बालादेवी मंदिर

बालापूर, ता. बालापूर, जि. अकोला

श्रीलक्ष्मीचे प्रतीक आणि श्रीयंत्राची देवता असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीचे पीठ बालापूर तालुक्यात आहे. दशमहाविद्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेली भगवती षोडशी येथे बालात्रिपुरसुंदरीच्या रूपात विराजमान आहे. बालादेवी म्हणून प्रसिद्ध असलेली ही स्वयंभू देवी विदर्भातील ‘मनकर्णिका’ (मन) आणि ‘महेशा’ (म्हस) या दोन उत्तरवाहिनी नद्यांच्या संगमानजीकच्या उंच टेकडीवर वसली आहे. २१ मार्च व २१ सप्टेंबर या दोन दिवशी उगवत्या सूर्याची किरणे थेट या स्वयंभू मूर्तीवर पडतात. ही जागृत देवी सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हिंदू पुराणांनुसार काली, तारा, त्रिपुरसुंदरी (षोडशी), भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या मानल्या जातात. भगवती षोडशीची श्री बाला त्रिपुरसुंदरी (बाला त्रिपुरा), महात्रिपुर सुंदरी व श्री ललिता त्रिपुरसुंदरी’ (श्रीविद्या) ही तीन रूपे आहेत. श्री बाला त्रिपुरसुंदरी ही श्री यंत्राची देवता समजली जाते. या यंत्राची उपासना करणे हे देवीची पूजा करण्यासारखे आहे. येथील देवीचे मूळ नाव बालादेवी आहे. ‘ब्रह्मांड पुराणा’तील ‘ललिता पाठ्यायना’च्या २२व्या अध्यायात बालादेवीने भंडासूर दैत्य तसेच त्याच्या ३० पुत्रांचा संहार केल्याची कहाणी नमूद आहे. ‘आगम ग्रंथां’तही ‘बालासहस्त्रनाम’, ‘श्री बाला अष्टोत्तरशतनाम’, ‘श्री बालाकवच’, ‘श्री बाला मकरंदस्तवन’ आदी स्तोत्रांचा उल्लेख आहे.
मन आणि म्हस नद्यांच्या संगमावर वसलेलेल्या बालापूरला मोठा इतिहास आहे. बहमनी काळात बालापूरला स्थानिक अंमलदारांचे ठाणे होते. मोगल काळात दक्षिणेतून उत्तरेकडे जाण्याच्या मार्गावरील मोक्याचे ठिकाण म्हणून यास महत्त्व होते. अकबराने इ.स. १५९४ मध्ये बालापूर जिंकून घेतले. सोळाव्या शतकातील ‘आईन-ए-अकबरी’ म्हणजे ‘अकबराचे प्रशासन’ या अबुल फझ्ल यांच्या ग्रंथात बालापूर हा एक श्रीमंत प्रांत असल्याचा उल्लेख आहे. दिल्लीच्या गादीवर बसण्यापूर्वी जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब हे दक्षिणेचे सुभेदार म्हणून येथे राहिले होते. येथील भव्य किल्ला विटांनी बांधलेला आहे व तो विदर्भातील सर्वांत मजबूत किल्ला मानला जातो. औरंगजेबाचा पुत्र आझमशाह याने १७२१ मध्ये या किल्ल्याच्या उभारणीस सुरुवात केली. त्याचे काम तत्कालीन एलिचपूरचा (सध्याचे अमरावतीतील अचलपूर) नवाब इस्माईल खान याने १७५७ मध्ये पूर्ण केल्याची नोंद आहे. मुघल व निजामाचा इतिहास पाहिलेल्या या किल्ल्यालगत दक्षिण दिशेस बालादेवीचे प्राचीन मंदिर आहे. या देवीवरूनच या शहरास बालापूर असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी विदर्भातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून बालापूरचे नाव होते.
बालापूरची ग्रामदेवता असलेल्या बालादेवीचे मंदिर एका मध्यम उंचीच्या टेकडीवर स्थित आहे. अकराव्या शतकापूर्वीपासून देवीचे या टेकडीवर वास्तव्य असल्याचे दाखले उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. समर्थ रामदास स्वामी या टेकडीवर तीन दिवस निवास करून पुढे ओरगावला गेले. ओरगावला जाण्यापूर्वी त्यांनी येथे ‘वारी हनुमाना’ची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. टेकडीच्या पूर्वेस, मंदिरासमोरून मनकर्णिका (मन), तर टेकडीच्या पश्चिमेला (मंदिराच्या मागील बाजूला) म्हस नदी आहे. येथून पाऊण कि.मी. अंतरावर या उत्तरवाहिनी नद्यांचा संगम होतो. टेकडीवर वट, औदुंबर, अशोक आदी अनेक प्राचीन वृक्ष आहेत.
निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या प्रवेशद्वारापासून ५५ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दगडी दीपस्तंभ आहे. पूर्वी लाकडी खांबावर उभ्या असलेल्या या मंदिराचा १९७८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला होता. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिरातील मुखमंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कठडे व त्यावर स्तंभ आहेत. हा संपूर्ण मुखमंडप संगमरवरी आहे. बंदिस्त सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे. गर्भगृहात देवीची शेंदुरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. मूर्तीला दोन डोळे, नाक व ओठ आहेत. देवीच्या डोक्यावर मुकूट, नाकात नथ व कपाळावर चंद्रकोर आहे. या चंद्रकोरीच्या मध्यभागी ‘ॐ’ आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर सुबक कलाकुसर आहे. या मंदिराच्या चौरसाकार छतावर घुमटाकार शिखर आहे. या घुमटावर अनेक देवी-देवता तसेच पशु-पक्षांची शिल्पे कोरलेली आहेत. शिखराच्या शिरोभागी द्विस्तरीय आमलक व कळस आहे.
या जागृत देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक येतात. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवादरम्यान मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी येथे घटस्थापना करण्यात येते. उत्सवादरम्यान देवीची महापूजा व महाभिषेक करण्यात येतो. भजन, कीर्तन, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजनही करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी देवीच्या पालखीचे सीमोल्लंघन करण्यात येते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. बालापूर हे मुस्लिमबहुल शहर आहे. येथील ८७ टक्के लोकसंख्या मुस्लिमधर्मिय आहे. त्यांचाही या मंदिरात होणाऱ्या उत्सवांमध्ये सक्रीय सहभाग असतो.

उपयुक्त माहिती:

  • बालापूर बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून बालापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क ः पुजारी, मो. ९५९५९५२३६१
Back To Home