संत एकनाथांनी ‘रामवरदायिनी’ अशा शब्दांत जिचे माहात्म्य वर्णन केले आहे, महाराष्ट्रात एतद्देशियांचे राज्य स्थापन करण्याच्या हेतूने प्रत्येक कार्यारंभी छत्रपती शिवाजी महाराज ज्या देवीचा कौल घेत असत, ती देवी म्हणजे भवानी माता. शिवरायांप्रमाणेच समर्थ रामदास स्वामींचीही कुलस्वामिनी असलेली ही देवी महाराष्ट्र भूमीची आराध्यदेवता आहे. तुळजापूर येथील शक्तिपिठाबरोबरच या देवीची मंदिरे राज्यात अनेक ठिकाणी वसलेली आहेत. त्यातीलच एक प्राचीन मंदिर आगर येथे स्थित आहे. ही देवी अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. त्यामुळे देवीदर्शनासाठी येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख ५१ शक्तिपिठांतही केलेला आहे. विविध ग्रंथांत त्वरजा, तुरजा, त्वरिता, तुळजा, अंबा या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या देवीची पौराणिक आख्यायिका ‘तुळजा माहात्म्या’त वर्णन केली आहे. ती अशी की कृतयुगात या भागात कर्दम नामक एक विप्र राहात असत. त्यांच्या मृत्यूच्या समयी त्यांची अनुभूती नामक पत्नी गरोदर होती.
त्यामुळे ती पतीसमवेत सहगमन करू शकली नाही. काही दिवसांनी प्रसूत झाल्यानंतर तिने मंदाकिनी नदीतीरावर तपश्चर्या सुरू केली. एकदा तेथे शिकारीच्या निमित्ताने आलेल्या कुक्कुट नामक दैत्याने तिला पाहिले. तिचे तेजस्वी रूप पाहून तो तिच्यावर मोहीत झाला.
या दैत्याने अनुभूतीच्या देहाला स्पर्श केला. तेव्हा त्या साध्वीने मनोमन पार्वती मातेचा धावा केला. तिची हाक ऐकून साक्षात् पार्वती तेथे भवानी स्वरूपात प्रकट झाली व तिने कुक्कुट दैत्याचा वध केला. भक्ताच्या हाकेस त्वरित धावून आली म्हणून या देवीस तुरजा वा त्वरिता असे संबोधले जाऊ लागले. या आख्यायिकेस जोडून अशी कथा आहे की कुक्कुट दैत्याने मरता मरता महिषासुराचे रूप घेतले होते. देवीने त्याचा वध केला. त्यामुळे महिषासुरमर्दिनी स्वरूपातही तिला पूजले जाते. ‘भावार्थ रामायणा’तील कथेनुसार, सीताहरणानंतर श्रीराम हे सीतेचा शोध घेत दक्षिणेकडे जात असता, एके ठिकाणी प्रत्यक्ष भवानी मातेने त्यांना दर्शन दिले. त्यावेळी देवीने श्रीरामांना रावणवध करण्यासाठी वरदान दिले होते. त्यामुळे संत एकनाथांनी देवीस रामवरदायिनी असे म्हटले आहे. या देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भवानी तलवार’ दिल्याची आख्यायिका महाराष्ट्रात सुपरिचित आहे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या अनुमतीने कृष्णाजी अनंत सभासद याने इ.स. १६९७ च्या सुमारास, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर सुमारे १७ वर्षांनी रचलेल्या बखरीत असा उल्लेख आहे की जेव्हा अफझलखान चालून आला तेव्हा महाराज प्रतापगडावर गेले. तेथे त्यांनी ‘मारितां मारितां जें होईल तें करूं. सला करणें नाहीं’ असा विचार केला. महाराजांना त्याच रात्री ‘श्रीभवानी तुळजापूरची इणें मूर्तिमंत दर्शन दिलें आणि बोलिली कीं आपण प्रसन्न जाहालों. सर्वस्वें साह्य तुला आहे. तुझे हातें अफजलखान मारवितों.’ या बखरीत भवानी तलवारीचा उल्लेख नाही. मात्र भवानीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर महाराजांनी स्वपराक्रमाने अफझलखानाचा वध केला.
महाराष्ट्राच्या या कुलदेवतेचे आगर येथील मंदिर नेमके केव्हा बांधण्यात आले, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र, तेराव्या शतकात यादव काळात हे मंदिर उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराचे जुने दगडी स्वरूप कायम ठेवून हा जीर्णोद्धार करण्यात आला.
आगर या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी तलावाशेजारी असणाऱ्या एका उंचवट्यावर भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. सुमारे दहा पायऱ्या चढून मंदिरासमोर असणाऱ्या मंडपात प्रवेश होतो. भाविकांच्या सुविधेसाठी या मंडपात बसण्यासाठी बाके व वर पत्र्याची शेड टाकलेली आहे. मुखंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी असणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करता येतो. हा मुखमंडप मूळ मंदिरासमोर नंतरच्या कालावधीत बांधलेला आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्हीकडे स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती व खालील बाजूस किर्तीमुख आहे. हेमाडपंती शैलीच्या या मंदिराच्या सभामंडपात चार दगडी स्तंभ आहेत. स्तंभपादावर उभे असणारे हे स्तंभ खालून वरपर्यंत विविध आकारांत आहेत. सभांडपातील भिंतींमध्ये अनेक देवकोष्टके व गवाक्ष आहेत.
सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांत उजवीकडे गणेशाची प्राचीन मूर्ती व शिवपिंडी आहे तर डावीकडे गजानन महाराजांची प्रतिमा आहे. या अंतराळातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहातील वज्रपिठावर भवानी देवीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या देवीच्या डोक्यावर मुकूट, कपाळावर मळवट व नाकात नथ आहे. या मंदिराच्या मुखमंडपाला लहानसे शिखर आहे. मात्र सभामंडप व गर्भगृहावर शिखर नाही. मंदिर परिसरात जुन्या मंदिराचे काही अवशेष पाहावयास मिळतात. त्यामध्ये जुन्या मंदिराच्या द्वारशिल्पाचेही अवशेष आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम आहे.
या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. भाविकांच्या हाकेला धावून जाणारी देवी, असा या देवीचा लौकिक आहे. त्यामुळे अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक देवीसमोर नवस करतात. नवस पूर्ण झाल्यावर भाविक गर्भगृहाबाहेर नारळाचे तोरण बांधतात. परिसरातील नवदाम्पत्ये या देवीचे आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला सुरूवात करतात. या मंदिरात गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत देवीचे नामस्मरण केले जाते. चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव येथे उत्साहात साजरे केले जातात.