स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोटप्रमाणेच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील वैराग हेही पवित्र स्थळ मानले जाते. श्री संतनाथ महाराज हे या वैरागचे ग्रामदैवत. अध्यात्म हे भारताचे वैशिष्ट्य आहे व वैराग्याला अध्यात्मात महत्त्वाचे स्थान आहे. असे सांगितले जाते की अशा वैराग्य प्राप्त केलेल्या व्यक्ती या गावात पूर्वीपासून मोठ्या संख्येने होत्या, म्हणून या गावाला वैराग असे नाव पडले आहे. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांपैकी एक असलेल्या येथील पाच दिवशीय जत्रेची नोंद मुंबई गॅझेटियरमध्येही आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की सुमारे चारशे वर्षांपूर्वी वैरागमध्ये धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचे घोंगडे नावाचे गृहस्थ राहत होते. पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्याकडे गुराखी म्हणून एक संतू नावाचा मुलगा काम करीत असे. एकदा घोंगडे देवदर्शनासाठी काशी येथे गेले होते. तेव्हा त्यांना तिथे संतू गुराखी दिसला. संतूला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी याबद्दल संतूला विचारले व आपले खरे रूप दाखवण्याची विनंती केली. त्यानंतर संतनाथ महाराजांनी त्यांना दिव्य दर्शन देऊन आपण वैराग या गावात कायम वास्तव्य करू, असे आश्वासनही दिले. नंतरच्या काळात वैराग या गावात त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. संतनाथ महाराज हे वैरागचे ग्रामदैवत झाले. नाथपंथामध्ये संतनाथ महाराजांचे स्थान अनन्यसाधारण मानले जाते.
वैराग गावाच्या वेशीवर एका मध्यम आकाराच्या तलावाकाठी संतनाथ महाराजांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराभोवती एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासाव्यात अशा दगडी तटभिंती आहेत. जमिनीपासून सहा दगडी पायऱ्या चढून या तटभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे आहेत. या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रांगणात तटभिंतीशेजारी सुमारे ४० फूट उंचीचे दगडी भिंती असलेले दोन मनोरे आहेत. तटभिंतीच्या आतील बाजूने ओवऱ्यांची रचना आहे. मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून लांबट आकाराच्या खुल्या मंडपातून मंदिरापर्यंत येता येते.
या मंडपाचे सर्व काम लाकडी व छत पत्र्याचे आहे. या मंडपाला जोडून मंदिराचा अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपाच्या दर्शनी भागातील चार नक्षीदार स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत.
सभामंडपाच्या पुढील भागात उंचावर असलेल्या अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. अंतराळाच्या दर्शनी भागात सहा नक्षीदार खांब व त्यांना वरच्या बाजूने महिरपी कमानी आहेत. या संपूर्ण मंदिराची बांधणी ही काळ्या पाषाणाची आहे. गर्भगृहाचे लहानसे दार चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे आणि त्यावर स्तंभशाखा व नक्षीकाम आहे. गर्भगृहात वज्रपिठावर संतनाथ महाराजांची मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचा मुखवटा व त्यावर फेटा आहे. सभामंडपाच्या छतावर चार कोपऱ्यांत मेघडंबरीसारखी चार लहान शिखरे आहेत. गर्भगृहावर असलेले मुख्य शिखर हे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सजलेले आहे. या शिखरावर अनेक नक्षीदार देवकोष्टके व त्यामध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. या शिखराच्या चार स्तरांवर देवकोष्टके व पाचव्या स्तरावर घुमटाकार आमलक व कळस आहे.
संतनाथ महाराज मंदिराच्या समोरच्या बाजूला टेकनाथबाबा मंदिर आहे. मंदिरासमोरचे कुंड (तलाव) तळापर्यंत बांधलेले आहे व ते कायम पाण्याने भरलेले असते. या गावात संतनाथ महाराजांबरोबरच श्री व्यंकोबाबा, श्री दयानंदबाबा अशा आणखीही अनेक सिद्धपुरुषांनी वास्तव्य केले होते.
संतनाथ महाराज मंदिरातील मुख्य उत्सव श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला असतो. त्या आधी चार दिवस एकादशीपासून हा उत्सव सुरू होतो व पौर्णिमेपर्यंत तो चालतो. या उत्सवात संतनाथ महाराजांची पालखी छत्र-चामरे, मानकरी आणि भक्तगण यांच्या मांदियाळीसह ग्रामप्रदक्षिणा करते. पौर्णिमेच्या दिवशी लेझीम पथक आणि लवाजम्यासह ही पालखी तळ्याकाठी दहीहंडीसाठी जाते. काल्यानंतर केली जाणारी आतषबाजी आणि शोभेचे दारूकाम, कसरत हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. पूर्वी या परिसरात अनेक गोशाळा होत्या. त्यामुळे गायींच्या संरक्षणासाठी पुरेसा पाऊस पडावा, अशी प्रार्थना करण्यासाठी आषाढ महिन्यात या मंदिरात गोवर्धनविधीही पार पडतो. या उत्सवांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. दररोज सकाळी नऊ आणि रात्री आठ वाजता येथे आरती होते. सोमवार हा संतनाथांचा वार असल्याने या दिवशी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर सोमवारी आलेल्या भाविकांना येथे भोजन प्रसाद दिला जातो.