‘संतनगरी’ असा लौकिक असलेल्या पातूर या ऐतिहासिक शहरातील सिदाजी महाराज संस्थान प्रसिद्ध आहे. शहराच्या ग्रामदैवताचा मान असलेले सिदाजी महाराज हे एक अलौकिक संत होते. त्यांच्या चमत्कारांच्या अनेक कथा आज भाविक मोठ्या भक्तीभावाने सांगतात. पंचक्रोशीतील हजारो भाविकांची महाराजांवर श्रद्धा आहे. येथे दरवर्षी गुढीपाडव्यापासून दहा दिवस मोठा यात्रोत्सव असतो. सुमारे दोन शतकांपासूनची परंपरा असलेल्या या यात्रेतील दहिहंडी सोहळा पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे. या यात्रेस तालुक्यातील विविध भागांतील भाविक आवर्जून हजेरी लावतात.
पातूर या शहराचा इतिहास इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून सुरू होतो. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व २३२च्या सुमारास सातवाहनांची सत्ता स्थापन झाली. याच काळात महाराष्ट्रातील बरीचशी बौद्ध लेणी आकारास आली. पुरातत्त्वीय संशोधनानुसार, पातूरमधील प्रसिद्ध लेण्यांच्या खोदकामासही याच काळात सुरूवात झाली आणि ते काम इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत सुरू होते. अमरावती, वर्धा, नागपूर, चांदा आदी जिल्ह्यांमध्ये वाकाटकांचे काही ताम्रपट सापडले आहेत. यावरून या भागामध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून वाकाटकांची सत्ता होती. राष्ट्रकूट, यादव, मुघल, निजाम अशा विविध सत्ता पाहिलेले हे शहर एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आले. १८०३ ते १८०५ या काळात झालेल्या दुसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात लॉर्ड वेलस्ली याने नागपूरकर भोसल्यांचा पराभव केला.
यानंतरच्या काळात पेंढाऱ्यांचे हल्ले आणि प्रशासनाची मनमानी यामुळे अकोला जिल्ह्यातील जनतेस ‘त्राही माम्’ असे झाले होते. सावकारांच्या पिळवणुकीने जनता त्रस्त झाली होती. याच काळात पातूर येथे सिदाजी महाराज यांचा अवतार झाला. येथील माहोकार कुळात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव राघोजी पाटील, तर आईचे नाव अलोकाबाई असे होते. असे सांगण्यात येते की सिदोजी महाराजांच्या अंगात लहानपणापासूनच अवलियाची लक्षणे होती. पुढे पंचक्रोशीत त्यांनी अनेक अलौकिक चमत्कार केल्याच्या कहाण्या सांगण्यात येतात. ते सदैव ‘हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ शिव लिंगा’ असा जप करत असत.
त्यांचा भक्तसंप्रदाय खूप मोठा होता. इ.स. १८१० मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी सध्याच्या मंदिराच्या परिसरात धर्मध्वजाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर दोन वर्षांनी, १८१२ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी येथे समाधी घेतली.
सिदाजी महाराजांनी समाधी घेतलेल्या ठिकाणी भाविकांनी प्रथम छोटेखानी मंदिर उभारले. १९५७ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पातूरमधील प्रसिद्ध शिल्पकार वामनराव वडतकार यांनी तीन वर्षे अथक परिश्रम करून घडवलेल्या सिदाजी महाराजांच्या कृष्णवर्णी मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. रस्त्यालगत असलेल्या मंदिराच्या प्रवेशकमानीतून मंदिराच्या प्रांगणात जाण्यासाठी मार्ग आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात मध्यभागी मंदिर आहे. या मंदिराच्या सभामंडपात डावीकडे कक्षासनांची रचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर गर्भगृहाची रचना आहे. या गर्भगृहातील चार स्तंभांच्या मध्यभागी सिदाजी महाराजांची कृष्णवर्णी मूर्ती आहे. या चार स्तंभांभोवती छतापर्यंत काचा लावलेल्या आहेत. साधी रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर व त्यावर द्विस्तरीय आमलक आणि कळस आहे. शिखरावरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या तसेच संतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या डावीकडे धान्य भांडार तसेच संस्थानाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यालय आहे. या मंदिराच्या परिसरात विश्वस्त मंडळाने अलिकडेच उभारलेल्या सभागृहात माफक शुल्क आकारून विवाह, बारसे आदी कार्ये होतात.
या मंदिरात नित्यनेमाने पूजा अर्चा करण्यात येते. श्री सिदाजी महाराज संस्थानातर्फे येथे हरिकीर्तन, भजन, भागवत कथा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराजांची पालखी गावातून फिरते. श्रावण महिन्यातही येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुढीपाडव्यापासून दहा दिवस भरणारी यात्रा येथील प्रमुख उत्सव असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात पूजा झाल्यावर आवारात गुढी उभारण्यात येते. त्यानंतर दहा दिवस येथे अखंड हरिनाम, श्रीमद् भागवत सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यात्रेच्या अखेरच्या दिवशी होणारा दहिहंडी उत्सव हे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
या दिवशी ग्रामस्थ मातीच्या मडक्यांत दही, भिजवलेले हरबरे, पोहे व लोणच्याचे मिश्रण भरतात. त्यानंतर ही मडकी वाजतगाजत मंदिरात आणतात. त्यानंतर काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी उत्सवाला सुरूवात होते. मडक्यांमधून आणलेल्या पदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. सायंकाळी या हंडींचे विसर्जन करण्यात येते. त्यानंतर मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात होते. ही पालखी उचलण्याचा मान गावातील भोई समाजाला देण्यात आलेला आहे. गावातील भोई समाजाचे जानकीराम इंगळे यांनी १९७२ मध्ये संस्थानाला भेट दिलेल्या पालखीत सिदाजी महाराजांची प्रतिमा ठेवली जाते. नगरप्रदक्षिणा घातल्यानंतर ही पालखी रात्री पुन्हा मंदिरात आणण्यात येते. या पालखी सोहळ्यात परिसरातील विविध भजन मंडळे सहभागी होतात. या उत्सवानिमित्त गव्हाच्या पोळ्या व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद बनवण्यात येतो. या महाप्रसादास भाविकांची मोठी गर्दी असते. सुमारे ५० क्विंटल गव्हाचा वापर करून या पोळ्या बनवण्यात येतात. या पोळ्या तसेच भाजी ठेवण्यासाठी मोठमोठ्या टाक्यांची व्यवस्था करावी लागते.