‘शुद्ध आचारविचार व उपासना याशिवाय सर्वांगीण विकास व परमार्थ अशक्य आहे’, असे ठाम प्रतिपादन करत हजारो लोकांना सन्मार्ग दाखवणारी दत्तसंप्रदायातील प्रमुख विभूती सद्गुरू विष्णुदास महाराज यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर तसेच महाराजांचे समाधी मंदिर तेल्हारा येथे आहे. परमार्थ व व्यवहार यांची सांगड घालणाऱ्या विष्णुदास महाराजांनी येथील दत्तवाडी संस्थानात उत्सव व उपासनेचा उपक्रम सुरू केला. ‘येथे चमत्काराला स्थान नाही, हाच खरा चमत्कार आहे’ अशी ग्वाही देणाऱ्या या दत्तवाडी संस्थानात दत्तजयंतीनिमित्त आठवडाभर भव्य यात्रा भरते.
विष्णुदास महाराजांचा जन्म १६ फेब्रुवारी १९०१ (माघ वद्य द्वादशी/त्रयोदशी, शके १८२२) रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीनजीकच्या साखळी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रेय पटवर्धन तर आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. विष्णुदास महाराजांचे मूळ नाव गुरुनाथ असे होते. दत्तसंप्रदायाला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा महामंत्र देणारे परमहंस वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचे जन्मगाव माणगाव हे आकेरी या गावाजवळच आहे. त्यामुळे टेंबे महाराजांचे पटवर्धन यांच्या घरी जाणे-येणे होते. विष्णुदास महाराजांच्या मौजीबंधनाच्या सोहळ्यासही ते उपस्थित होते. गावातील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर गुरुनाथ उपनिषदे व वेदविद्येचा अभ्यास करण्यासाठी इचलकरंजी येथे गेले. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांना ‘काव्यतीर्थ’ ही पदवी प्राप्त झाली.
हा काळ ब्रिटिश सत्तेचा होता. त्या वेळी धर्मांतरित होणाऱ्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याची चळवळ जोम धरीत होती. त्या चळवळीत ते सहभागी झाले. पुढे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या स्वांतत्र्य चळवळीतही ते सहभागी झाले. क्रांतिकारकांना सुरक्षित स्थळी पोचवण्याची जबाबदारी त्यांनी अनेकदा यशस्वीरित्या पार पाडली, असे सांगण्यात येते. या काळात वर्धा, पवनार, अमरावतीपासून लाहोरपर्यंत त्यांचा संचार असे. याच सुमारास त्यांची आचार्य विनोबा भावे तसेच बाळ कानिटकर आदींचाही सहवास लाभला. एकदा काशी येथे मुक्कामी असताना त्यांची भेट टेंबे स्वामींचे शिष्य श्रीप्रज्ञानंद सरस्वती (मोघेस्वामी) यांच्याशी झाली.
मोघेस्वामी यांनी गुरुनाथ यांना अनुग्रह दिला. मोघेस्वामी यांनी त्यांना शुभ्र वेषात, अवधूत रूपात राहून समाजात दत्तभक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा केली तसेच त्यांचे विष्णुदास असे पारमार्थिक नामकरण केले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २२ वर्षे होते. ‘निसर्गात सर्वकाही असून त्यातूनच ज्ञानप्राप्ती होईल,’ असा उपदेश मोघेस्वामी यांनी त्यांना केला. काही दिवसांनी विष्णुदास महाराजांना संन्यास घेण्याचे वेध लागले. मात्र, मोघेस्वामी यांनी त्यांना लोकांमध्ये राहून उपासना वाढवण्याची आज्ञा केली. त्यानुसार विष्णुदास महाराज भ्रमंतीला निघाले. भ्रमंतीदरम्यान त्यांनी रामेश्वरपासून हिमालयापर्यंतच्या सर्व तीर्थांचे दर्शन घेतले. त्यांनी सर्व दत्तक्षेत्रांमध्ये कठोर तप व अनुष्ठानही केले. श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सुमारे एक तप त्यांचे वास्तव्य होते.
मथुरा येथील एका धर्मशाळेत मुक्कामाला असताना एका व्यक्तीने संपत पातोडे नामक अंध गृहस्थाचे पैसे लुबाडून पळ काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पातोडे मूळचे तेल्हारा येथील खापरपेडे गावात राहणारे होते. त्यांना घरी पोचवण्याची जबाबदारी विष्णुदास महाराज यांनी घेतली व नाना कष्ट सोसून ती पार पाडली. मात्र तेल्हारा येथून माघारी परतत असताना त्यांच्या अंगात ज्वर भरला. त्यांना भांबेरी गावात मुक्काम करावा लागला. येथील हनुमान मंदिरात अनेक दिवस त्यांचे वास्तव्य होते. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व, विचारांमधील सुस्पष्टता आणि कठोर आचरण यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. विष्णुदास महाराजांचे नैमिक्तिक आचरण, भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ हे पाहून अनेक भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत. विष्णुदास महाराजांनी भांबेरी येथे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. १९५६ पर्यंत त्यांचे भांबेरीत वास्तव्य होते. त्यानंतर दोन वर्षे त्यांचे गाडेगाव येथील नारायणस्वामी मठात वास्तव्य होते. येथे त्यांनी दत्तभुयार बांधून दत्तजयंतीचा उत्सव सुरू केला.
त्यानंतर त्यांनी शेगाव-तेल्हारा मार्गावरील किसनराव वडतकर यांची जमीन विकत घेत येथेही दत्तभुयार बांधले. या भुयारात त्यांनी २ डिसेंबर १९६० रोजी दत्तजयंतीच्या दिवशी गणेश, दत्तात्रेय, सरस्वती, नृसिंहसरस्वती व गजानन महाराजांच्या मूर्तींची स्वहस्ते प्रतिष्ठापना केली. तसेच येथील आश्रमाचे ‘दत्तवाडी’ असे नामकरण केले. येथे त्यांनी सर्वोपयोगी उपासना पद्धतीचा मार्ग अनुसरून सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले.
येथे त्यांनी दत्तजयंती, नरसिंह सरस्वती जयंती, रामनवमी, गणेशोत्सव, गुरूचरित्र, गजानन विजयग्रंथ अखंड पारायण, अखंड प्रदक्षिणा कार्यक्रम, पालखी आदी उत्सव व उपासनाक्रम सुरू केले. चर्चा, भजन, कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावले. ८ जून १९९० रोजी (ज्येष्ठ वद्य प्रतिपदा) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दत्तवाडी संस्थानचा परिसर शांत व प्रसन्न आहे. रस्त्यालगत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. फरसबंदी केलेल्या या प्रांगणात मध्यभागी विष्णुदास महाराज यांचे समाधीमंदिर आहे. अर्धखुला सभामंडप व त्यापुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या समाधीमंदिराची संरचना आहे. गर्भगृहात विष्णुदास महाराज यांची समाधी व त्यापुढे वज्रपिठावर शुभ्र संगमरवरी बैठी मूर्ती आहे. मूर्ती असलेल्या वज्रपिठावर दत्तात्रय, गजानन महाराज तसेच काही देवदेवतांच्या धातूच्या मूर्ती आहेत.
समाधी मंदिराच्या उजवीकडे दत्तभुयार आहे. पक्के बांधकाम केलेल्या या भुयारातील गर्भगृहात येण्यासाठी काही पायऱ्या उतरून यावे लागते. गर्भगृहात वज्रपिठावर दत्तात्रयांची सुंदर मूर्ती आहे. वज्रपिठाच्या खालील बाजूस गजानन महाराज व नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती आहेत. येथे विठ्ठल-रखुमाई तसेच श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. त्याखालील चौथऱ्यावर गणेश व सरस्वतीदेवीच्या मूर्ती आहेत. येथील देवपाटामध्ये विष्णुदास महाराजांच्या नित्यपूजेतील देव आहेत. नृसिंह सरस्वतींच्या मूर्तीच्या बाजूला विष्णुदास महाराजांना गाणगापूर येथे प्रसादरूपाने मिळालेल्या निर्गुण पादुकांची गादी आहे.
दत्तभुयाराच्या डावीकडे असलेल्या औदुंबर वृक्षाच्या खालील भागात महादेव व हनुमान यांची छोटी देवळीवजा मंदिरे आहेत. येथे दत्तपादुकाही आहेत. या परिसरात असलेल्या विष्णुदास महाराजांच्या कुटीमध्ये त्यांची प्रतिमा व पादुका आहे. नजीकच पारायण कक्ष आहे.
दत्तजयंती हा संस्थानातील सर्वात मोठा उत्सव असतो. सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान परिसरात मोठी यात्रा भरते. या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनी परिसर फुलून जातो. या उत्सवादरम्यान येथे भजन-कीर्तन, गुरुचरित्र पारायण, सुंदरकांड पठण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच प्रमाणे दरवर्षी रामनवमी, तसेच विष्णुदास महाराज पुण्यतिथीनिमित्त मंदिरात अनेक उपक्रम राबवले जातात.