‘देवीभागवता’त उल्लेखलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदेवता आहे. विविध ग्रंथांत त्वरजा, तुरजा, त्वरिता, तुळजा, अंबा या नावांनी ओळखली जाणारी ही भवानीदेवी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे. अफझलखान स्वारीच्या वेळी शिवरायांना ‘श्रीभवानी तुळजापूरची इणें मूर्तिमंत दर्शन दिलें’ असा उल्लेख ‘सभासद बखरी’मध्ये आहे. भक्ताच्या हाकेस त्वरित धावून येणारी म्हणून तुरजा वा तुळजा हे नाव पडलेल्या या देवीचे प्रतिरूप सुमारे दीडशे वर्षांपासून विराहित येथे वसले आहे.
देवीच्या येथील मंदिराबाबत आख्यायिका अशी की दीडशे वर्षांपूर्वी या परिसरातील किडे आडनाव असलेले एक देवीभक्त कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नित्यनेमाने बैलगाडीने तुळजापूरला जात असत. सुमारे ५०० किमीचा हा प्रवास वृद्धापकाळामुळे त्यांना शक्य होईना. तेव्हा एकदा तुळजापूरला गेल्यानंतर देवीपुढे मस्तक टेकवून त्यांनी ‘आता पुन्हा येथे येता येईल असे वाटत नाही’, अशी खंत व्यक्त केली. त्याच रात्री देवीने त्यांना दृष्टांत दिला की यापुढे तुला माझ्या दर्शनासाठी तुळजापूरला येण्याची गरज नाही. मी स्वतः तुझ्यामागून गावात येते.’ मात्र, तू वाटेत मागे वळून पाहू नकोस. तसे केल्यास मी तेथेच थांबेन, अशी अट देवीने घातली. दुसऱ्या दिवशी किडे हे आपल्या गावी येण्यासाठी निघाले.
विराहित गावानजीक आले असता, किडे यांच्या मनात देवी खरोखरच आपल्यामागून येत आहे याची उत्सुकता निर्माण झाली व न राहवून मागे वळून पाहिले. त्यावेळी देवीने त्यांना दर्शन दिले. मात्र, दृष्टांतात घातलेल्या अटीची पूर्तता न झाल्याने देवी लगेच लुप्त झाली. ही घटना ग्रामस्थांना समजल्यानंतर सर्वांनी मिळून येथे देवीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले. त्यानुसार येथे देवीचे मंदिर बांधण्यात आले. ही देवी विदर्भाची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी म्हणून प्रसिद्ध आहे.
गावाच्या पूर्व दिशेला निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसले आहे. रस्त्यालगत असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळ प्रांगणात असलेल्या तुलसीवृंदावनाजवळ प्राचीन पिंडी व नंदीच्या मूर्ती आहेत. येथेच एक शंकराचे लहानसे मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी एक संगमरवरी शिवपिंडी व त्यापुढील भिंतीजवळ असलेल्या वज्रपिठावरील मखरात शिवशंकराची मूर्ती आहे. मुख्य मंदिरासमोर प्रांगणात एक लहानशी प्राचीन दीपमाळ आहे. साधारणतः पाच ते सहा फूट उंचीच्या या दीपमाळेवर सर्व बाजूंनी दीपहस्त आहेत.
उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या असणाऱ्या या सभामंडपाच्या पुढील बाजूस बंदिस्त अंतराळ व त्यात प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात वज्रपिठावर काळ्या पाषाणातील देवी तुळजाभवानीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. चांदीचा मुकूट असलेल्या या देवीचे डोळेही चांदीचे आहेत. दररोज या मूर्तीला विविध अलंकार व वस्त्रे लेवविली जातात. मंदिराच्या छतावर बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहावर त्रिस्तरीय शिखर आहे. या शिखराच्या अग्रभागी आमलक व कळस आहे. मंदिर परिसरात शंकर महाराजांचे समाधी मंदिर, गजानन महाराज, साईबाबा व विठ्ठल-रुक्मिणी आणि झोलेबाबा यांची मंदिरे आहेत. तसेच आवारात वड, पिंपळ आणि औदुंबराचा त्रिवेणी दुर्मिळ वृक्ष आहे.
श्री क्षेत्र तुळजाभवानी संस्थानतर्फे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. दररोज सकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत येथे देवीला अभिषेक व आहुती दिली जाते. पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर भाविकांनी नेहमी गजबजलेला असतो. येथे महाशिवरात्री, तुळशीविवाहासह विविध सण-उत्सव साजरे केले जातात. चैत्र पोर्णिमेच्या दिवशी येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीचा गोंधळही घालण्यात येतो. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य उत्सव असतो. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात घटस्थापना करण्यात येते. उत्सावाच्या नऊ दिवसांत देवीला स्नान घालण्यात येत नाही. उत्सवादरम्यान सकाळी तसेच सायंकाळी आरती होते. नऊही दिवस भागवत कथापठण, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पूर्वी येथे देवीला बोकडबळी देण्याची प्रथा होती. मात्र, साठ वर्षांपूर्वी ही प्रथा बंद करण्यात आली. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.