आसरा माता मंदिर

दोनद (खुर्द), ता. बार्शी टाकळी, जि. अकोला

पंचतत्त्वांपैकी जलतत्त्वाचे प्रतीक असलेल्या साती आसरा मातेचे प्रसिद्ध मंदिर दोनद खुर्द येथे आहे. काटेपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराच्या संकुलात या देवींची दोन देवालये आहेत. येथे त्यांचा भाऊ असलेल्या गवळीदेवाचेही स्थान आहे. लहान मुलांवरील संकटे दूर करण्यासाठी येथील नदीपात्रात त्यांना स्नान घालण्याची तसेच लहान मुलांचा पाळणा नदी पात्रात सोडण्याची प्रथा आहे. या नदीपात्रात स्नान केल्याने आजारी व्यक्ती बऱ्या होतात, असेही सांगण्यात येते. चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान येथे मोठी यात्रा भरते.
‘भारतीय संस्कृती कोशा’नुसार आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. अप्सरा या गंधर्व वर्गातील स्त्रिया असतात व त्यांना गांधर्वी असेही म्हणतात. सायणाचार्यांनी या शब्दाची व्युत्पत्ती ‘अप्‌ + सरस्’ म्हणजे ‘जलात क्रीडा करणाऱ्या त्या अप्सरा’ अशी दिलेली आहे. यामुळे यांना जलदेवता मानण्यात आलेले आहे. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात वा साती आसरा असे म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा व मकरी अशी त्यांची नावे होत. ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ आर. ई. एन्थोव्हेन यांच्या १९२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनपर ग्रंथातील माहितीनुसार या आसरांना काही भागात मावलाया असेही म्हणतात. या आसरा मुले आणि तरूणींना त्रास देतात, असा समज आहे.
विख्यात विदुषी दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ‘धर्म आणि लोकसाहित्य – अभिचार किंवा जादुटोणा’ या लेखामध्ये (नवभारत, नोव्हें. १९५९) असे प्रतिपादन केले आहे की भारतीय लोकपरंपरेमध्ये दोन प्रकारच्या रोगदेवता मानण्यात आलेल्या आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे भूदेवता व दुसरा जलदेवता. नदी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या ठिकाणी या जलदेवतांचे स्थान असते. वऱ्हाडात सात आसरा या फार तामसी असतात व त्या पाण्याशी संबंध असणारे रोग उत्पन्न करतात, असा समज असल्याची नोंदही दुर्गा भागवत यांनी केलेली आहे. लोकसमजुतीनुसार सर्व जलसाठ्यांनजीक सात आसरांचे वास्तव्य असते. काहींच्या मते, ज्या तलावात कमळे असतात तेथेच त्या राहतात. सात आसरांच्या रोगकारक तामसी शक्तीमुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी त्यांना पूजले जाते. लोकपरंपरेनुसार गवळीदेव हा त्यांचा भाऊ आहे. सात आसरांबरोबरच त्याचीही पूजा केली जाते. दोनद येथील मंदिरात या सात आसरांना जगतजननी आसरा, आसरा सरस्वती, आसरा अन्नपूर्णा, आसरा जगदंबा, महालक्ष्मी आसरा, महाकाली आसरा आणि दुर्गा आसरा या नावांनी पूजले जाते.
अकोला वाशीम मार्गालगत दोनद खुर्द या गावात आसरा माता मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला असलेल्या मेघडंबरीसदृश्य देवळींत गाय वासराचे शिल्प व गजानन महाराजांची मूर्ती आहे. प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी व अनेक वृक्ष असल्यामुळे हा परिसर स्वच्छ व सुंदर भासतो. प्रांगणातील एका मोठ्या चौथऱ्यावर त्रिशूळ आहे. या मंदिराच्या संकुलात देवींची दोन मंदिरे आहेत. जुने मंदिर नदीपात्राजवळच आहे. प्रांगणात मध्यभागी असलेल्या नव्या मंदिरासमोर गाडगेबाबांचे सुंदर शिल्प आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे.
सभामंडपाहून काहीसे उंचावर असलेल्या या गर्भगृहातील वज्रपिठावर साती आसरांच्या मूर्ती आहेत. या शेंदूरचर्चित देवींच्या माना काहीशा झुकलेल्या आहेत. या मूर्तींवर मुकुट व गळ्यात माळा आहेत. येथील भक्तांच्या श्रद्धेनुसार यापैकी मध्यभागी असणारी देवी ही आसरा जगदंबा आहे. ही प्रमुख देवी येथील सर्व देवींची मोठी बहिण समजली जाते. तिच्या डावीकडे जगतजननी आसरा, सरस्वती आसरा व अन्नपूर्ण आसरा आणि उजवीकडे दुर्गा आसरा, महाकाली आसरा व महालक्ष्मी आसरा या सहा बहिणी आहेत. या परिसरात गवळीदेवाचेही स्थान आहे.
विदर्भातील असंख्य भाविकांची येथील देवींवर श्रद्धा आहे. चैत्र शुद्ध एकादशी ते चतुर्दशीपर्यंत येथे यात्रा असते. असे सांगितले जाते की या यात्राकालावधीत महाराष्ट्रासह, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व आंध्रप्रदेशातून सुमारे चार ते पाच लाख भाविक देवींच्या दर्शनासाठी येतात. यावेळी देवीला साडी, खण, ओटी अर्पण करतात व रोडगे आणि दही-लोण्याचा नेवैद्य दाखवितात. नवरात्रोत्सवाच्या वेळी दहा दिवस येथे देवी भागवत, भजन, किर्तन, प्रवचन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम सुरू असतात. येथे लहान मुलांचे जावळही केले जाते. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार महाराष्ट्र सरकारने या मंदिराचा ‘क’ दर्जा देऊन गौरव केलेला आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात येऊन देवींचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • बार्शी टाकळी येथून १४ किमी अंतरावर
  • बार्शी टाकळी व अकोला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home