेत. येथून पुढे कोरीव दगडात बांधलेली प्राचीन पुष्करणी आहे. पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रांगणातील कळस असलेल्या वर्तुळाकार छताखाली कालियामर्दन प्रसंगाची श्रीकृष्णाची अलिकडील काळातील मूर्ती आहे. मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात महाअभिषेक व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवप्रसंगी परिसरातील शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • श्रीवर्धनपासून १९ किमी अंतरावर
  • श्रीवर्धन येथून देवखोलसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home