रूद्रायणी देवी मंदिर

चिंचोली रूद्रायणी, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला

देशातील आदिशक्तीची विविध परंपरागणिक ५१, ५२, ६४, १०८ अशी शक्तिपीठे असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक स्थानमाहात्म्य कथेनुसार, यातील १०८ शक्तिपिठांपैकी एक पीठ हे काटेपूर्णा अभयारण्य क्षेत्रातील रुद्र गडावर स्थित आहे. आकाराने गोल असलेल्या या गडावर आदीम काळापासून वसलेली ही देवी ‘रूद्रायणी माता’ म्हणून प्रसिद्ध आहे. अजंठा डोंगराचा अखेरच्या भागावर असलेल्या या रुद्र गडाच्या नावावरून या देवीस हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. या जागृत देवीच्या दर्शनासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे येतात.
हिंदू धर्मातील शाक्त संप्रदायामध्ये योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्राह्मणी, कौमारी, ऐंद्री, चामुंडा आणि वाराही या अष्टमातृका गणण्यात येतात. मातृकांची संख्या आठच का असते, याचे कारण ‘वराह पुराणा’त देण्यात आले आहे. ते असे की या मातृका मानवी देहातील आठ गुणावगुणांचे प्रतिनिधित्व करतात. त्यानुसार माहेश्वरी ही मातृका क्रोध या गुणाचे प्रतिनिधित्व करते. तिचे स्वरूप रौद्र असते व तिला रुद्रायणी या नावानेही ओळखले जाते. नेपाळची राजधानी काठमांडूच्या म्हैपी भागामध्ये रुद्रायणीचे भव्य मंदिर आहे. तेथे ती म्हैपी अजिमा या नावाने ओळखली जाते. याच रुद्रायणीचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्थान बार्शी टाकळीतील चिंचोली रुद्रायणीमध्ये आहे. अनेक लोकदैवतांप्रमाणेच येथेही रुद्रायणी देवी अनघड तांदळ्याच्या स्वरूपात वसलेली आहे.
पौराणिक आख्यायिकांनुसार, चौदा वर्षांच्या वनवास काळात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह येथे दोनदा आले होते. या गडाच्या पायथ्याशी ‘पद्मतलाव’ नावाचा मोठा तलाव आहे. या तलावात उमलणाऱ्या कमलपुष्पांना ‘चंद्रविकास’ असे संबोधण्यात येते. येथील कमळे रात्रीच्या उजेडातच उमलतात. पावसाळ्यात हा तलाव कमलपुष्पांनी भरलेला असतो. उन्हाळ्यात अनेकदा त्यातील पाणी आटते. या तलावातील पांढऱ्या रंगाची कमलपुष्पे अर्पण करून प्रभू रामचंद्रांनी रुद्रायणी देवीची पूजा केली होती, तसेच या तलावात त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या होत्या, असे सांगण्यात येते. हा तलाव पायाच्या तळव्याच्या आकाराचा आहे.
पातूर-महान मार्गावर पातूरपासून सुमारे ७ किमी अंतरावर शेलगाव हे गाव आहे. येथून या गडाचे दर्शन होते. येथून सुमारे ८ किमी अंतरावर चिंचोली रुद्रायणी हे गाव लागते. या गडाच्या भोवताली असलेले जंगल काटेपूर्णा अभयारण्याचा भाग आहे. गडाच्या पायथ्याशी अकोला वन विभागाने बांधलेले निसर्ग परिचय केंद्र आहे. या केंद्राजवळच ‘पद्मतलाव’ आहे. गडाच्या पायथ्यापासून ३६५ दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. हा पायरीमार्गावरचा प्रवास दमछाक करणारा असला तरी मंदिराजवळ आल्यानंतर येथील परिसर प्रसन्न करणारा आहे. मंदिराच्या प्रांगणाभोवती चारही बाजूंनी असलेल्या कठड्यांवर सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. या प्रांगणातून सूर्योदय व सूर्यास्ताचे सुंदर दर्शन घडते. प्रांगणात मंदिरासमोर छोटी दगडी दीपमाळ व रघुनाथ महाराजांचे समाधी स्थान आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी यज्ञकुंड आहे. त्यापुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर देवीची शेंदूरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. मोठ्या आकाराच्या या मूर्तीवर नक्षीदार मुकूट आहे. देवीच्या डावीकडे त्रिशूळ असून तिच्यासमोर पादुका आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर असलेल्या शिखरावर चारही बाजूंनी मंदिराच्या प्रतिकृती आहेत. शिखराच्या वर घुमटाकार आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस शेगावच्या गजानन महाराजांचे छोटे मंदिर आहे. येथे त्यांची संगमरवरी दगडात घडवलेली सुंदर मूर्ती आहे.
या मंदिरात रामनवमी, शारदीय नवरात्रोत्सवासह अनेक सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गडावर रुद्रायणी देवीचा बैलद्वारका व यात्रा महोत्सव होतो. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य उत्सव असतो. या उत्सवादरम्यान नऊही दिवस मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते. या उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. देवीच्या दर्शनासाठी येणारे शेकडो भाविक तिला साडी-चोळी, पिठा-मीठाचा जोगवा व ओटी अर्पण करतात. गडाच्या पायथ्याशी विविध वस्तू, फुले-प्रसादाची विक्री करणारी अनेक दुकाने लागतात. नऊही दिवस मंदिरात आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • बार्शी टाकळी येथून १२ किमी आणि अकोल्यापासून
  • ३० किमी अंतरावर
  • अकोला व बार्शी टाकळी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : राजेंद्र आकोत, अध्यक्ष, मो. ९७६४००९०४८
Back To Home