अंजनी मातेसह वसलेल्या हनुमानाचे प्राचीन मंदिर अकोल्यातील मोहता मिल चाळ परिसरात आहे. मातेसह हनुमान विराजमान असलेले विदर्भातील हे एकमेव मंदिर आहे. पावणेपाचशे वर्षांहूनही प्राचीन असलेल्या या मंदिरातील अंजनी माता व हनुमान यांच्या मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. येथे तपस्वी हनुमान मातेसह असल्याने या मंदिरास मातृभक्त तपे हनुमान मंदिर म्हणून संबोधले जाते. या पुरातन देवालयात अंजनीमाताही असल्याने महिला भाविकांना येथे ओटी भरता येते.
पौराणिक आख्यायिकेनुसार, अकोलसिंह नावाच्या राजपूत सरदाराने या गावाची स्थापना केली. तो पूर्वीच्या काळी अकोल्यापासून सहा मैल अंतरावर असलेल्या काथेरी येथे राहात असे. सध्या अकोला जेथे वसलेले आहे, त्या भागात घनदाट जंगल होते. या जंगलात एक महादेवाचे मंदिर होते. अकोलसिंगची पत्नी या मंदिरात महादेवाची पूजा करण्यासाठी नेहमी येत असे. ती येथे एकटी येत असल्याचे पाहून अकोलसिंहला तिचा संशय आला. त्याने एकदा हाती तलवार घेऊन तिचा पाठलाग केला. त्याला मंदिराच्या दारात पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीला त्याच्या मनात काय चालले आहे ते समजले.
तेव्हा तिने महादेवाला प्रार्थना केली, की ‘मला आता तुझ्याजवळच कायमचा आसरा दे.’ त्याबरोबर शिवलिंग दुभंगले गेले व त्यात ती गडप झाली.
यानंतर दुःखाने वेडापिसा झालेल्या अकोलसिंह याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ येथे वस्ती वसवली. त्याने येथे त्याची गढीही बांधली. १८व्या शतकात या गावाला महत्त्व प्राप्त झाले. हे ऐतिहासिक शहर आज जुने आणि नवे अशा दोन भागांमध्ये विभागले आहे. मोर्णा नदीच्या एका बाजूला जुने शहर व दुसऱ्या भागात नवे शहर आहे. अकोला शहरात या नगरीचे ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर, सालासर बालाजी मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, तुळजा भवानी मंदिर, बिर्ला राम मंदिर आदी प्रसिद्ध मंदिरे आहेत. या मंदिरांपैकीच एक म्हणजे मातृभक्त तपे हनुमान मंदिर होय. असे सांगण्यात येते की साधारणतः सोळाव्या शतकाच्या मध्यावर या परिसरात हनुमान व अंजनीमातेच्या स्वयंभू मूर्ती आढळल्या. त्यानंतर येथे मंदिर उभारण्यात आले. सुरुवातीला या मंदिराचे स्वरूप छोटेखानी होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
अकोला जंक्शन रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराभोवती असलेल्या तटभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गोलाकार आकारात मोठी सूर्याची प्रतिमा व त्यामध्ये ओम हे मंगलचिन्ह कोरलेले आहे. त्यावरील भागात तीन कळस आहेत. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत पेव्हरब्लॉकची फरसबंदी असणारा रस्ता आहे. येथे आणखी एक तटबंदी आहे. त्या तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिरासमोरील मंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गदा रंगविलेल्या आहेत व ललाटबिंबस्थान गणपतीची मूर्ती आहे. प्रांगणातील भिंतींवर सीता-हनुमान भेट, रामसेतू उभारणी आदी रामायणातील विविध प्रसंग चित्रित केलेले आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भागात चार स्तंभांमध्ये तीन दरवाजे आहेत. यापैकी एक मुख्य व दोन उपद्वारे आहेत. मुख्यद्वाराच्या ललाटबिंबस्थानी नागाची प्रतिकृती आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून सभागृह आहे.
या गर्भगृहातील वज्रपिठावर हनुमान व अंजनीमातेच्या शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती विराजमान आहेत. दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुकुट आहेत. हनुमान मूर्तीच्या डावीक़डे शेंदूरचर्चित चांदीची गदा आहे. या मूर्तीच्या उजवीकडे अखंड ज्योत तेवत असते. असे सांगितले जाते की मंदिराच्या उभारणीपासून येथे ही ज्योत तेवत आहे. हनुमान मूर्तीच्या वरील भागात सूर्यप्रतिमा आहे. मंदिराच्या छतावर कठडा, गर्भगृहावर घुमटाकार शिखर आणि त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. मंदिराशेजारी कालभैरव व आसरा मातेचे स्थान आहे. प्रांगणातील एका झाडाजवळ हनुमानाची छोटी मूर्ती आहे.
पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात अखंड हनुमान चालिसा पाठ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. हनुमान जयंती हा येथील मुख्य उत्सव असतो. या दिवशी सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. दुपारी १२ वाजता महाआरती होते. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. भाविकांना या वेळी सुक्या मेव्यापासून बनवलेल्या लाडूचा प्रसादही देण्यात येतो. या मंदिरात पाच मंगळवार व पाच शनिवारचे व्रत केल्यास सर्व व्याधींतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात सकाळी ६ वाजल्यापासून भाविकांना देवदर्शन घेता येते. दुपारी १.३० ते ४.३० या वेळेत मंदिर बंद असते. मंगळवारी, शनिवारी तसेच पौर्णिमेच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या तिन्ही दिवशी मंदिर दुपारीही खुले असते.