उत्तरेश्वर महादेव मंदिर

बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका म्हणजे बार्शी. शिक्षणाचे माहेरघर मानला जाणारा हा तालुका उस्मानाबाद जिल्ह्यालगत असल्याने त्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हटले जाते. समृद्ध इतिहास लाभलेल्या या तालुक्यात बारा ज्योर्तिलिंगे असल्याने याला बार्शी हे नाव मिळाल्याचे बोलले जाते. येथे असलेले उत्तरेश्वराचे मंदिर दुर्वास ऋषींनी स्थापन केल्याची आख्यायिका आहे. शहरामधील भाविकांमध्ये या मंदिराची ओळख मोठा महादेव या नावाने आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या कुंडात १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या अस्थी रक्षेचे विसर्जन करण्यात आले होते.
बार्शी शहर हे पूर्वी बारस या नावाने ओळखले जात असे. बारस म्हणजे द्वादशी आणि त्यामुळे द्वादशी क्षेत्र म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. फार पूर्वी द्वादशी ही अंबरीष राजाची नगरी होती. हा अंबरीष राजा विष्णूभक्त होता. त्याने बारा वर्षे म्हणजे एक तप साधनद्वादशी व्रताचा संकल्प केला होता. दशमीला एकवेळेचे जेवण, एकादशीला निरंकार उपवास आणि द्वादशीला सूर्योदयाला उपवास सोडणे म्हणजे साधनद्वादशी व्रत होय. व्रत पूर्ण झाल्यावर राजाला इंद्राचे स्थान प्राप्त होणार होते. व्रत पूर्ण होण्यासाठी एक द्वादशी शिल्लक राहिली होती. ती म्हणजे वैशाख शुद्ध द्वादशी. या दिवशी अंबरीष राजाचा व्रत पूर्ण होणार होता व इंद्राचे स्थान राजाला मिळणार होते. त्यामुळे इंद्राला स्थान डळमळीत होण्याची भिती वाटली व त्याने दुर्वास ऋषींना पाचारण करून राजाचा व्रतभंग करण्यास विनविले.
इंद्राने सांगितल्यानुसार दुर्वास ऋषी अंबरीष राजाचा व्रतभंग करण्यासाठी या द्वादशी क्षेत्री आले. परंतु त्याच वेळी दुर्वास ऋषींनी काही ब्राह्मण राजवाड्यातून बाहेर पडताना पाहिले व राजाचा व्रत पूर्ण झाला, अशी त्यांची समजूत झाली. कार्य सफल झाले नाही म्हणून दुर्वास ऋषींनी क्रोधाने आपटलेल्या जटांमधून एका दैत्याचा जन्म झाला. दैत्यापासून अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू येथे प्रकट झाले व सुदर्शन चक्र सोडून त्यांनी या दैत्याचा संहार केला. त्यानंतर ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लागले. सुदर्शन चक्राला थांबण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर दुर्वासांनी मग वेगळा उपाय करण्याचे ठरवले. सुदर्शन चक्राचा मूळ स्वामी म्हणजे महादेव. विष्णूंनी केलेल्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन खुद्द महादेवांनीच सुदर्शन चक्र त्यांना प्रदान केले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने तेथे भगवान शंकराची पुजा आरंभ केली. शंकराच्या पूजेसाठी त्यांनी जी पिंडी स्थापन केली तीच उत्तरेश्वर महादेव मंदिरात असल्याची मान्यता आहे.
असे सांगितले जाते की या मंदिराच्या मुख्य द्वारापाशी असलेले कुंड दुर्वास यांच्या मागे आलेल्या सुदर्शनचक्रामुळे निर्माण झाले आहे. त्यामुळेच त्याला चक्रतीर्थही म्हटले जाते. मात्र मूळ चक्रकुंड सभामंडपाच्या फरशीवर असलेल्या कासवमुर्तीच्या बरोबर खाली आहे. दुष्काळाच्या काळात या चक्रतीर्थातील पाणी जेव्हा आटते तेव्हा त्यात सभामंडपात असलेल्या कुंडात जाण्याची वाट दिसते. १९८३ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी ती वाट दिसली होती. त्यावेळी या वाटेने जाऊन काहीजणांनी तेथील चक्रतीर्थ पाहिल्याचा दावा केला जातो.
उत्तरेश्वर महादेव मंदिरात संत नामदेव आणि त्यांचे गुरु संत विसोबा खेचर यांची प्रथम भेट झाल्याचे मानले जाते. त्यासंदर्भातील कथेनुसार, आपल्याशिवाय विठ्ठलाचा दुसरा मोठा भक्त नाही असा गर्व झाल्याने नामदेवांना विसोबा खेचर यांच्या भेटीसाठी पाठवण्यात आले होते. ते या मंदिरात आले तेव्हा शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून एक व्यक्ती झोपलेली त्यांना दिसली. त्यामुळे चिडलेल्या नामदेवांनी त्यांना पाय काढण्यास सांगितले. पण त्या व्यक्तीने नामदेवांनाच पाय उचलून जिथे पिंडी नाही तिथे ठेवण्यास सांगितले. नामदेवांनी पिंडीवरचे त्यांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही पिंडी दिसली. जिथे जिथे ते त्या व्यक्तीचे पाय नेत होते तिथे तिथे शिवपिंडी दिसत होती. यामुळे खजिल झालेल्या नामदेवांनी मग त्या व्यक्तीचे पाय धरले. त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला. तेच संत विसोबा खेचर होते. विसोबा खेचर यांची समाधीही मंदिराच्या उत्तर दिशेला आहे.
मंदिराची रचना पारंपरिक पद्धतीची आहे. मुख्य दरवाजाकडे जाताना महात्मा गांधीच्या अस्थी विसर्जन केलेले चक्रतीर्थ लागते. त्याच्यावर आता छप्पर घालण्यात आलेले आहे. या चक्रतीर्थासमोर उत्तरेश्वर मंदिर आहे. पाच पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला द्वारपालचित्रे व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती रेखाटलेली आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरुपाच्या सभामंडपाच्या सर्व बाजूला लाकडी स्तंभ आहेत व ते एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या छतावर हंड्या व झुंबरे टांगण्यासाठी कड्या आहेत. सभामंडपाला सज्जा आहे. फरशीवर कासवाची मूर्ती असून त्याच्या बरोबर खालीच मूळ चक्रतीर्थ असल्याचे सांगितले जाते. अंतराळात गर्भगृहासमोर एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, आवारभिंत, अंतराळ आणि गर्भगृहाची बांधणी दगडांत केलेली आहे. गर्भगृहात जमिनीलगत शिवपिंडी आहे. ही पिंडी दुर्वास ऋषींनी स्थापन केल्याचे मानले जाते. या पिंडीभोवती धातूच्या नागाची प्रतिमा आहे. पिंडीच्या मागे उत्सवाच्या वेळी वापरला जाणारा शिवशंकराचा पितळी मुखवटा आहे. गर्भगृहावर चार बाजुला चार लहान शिखरे व मध्यभागी मुख्य शिखर आहे. मुख्य शिखरावर असलेल्या अनेक देवकोष्टकांत देवदेवतांच्या मूर्ती आहेत.
महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी मंदिरात महादेवाचा हळदी समारंभ होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन नंतर महादेवाला सजवले जाते. त्यातून महादेवाचे चंद्रशेखर रूप प्रकट होते. यामागची कथा अशी की महादेवांची वरात जेव्हा पार्वतीमातेकडे गेली तेव्हा महादेवांचे विक्राळ रूप पाहून पार्वती काहीशी घाबरली. त्यावेळी भगवान विष्णूंनी स्वहस्ते महादेवाला नटवले. त्यावेळी त्यांचे जे रूप समोर आले त्याला चंद्रशेखर असे म्हटले जाते. श्रावणात मंदिराचे छत ठिकठिकाणी काचेची झुंबरे आणि हंड्या लटकावून सजवण्यात येते. असे सांगितले जाते की ही सारी झुंबरे आणि हंड्या बेल्जियमहून आणण्यात आल्या आहेत. श्रावणातील चारही सोमवारी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. श्रावण शुक्ल एकादशीच्या दिवशी संत विसोबा खेचर यांची पुण्यतिथी येथे साजरी करण्यात येते. श्रावण महिन्यातच तिसऱ्या सोमवारी देवाचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
वैकुठ चतुर्दशीची रात्र शैव आणि वैष्णवाच्या भक्तीमिलनाची रात्र मानली जाते. या रात्री बारा वाजता उत्तरेश्वर मंदिराकडून एक बेलाचा हार जवळच असलेल्या भगवंत मंदिरात अर्पण करण्यासाठी नेला जातो. त्याचवेळी तेथून उत्तरेश्वरासाठी तुळशीचा हार येत असतो. पुराणांतील कथेनुसार महादेवाला तुळशी वर्ज्य असते. इतर कोणत्याही दिवशी महादेवाला तुळशी वाहिली जात नाही. पण या दिवशी अपवाद करून तो तुळशीचा हार महादेवाला अर्पण केला जातो. दररोज सकाळी ७.३० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात उत्तरेश्वराचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • बार्शी बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून बार्शीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मच्छिंद्र महेश गुरव, पुजारी, मो. ९४०३१७९५९१
Back To Home